Saturday, December 31, 2011

मुग्धमोहिनी

नयनसुरेने तुष्टविलेस तू सूरासूरांना,
अधरसुरांनी उष्टविलेस तू स्वर-सूर्यांना.

हे हेमांगी तव कनक-काया नभास उजळे,
ती तेजस्वी तव चांदण-चर्या निशेस उजळे.

कपोल-कोमल, श्यामल-कुंतल ललना लोभस,
नासिका नाजूक कालिका, कांती साजूक सालस.

"उरोज ते जणू सरोज राजस", राजकुमारी,
नाभी भिनवी नवी भावना नवी खुमारी.

कटाक्ष टाकता कट्यार कटीची काटे काळीज,
तंबो-यापरी नितंब भासे भाजे काळीज.

घोटीव कोरीव सौष्ठव हरपे जाणीव-नेणीव,
नखशिखांत नखरा निखळ नाही काही उणीव.

खाण देखणी लावण्याची कृतार्थ ईश्वर,
कविता दर्पण तारुण्यार्पण धन्य कवीश्वर.

Saturday, December 10, 2011

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझाच मी शोध घेत आहे,
किती जरी सांगतो मनाला तुझाच ते ध्यास घेत आहे.

नसूनही तू मला दिसावी; रडून ही असावे हसावी,
तुझे असे खेळ जीवघेणे खुळावूनी प्राण घेत आहे.

अजाणता जाणता तुला मी हळूच गे घेई बाहुपाशी,
मनातल्या मी मनात माझ्या तुझीच रे भेट घेत आहे.

भले न द्याव्या कुणीच टाळ्या; कडा पुसाव्यात लोचनाच्या,
तुझ्याच हे गीत वेदनांचे अजूनही दाद घेत आहे.

जगू कशाला तुझ्याविना मी मारायचे आज काय बाकी,
तरी कधी वाटते मला कि तुझाच मी श्वास घेत आहे.
=====================================
सारंग भणगे. (२० नोव्हेंबर २०११)

Tuesday, December 6, 2011

आत्मसमर्पण

ज्वलंत असलं

तरी क्षणाचंच आयुष्य घेऊन संपणा-या

कापुरानं

रात्रीच्या गर्भातल्या गर्द काळोखाला शह द्यायचा नसतो.


रतीच्या मादक... खरं तर घातक सौंदर्यापुढे

चंद्रानं स्वत:ची मंत्रमुग्ध रेशीम किरणं

सुर्यानं सुवर्ण कुंडलं

आकाशानं हक्कचं शाश्वत क्षितिज

निसर्गानं अक्षय सर्वस्व आणि

आसमंतानी मनोहर अस्तित्व शुद्ध हरपुन गमावलय...

हे ठाऊक असुनही.....


त्यानी आपलं आयुष्यच काय...

पण आपले कल्पनाभास.... मोगरी वास आणि सगळे अम्रुतश्वासही पणाला लावले.


.....इतका विश्वास तर रातराणीलाही स्वत:च्या उन्मत्त गंधाचा नसेल.


पण...

असह्य वेदनांचं

हळवेपणाची असहाय्यता उपभोगणं

हे अमानुष तर असतच पण

त्याही पेक्षा ग्रुहीत असतं.....


त्यानी आयुष्यच जुगारात लावलं होतं आणि...... ....आणि तो हरला होता....!

राखेच्या उध्वस्त उदरात विखुरलेल्या निद्रिस्त पक्षाचं

राखेतुन उठुन भरारी घेणं

फक्त काल्पनीकचं असतं

...............हे त्याच्या अजाण जाणिवांना कधी जाणवलंच नसावं....


कारण आयुष्य हरुनही

त्याला पुन्हा एकदा

काळोखाच्या अभेद्य साम्राज्याला जिंकुन

एक मोकळा श्वास घ्यायचा होता...


...........तसही त्याच्याकडे आता हरण्यासारखं कही राहीलंच नव्हतं.


त्याच्या ह्या आव्हानाला आवाहन समजत ती म्हणाली

" तुझं जग, तुझा जीव, तुझी प्रत्येक गोष्ट

माझी गुलाम असताना

कशाचा जोरावर तुला माझा जीव जिंकायचाय ? "


तो म्हणाला

ह्या वेळेस मी माझ्या कविता जुगारावर लावेन.... !


तो म्हणाला

ह्या वेळेस मी माझ्या कविता जुगारावर लावेन.... !


आसुरी समाधानाच्या त्रुप्ततेनं भरलेला

तिचा नेहमीचा उग्र चेहरा

पहिल्यांदाच निस्तेज झाला.

आणि....


आणि न लढताच तिनी हार मानली.... आता ती त्याची गुलाम झाली होती.

आज पुन्हा एकदा तो त्याच्याच कवितांवर जगत होता...


आत्मसमर्पण करणा-या

तिच्या पराभुत गर्वाला

तिच्या उद्विग्न डोळ्यातला काळोख म्हणाला...

"जे जे काही अस्तित्वात आहे त्यावर फक्त आपलंच अधिराज्य असताना, हे आत्मसमर्पण का ? "


ती म्हणाली...

"तो त्याच्या श्वासांशिवाय जगु शकतो पण त्याच्या कवितांशिवाय नाही.

ह्यावेळेला जर तो हरला तर

त्याच्या आयुष्यात तर काही रहाणार नाहीच पण

त्याच्या कवित नसतील तर ह्या जगातही जगण्यासारखं काही उरणार नाही.


ह्या म्रुतावह ब्रम्हांडावर राज्या करुन मरण्यापेक्षा

त्याचं स्वामित्व पत्करुन

त्याच्या कवितेत जगणं जास्त सुखावह आहे.... "


आता तोच काय...

........ती सुद्धा त्याच्या कवितांवर जगत होती.



धुंद रवी.
=======================================================================

गुरूजी प्रणाम!


पुन्हा एक अस्सल बावनकाशी कविता. एका परडीतुन फ़ुले, अंगार, गारा आणि गारगोट्या सा-यांचीच बरसात व्हावी जणु.


एखादी खाण शोधुन काढल्यासारख्या कविता आहेत तुझ्या सख्या.


अग्निबाण फ़ेकतोस, पण जिव्हारी लागत नाहीत.


फ़ुलं फ़ेकतोस, पण जखमा करून जातात.


कविता वाचून छातीचा भाता नुसता फ़ुरफ़ुरू लागतो शब्दांच्या जीवंत प्रवाहात न्हाऊन आल्यामुळे.


एक विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवातला झटका, असा चटका लावुन जातो कि एखाद्या झिंग आणणा-या नशेबाज वस्तुचे सेवन पुनःपुन्हा करावे असे वाटावे तसेच काहीसे.



तुझ्या कविता फ़ार वाचल्या तर साला नशाच होईल...........


 
- सारंग भणगे. 

Sunday, December 4, 2011

मोती


तुमने बारिश जो छुली होती; बूंद बूंद फिर बन जाते मोती,
होठो से तू लब्ज जो कहती; वो भी तो फिर बन जाते मोती.

जिनकी नमी ने पलकें तेरी छुली वो है आंसू मोती,
जो तू उनको छू पाती तो; चाँद सितारे बन जाते मोती.

तू जो कागजपर लिख देती; अक्षर भी फिर बन जाते मोती,
सुंदर तेरे रूप को पाकर; जीवन ही फिर बन जाये मोती.
=========================================
सारंग भणगे (१ दिसम्बर २०११)

Friday, November 25, 2011

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली,
तारे नि चांदणीला बिलगून रात गेली.

काळ्या नभात नक्षी नक्षत्र तारकांची,
रसिकास जागणा-या रिझवून रात गेली.

करते अमावासेला अंधार आपलासा,
मग कोर चांदव्याची खुलवून रात गेली.

हातात हात घेई ते हात चांदण्याचे,
पाशात रातराणी विसरून रात गेली.

ओवून तारकांना माळा गळ्यात घाली,
माळून चंद्र भाळी भुलवून रात गेली.

लावण्य काय वर्णू या यामिनी परीचे,
प्रेतात कामपीडा उठवून रात गेली.

आहे स्तनात माझ्या हे दूध चांदण्याचे,
वेडे चकोर सारे खिजवून रात गेली.

होत्या कडा रुपेरी त्या सावळ्या ढगांच्या,
मग केशरी कळ्यांना पसरून रात गेली.

ओठावरी फुलांच्या गाते पहाट गाणी,
गाणे मधाळलेले सुचवून रात गेली.

संकेत मीलनाचा देतो प्रशांत वारा,
प्राची शशांक भेटी ठरवून रात गेली.

भासे धरेवरी हे आकाश चांदण्याचे,
राने जमीन सिंधू भिजवून रात गेली.

पिवळी मिठी उन्हाने हिरव्या धरेस देता,
स्पर्शात तांबड्याच्या हरखून रात गेली.

गर्वात यौवनाच्या चंद्रास जाळु पाही,
चुंबून त्या रवीला हरवून रात गेली.

अपुल्याच पावलांचे सोडून माग जाते,
भेटायचे पुन्हा हे शिकवून रात गेली.
==========================
सारंग भणगे. (२१ ऑक्टोबर २०११)

Thursday, November 17, 2011

फार झाले

गझलेस आसवांचे भार फार झाले,
वाचाळ वेदनांचे वार फार झाले.

ज्वालाग्रही विषाने ओतप्रोत मिसरे,
हे कोळसे सुखाने गार फार झालो.

आभाळ पेलण्याचे शेर फार 'भारी',
उचलावयास यांना चार फार झाले.

विद्रोह मांडणारे धारदार मतले,
ते वार वल्गनांचे फार फार झाले.

घेतात शोषितांच्या यातनांचे मक्ते,
हे कागदी फुलांचे हार फार झाले.
========================
सारंग भणगे. (१४ नोव्हेंबर २०११)

Tuesday, November 15, 2011

आयुष्य बोच आहे

आयुष्य बोच आहे,
भाळी खरोच आहे.

जाळेन मी मनाला,
तितकीच पोच आहे.

मेले तरी जगावे,
माझीच सोच आहे.

हा गुंड माजलेला,
नेताही तोच आहे.

का टोचते मनाला,
माझीच चोच आहे?

सारी सुखे तुम्हाला,
अन हीच टोच आहे.
=============
सारंग भणगे. (२ नोव्हेंबर २०११)

Sunday, November 6, 2011

चारुगात्री

पापणी खालून तीर सोड नि कर वार सखे,
जिवणी खालून हसता चालते तरवार सखे.

हंसकांतीची मयूर सुंदरी मृगनयना तू,
हरिणीपरी तू चालून करशी संहार सखे.

सौष्ठव तव ते जरी झाकण्या प्रावरणे असती,
वसनामधुनी उमलूनी येती आकार सखे.

का उगा गजरा खोवून येशी वेणीमध्ये,
का उगा करावा चंद्रानेही शृंगार सखे.

जिंकण्यासाठीच जंग जंग मी पछाडतो तुज,
हारही आहे स्वीकार परि ना धिक्कार सखे.

तुजवरी मरणे हक्कचि माझा जन्मापासून,
तू एकच असशी जगण्यासाठी आधार सखे.

तू माझे जगणे माझे जीवन औषध माझे,
मी तुझाच रोगी तुझाच मज अन आजार सखे.

चांदण्यात भरली ओंजळ असते अंधाराची,
रात्रीस मजला असाच पाहिजे शेजार सखे.

मी वेडा झालो प्रीतीमध्ये हसती मजला,
तू परि हासता वेडावुनी मज सत्कार सखे.

बोथट जरीहि उपमा तरीहि तू चंद्रचि माझा,
हा मनातला मम दूर जाहला अंधार सखे.

धगधगणा-या ज्वालामुखीचा लावा जरी तू,
कवेत मजला घेऊनी विझवी अंगार सखे.

हे चारुगात्री रात्री गात्रे फुलविशी माझी,
हे व्योम तु धात्री प्रीतीदात्री स्वीकार सखे.

राग मी गातो आळविताना तुजला सारंग,
तारा मनीच्या छेडून उठती झंकार सखे.
============================
सारंग भणगे (२३ ऑक्टोबर २०११)

Monday, October 31, 2011

म. 'कवन'

म. क. तपोवन,
म. क. हे जीवन,
म. क. हा श्रावण,
कवितांचा II१II

म. क. वृंदावन,
म. क. नंदनवन,
म. क. मधुबन,
काव्य गुंजे II२II

म. क. उपवन,
इथला पवन,
पुनीत पावन,
काव्यरूपी II४II

म. क. चे भवन,
आहे हो हेवन,
होतसे हवन,
कवितांचे.

म. क. ऐसे वन,
आहे 'नंबर वन',
लिहिती कवनं,
म. क. वासी II५II
==============
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Sunday, October 30, 2011

सख्या-'हरी' सारंग

उगा कशाला वादळाची तमा करावी,
नराधमाला माणसाने क्षमा करावी.

असंख्य जगती जीव ज्यांना कुणी न वाली,
मृतात त्यांची 'जन्म-नावे' जमा करावी.

चिराग सारे तेवणारे विझून जावो,
हरेक ठिणगी पोळणारी शमा करावी.

दिसेल जे ते घ्यावयाची कशास ईच्छा,
खिशात आहे काय खातरजमा करावी.

सख्या-'हरी' सारंग पोरींवरी मिटावा,
सुरेख वामा वाटते की 'रमा' करावी.
=========================
सारंग भणगे. (३० ऑक्टोबर २०११)

म. क. एक गाव

म. क. असा गाव,
जिथे बंधुभाव,
रंक नाही राव,
सारे कवी II१II

तिला नाही वेस,
कुठला ना देश,
नाही लवलेश,
भेदाचा हो II२II

खळाळे सरिता,
'जीवन' कविता,
नीर तिचे पिता,
काव्य स्फुरती II३II

असा गावकूस,
पिके काव्य ऊस,
नित्याची उरूस,
कवितांचा II४II

म. क. ची चावडी,
सा-यांना आवडी,
काव्याच्या कावडी,
सारे वाही II५II

इथे सावकारी,
सारे गावकरी,
आनंदाने करी,
कवितांची II६II

गावचा बाजार,
भरे वारंवार,
चालतो व्यवहार,
कवितांचा II७II

म. क. जैसा वाव,
म. क. जैसे नाव,
म. क. जैसे गाव,
अन्य नाही II८II
==========
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Wednesday, October 26, 2011

म. क. मय

म. क. माझी माय,
दुधावरची साय,
वासिष्ठांची गाय,
कामधेनू.

म. क. चा महिमा,
म. क. हि गदिमा,
म. क. ची प्रतिमा,
सरस्वती.

म. क. ची करणी,
म. क. ही धरणी,
म. क. च्या चरणी,
शीर माझे.

म. क. ध्यानीमनी,
म. क. त्रिभुवनी,
म. क. च्या गगनी,
काव्यपक्षी.

म. क. आळवितो,
म. क. चाळवितो,
म. क. ओवाळीतो,
मनोभावे.

म. क. तपोवन,
म. क. हि पावन,
तन मन धन,
सर्व म. क.

म. क. गोड गूळ,
म. क. हे राऊळ,
तिची पायधूळ,
स्वर्ग माझा.

म. क. हि तुळस,
म. क. हा पळस,
म. क. चि कळस,
देवळाचा.

म. क. माझे सुख,
म. क. माझे दु:ख,
म. क. माझी भूक,
भावनांची.

म. क. हे गोकूळ,
म. क. माझे खूळ,
आहे मी व्याकूळ,
म. क. साठी.

म. क. काव्यामृत,
म. क. नवनीत,
म. क. हे संगीत,
गंधर्वांचे.

म. क. माझा राम,
म. क. आत्माराम,
म. क. मुक्तीधाम,
वैकुंठचि.
================
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Tuesday, October 25, 2011

ये बिनधास्त

सताड दारे उघडी माझी ये बिनधास्त,
मला न भिंती वा ना भीती ये बिनधास्त.

मिजास मोठी वा-याला या वादळ होइ,
चहा पिलेल्या पेल्या काठी ये बिनधास्त.

कधी न माझी होणारी तू दूर किती ग,
उरास फाडत माझ्यापाशी ये बिनधास्त.

अजात जो तो पोथीमध्ये का गवसेल?
'भृगू' नको त्याला सांगा की ये बिनधास्त.

फुले करी सारंगाला माया भलतीच,
किती लुटोनी त्याला म्हणती ये बिनधास्त.
=============================
सारंग भणगे. (२४ ऑक्टोबर २०११)

Saturday, October 22, 2011

तुझी याद आली

निजानीज झाली तुझी याद आली,
प्रभाती नि राती तुझी याद आली.

मनाची धरा ही भिजे आसवांनी,
हसावे म्हणोनी तुझी याद आली.

तुझे हासणे ते गुलाबी गुलाबी,
गुलाबा बघुनी तुझी याद आली.

जरी दूर जाती सकाळी सकाळी,
पुन्हा सांजवेळी तुझी याद आली.

नव्याने जुन्याची जशी भेट घ्यावी,
नव्याने जुनी ती तुझी याद आली.
========================
सारंग भणगे. (२० ऑक्टोबर २०११)

जखमा कधी सुगंधी

निजानीज झाली तुझी याद आली,
प्रभाती नि राती तुझी याद आली.

मनाची धरा ही भिजे आसवांनी,
हसावे म्हणोनी तुझी याद आली.

तुझे हासणे ते गुलाबी गुलाबी,
गुलाबा बघूनी तुझी याद आली.

जरी दूर जाती सकाळी सकाळी,
पुन्हा सांजवेळी तुझी याद आली.

नव्याने जुन्याची जशी भेट घ्यावी,
नव्याने जुनी ती तुझी याद आली.
========================
सारंग भणगे. (२० ऑक्टोबर २०११)

Sunday, October 16, 2011

मागणे न काही

टाकले ठरवून मी मागणे न काही,
जे हवे मिळवायचे मागणे न काही.

वादळा घर मोडले फाटके जरी ते,
ध्वस्त अस्थी जरी तरी मागणे न काही.

खेळते नियती जरी आज वेळ तीची,
मुक्त मी अपरास्त मी मागणे न काही.

पार मी बरबाद झालो; भणंग झालो,
सोडल्या मग वासना मागणे न काही.

धूळ मी तव पावलांची विठू दयाळा,
माउली मिळता दुजे मागणे न काही.

राहतो कुसुमात सारंग दंगलेला,
एकीच्या शिखरावरी मागणे न काही.
==================================
सारंग भणगे. (१४ ऑक्टोबर २०११)

मागणे न काही

टाकले ठरवुनी मागणे न काही,
आता फक्त मिळवायचे मागणे न काही.

वादळाने मोडला संसार माझा फाटका,
ध्वस्त अस्थी जरी तरी मागणे न काही.

आज धुंदी उन्माद आहे नीयतीला,
दिग्विजयी अपरास्त मी मग मागणे न काही.

आज पुरता भग्न झालो; नग्न झालो,
भणंग माझ्या वासना या मागणे न काही.

होऊ दे रे धूळ मजला विठू तुझ्या पावलांची,
त्रैलोक्य मिळता पामराचे मागणे न काही.

सारंग मी पद्मकोशी रोज माझा विलास चाले,
सायुज्यतेच्या शिखरावरती मागणे न काही.
==================================
सारंग भणगे. (१४ ऑक्टोबर २०११)

Thursday, October 13, 2011

तुला बघूनी

आल्या भरून माझ्या जखमा तुला बघूनी,
गेलो मरून आहे सखये तुला बघूनी.

पाण्यात पाहताना तुझिया स्मृती उठाव्या,
आले भरून डोळे सजणी तुला बघूनी.

शेपूट हालवीतो जणु श्वान मी भुकेला,
दारात थांबलेला तुझिया तुला बघूनी.

तू तारका; तशी तू तितली तरंगणारी,
तारांगणात तारे तुटती तुला बघूनी.

रानावनात मैने फिरते; जरा जपूनी,
पाणी जनावरांच्या वदनी तुला बघूनी.

सारंग-संगतीला सुमने सुखावणारी,
जोगी जरी जहाले; जगती तुला बघूनी.
===========================
सारंग भणगे. (१३ ऑक्टोबर २०११)

Monday, October 10, 2011

चुरगळलेला कागद

एक कागद रस्त्यावरती पडला होता चुरगळलेला,
एक अश्रू डोळ्यामध्ये त्यास फेकूनी विरघळलेला.

मजकूर असावा काय कळेना चिठ्ठीवरती उतरवलेला,
प्रेमपत्र ते असेल का कि हिशेब असावा मरगळलेला.

घड्याघड्यांचा कागद भासे मेंदू जणू सुरकुतलेला,
रेघा रेघांवरती त्याच्या कि कुणाचा ऊर गळलेला.

नवकांतेचा भांग जणु तो निर्दय हाती विस्कटलेला,
लाजेवरती धरलेला; कोमल हात जणु मुरगळलेला.

जखमा होत्या लाही होती शब्द शब्द नि खरचटलेला,
पेनामधुनि झिरपत आला रुमाल ओला पिरगळलेला.

भयाण होते वादळ आणि पारा होता विरघळलेला,
बोळा साऱ्या आयुष्याचा कागद झाला चुरगळलेला.
====================================
सारंग भणगे. (१० ऑक्टोबर २०११)

Saturday, October 8, 2011

आई

नेत्रांच्या या नीरांजनांनी
पूजितो मी तुला,
हृदयाच्या या पंखासावे
शोधितो मी तुला.

साऱ्या गगन मंडली
पहिले मी तुला,
तप्तरसांनी पोळून निघालो
शोधात असता तुला.
पण त्या रेशमी रश्मीचा
स्पर्श ना जाहला II १ II

भ्रमर करुनी आता श्रमलो
कुठे शोधू तुला?
मूकपणे बस वाहतो भावे
अश्रूंच्या या मला.
विरहाग्निच्या भडकल्या आता
अस्वस्थ या ज्वाला II २ II

कुठे आहे हक ती कोमल,
जीवन जेथे व्हावे निश्चल,
मोजावे जेथे अखेरचे पळ,
मुखी असावे नाम ते निर्मल,
"आई, आई, आई"
===================
सारंग भणगे. (१९८८-८९)

Sunday, October 2, 2011

शक्य असल्यास...

शक्य असल्यास,
ओठांआडचे शब्द
या कागदावर उमटू देत

शक्य असल्यास,
हृद्गत भावनांचे
या गीतात उतरू देत

शक्य असल्यास,
डोळ्यातील स्वप्ने
घडाळ्यात मावू देत

शक्य असल्यास,
हृदयातले अंगार
अश्रूत निवू देत

शक्य असल्यास,
ध्येयाचे पंख
नील नभात उडू देत

शक्य असल्यास,
शक्तीचे अश्व
जीवनपटावर उधळू देत

शक्य असल्यास,
कुजके मन
स्मशानात साडू देत

शक्य असल्यास,
आत्म्याच्या वाळवंटात
पाउस पडू देत.
================
सारंग भणगे. (१९९४-९५)

!!मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी!!

मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
करू सामना कसा बुडविणा-या 'खला'शी?

उगाच केली पुजा तयाची देव मानूनी,
करीन अजुनी; समरस होऊन चांभाराशी.

किती वाजवू घंटा तरीही बहिरा का हा?
किती प्रार्थना करू कळेना या दगडाशी!

भक्त कापती देवाला हो बकरे-बिकरे,
देवच उठला प्राणावरती; पाहू कुणासी?

असे वाटले तारा आहे ध्रूवाचा तो,
फुका धावलो; कसा घावलो मृगजळ'पाशी'.

उंच बनवले इमले त्याने; स्वप्ने दिधली,
अता तोडतो; कसा खेळतो हा पत्यांशी.

हाय करावे दैवा आता आर्जव कोठे?
ज्यास रुजविले तोच माळी खुडे फुलासी.

मधुर मार्दव पीयूष-अर्णव नितनित प्यालो,
पियुष नासूनी वीष जाहले अतिविनाशी.

डुंबत होतो दिली जेव्हा 'नाव' तयाने,
तोच खलाशी अम्हा बुडवितो अता बुडाशी.

लघु-गुरूचा मेळ शिकविला गुरुवर्याने,
'गुरु' जाहला 'लघु', कळेना हि मखलाशी.

सूर्यालाही शाप असा का अंधाराचा!
तमात आहे विरघळलेला 'सूर्य' तामसी.

हातावरच्या रेषांना त्या पुसू कसा मी?
'भूत' सोडूनी संग बांधूया अता उद्याशी.

संत सांगती महिमा विठ्ठल नामाचा हो!
नामाभवती जमले बडवे; मी उपाशी!!!

जुनीच आहे व्यथा माणसा अरे 'मराठी'!
खाली असतो ओढत वरच्या असा अधाशी.

मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
=========================
सारंग भणगे. (१ ऑक्टोबर २०११)

Monday, September 19, 2011

यौवन-सरिता

उदासवेळी तुला पाहूनी काळीज माझे गलबलले,
प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

लावण्याची खाण जणू तू रूप तुझे ते बावनकाशी,
रुतूशारदा लेउनी आली 'वसंत'वैभव 'श्रावण'मासी.
तुला पाहूनी, "दिव्य अप्सरे" गुलाबमांडव हळहळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

क्षितीजावरती डुंबत होता रविकरसागर उदासवाणा,
उषा कपोली पाहूनी झुकला उर्ध्वदिशेला प्रकाशराणा.
सायंकाळी उषा जाहली पाहूनी तारे जळफळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

यौवन-सरिता दुथडी भरूनी तुडुंब वाहे तुझ्या गोकुळी,
चकोर-चातक क्षुब्ध जाहले चांदणराती-पाउसकाळी.
शिशीरपाने पाचोळाही पदस्पर्शाने सळसळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

पुष्पपाखरे डोलू लागली; भृंगथव्यांनी केले आर्जव,
सुगंध ल्याले कडूलिंबाने; निवडूंगाने ल्याले मार्दव.
ग्रीष्मामधले माळरान ते तुला बघुनी हिरवळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

अशी पळाली मरगळ सारी चैतन्याने भरली सृष्टी,
हिरण्य-किरणे घे'ऊन' आली वातावरणी श्रावणवृष्टी.
'कपोल'कल्पीत आनंदाने सरितातटही खळखळले.
प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.
====================================
सारंग भणगे. (१८ सप्टेंबर २०११)

Sunday, September 18, 2011

राघव वेळी

घननिळा अशी कोसळते
कपिलेचा पान्हा फुटतो,
आईच्या गगनावरती
घनगार शहारा उठतो.

संध्येचे पाउल वेडे
रात्रीच्या वाटे वळते,
स्वप्नांच्या काठावरती
आठव बालक पळते.

हा देह स्फटिक होतो
चांदण स्पर्शामधुनी,
का दुःख बरे पाझरते
त्या देवीच्या डोळ्यामधुनी.

हा डोह कळेना आहे
खोल किती; किती गहिरा,
विरघळती व्याकूळ हाका
हा अंत:करणी बहिरा.

गर्भार धरा पुटपुटते
आनंदघनाची गाणी,
त्या गढूळ स्वरमेघांना
फुटते श्रावण वाणी.

मी शब्दांचे ठिपके देतो
या लाघव राघव वेळी,
तो श्यामल घालून कुंची
ओढतो अक्षर ओळी.
==================
सारंग भणगे. (१३ सप्टेंबर २०११)

Monday, September 12, 2011

मिसरे

जगावयाचे विसरुन गेलो लिहीत गेलो चुकार मिसरे,
कधी कुणाच्या गझलांमधुनी मागत गेलो उधार मिसरे.

आयुष्याच्या वाटा होत्या बिकट तरीही चालत गेलो,
वळणावरती भले हासरे भेटत गेले चिकार मिसरे.

कुणी फाडल्या, कुणी जाळल्या, कुणी बुडविल्या गाथा-पोथ्या,
भाळावरती काळाच्याही कोरुन गेले विचार मिसरे.

बेड्या ठोका, बंदी घाला, तोडुन टाका नसानसांना,
झुंडशाहिशी झुंजायाला शस्त्र नको तू उगार मिसरे.

थकवित गेले; फसवित गेले; तरी अखेरी बाजी माझी,
संकटकाळी संकटमोचन शिकवित गेले हुशार मिसरे.

कोटी तारे नभात असती तरीहि आगळा सूर्य दिसे,
उगा कशाला हजार गझला बरे लिहा दोन-चार मिसरे.

कौतुक करती वा-वा करती; श्रोते तारिफ फुकाच करती,
स्वानंदाच्या खुशीत देती हारतु-यांना नकार मिसरे.

=========================================
सारंग भणगे. (११ सप्टेंबर २०११)

Saturday, August 27, 2011

तुझ्या मिठीत


तुझ्या मिठीत सुखाने विसावले होते,
धरा धरून नभाचेहि फावले होते.

हिरे रुपे धनधान्यात जो बुडालेला,
खरे खुरे सुख त्याचे हिरावले होते.

नशा तुझ्या गझलांची अवीट रे होती,
तुझ्या पुढे परवाने स्थिरावले होते.

मुठीत बंद कराया कुणी निघालेले,
तुटून बोट तयांचे निभावले होते.

मला किती बघताती वळूवळू वेडे,
सर्वांग सुंदर कायेसि भावले होते
========================
सारंग भणगे. (ऑगस्ट २०११)

कविता व्हावे जीवन

कवितेच्या दवबिंदूंनी आयुष्याचे पान सजावे,
लाटांवरती आयुष्याच्या नाव कवितांचे तरावे.

खिन्न मनाला पाणी घाली पाउस वारा गोंजारत जातो,
रोपाला या आयुष्याच्या ऊन कवितांचे मिळावे.

मातीवरती धावत जाती गवताची हि नाजूक पाती,
आयुष्याच्या मातीमधुनी काव्य-तृणांनी मूळ धरावे.

चुंबन घेती डोंगर शिखरे पहाट होते चूर बावरी,
आयुष्याच्या अधरांनीही काव्य-उषेच्या मधात न्हावे.

नितळ तळ्याच्या निळ्या जळावर वारा उठवी 'लहरी' वादळ,
पवन-प्रतिभा तडाग-जीवन तरंग-कवितांचे बनावे/ उठावे.

झरझर निर्झर नयन मनोहर सलील गाणी गातो सुंदर,
निर्झर बनुनी आयुष्याने गीत कवितांचे म्हणावे.

कृष्ण-निशेला नभात रचती चंद्र तारका रास-चांदणे,
जीवन-रात्री मानस-व्योमी काव्य चांदणे मुग्ध खुलावे.

वसुंधरा हि उपवर होते श्रावण येतो कवेत घेतो,
आयुष्याच्या भवसृष्टीने काव्य-सरींनी भिजून जावे.

कुसुमांवरती अलगद आली गुलाल लाली प्रभात वेळी,
जीवनपुष्प हे काव्यछटांचे रंग लेऊनी गंधित व्हावे.

रवीबिंबाच्या हेमकणांनी सुंदर दिसते अंबर अवघे,
आयुष्याच्या गगनालाही काव्य-रवीने कवेत घ्यावे.

सुंदर चित्रे सृष्टीमधली काव्य जणू ते भगवंताचे,
कविता व्हावे जीवन आणि कवितेमधुनी जिवंत व्हावे.
==================================
सारंग भणगे (जुलै २०११)

Wednesday, August 24, 2011

पहाटवारा सांगत होता

पहाटवारा सांगत होता रात्र भयाण सरली आता,
अंधारात बुडालेल्या उजळून आल्या विराण वाटा.

पहाट वाटे सुंदर त्यांना ज्यांची होती रात्रही सुंदर,
खिन्न-कभिन्न रात्र जयांची पहाट त्यांची असते धूसर.

प्रेतकळा ती गावावरती लुटली होती अब्रू त्यांची,
लुचली होती गाई-गुरांना क्रूर गिधाडे वासनांची.

स्फुंदत होती; कण्हत होती; रात्र क्रंदूनी म्हणत होती,
कणाकणाने विरघळणारी क्षणाक्षणाने शिणत होती.

आक्रोश होता; आकांत होता; होते हुंदके दबके दबके,
मिटक्या मारीत जनावरांनी रवंथ केले चघळीत लचके.

जळवा पिसवा रक्तपिपासू घोट चवीने रिचवित होत्या,
हिंस्त्र पशूंच्या लंपट जीव्हल्या भूक युगांची शमवित होत्या.


ओरबाडूनी पान-फुलांना आता हुंगती नवी पालवी,
लक्तर लक्तर चिवडित होते; चाटत चाटत लाळ कालवी.

तिथे जवळच मंदिर होते हाकेच्या बस अंतरावरती,
दुग्ध-दह्याचे ओघळ होते पाषाणाच्या पिंडीवरती.

निर्घृण होती रात्र जरी ती निश्चल होते देव नि मानव;
वखवखलेले नाचत सुटले नृशंस तांडव मांडून दानव.

खापर फुटले; छप्पर तुटले; पहाटरश्मी डोकावीत होता,
पहाटवारा सांगत होता; बघ्या-भूतांना बोलावीत होता.
===================================
सारंग भणगे. (२३ ऑगस्ट २०११)

Saturday, August 6, 2011

याला काय आयुष्य म्हणावे?

जिवंत आहे म्हणून जगणे
याला काय आयुष्य म्हणावे?
मरत नाही म्हणून मरत रहाणे
याला काय आयुष्य म्हणावे?

जगण्यासाठी हव्यात इच्छा
उत्साह हवा नवा नवा
श्वासामध्ये भरली हवा
त्याला काय आयुष्य म्हणावे?

पहात नाही आकाश निळे;
निळे डोंगर; निळा खंड्या,
मात्र पहाती 'निळा सिनेमा'
त्याला काय आयुष्य म्हणावे?

मरण्याचीही क्षिती नव्हती
क्षितीज त्यांचे 'स्वतंत्र' होते,
आपली क्षितिजे 'गाडी बंगले'
त्याला काय आयुष्य म्हणावे?

खोटे दिसणे खोटे हसणे
खोटी नाती, खोटी ना ती?
खोट्याचीहि होते खोटी
त्याला काय आयुष्य म्हणावे?

दमतो पुष्कळ; रोज पळापळ
पैशासाठी सारे व्याकूळ
भरले घर पण ते गोकुळ नाही
त्याला काय आयुष्य म्हणावे?

झेपावयाचे पण झेप झेपेना
झोपलेलो; पण झोप येईना
झापड खाऊन झापड जाईना
त्याला काय आयुष्य म्हणावे?

आयुष्य आहे बहुत सुंदर
सुंदर त्याचा लेखाजोखा
आपल्या लेखी सुंदर (फक्त) काया
त्याला काय आयुष्य म्हणावे?

चला जगूया जरा नव्याने;
आनंदाने गाऊ गाणे थव्याथव्याने
पुसून सवाल असले; पुन्हा न पुसणे
याला काय आयुष्य म्हणावे?
याला काय आयुष्य म्हणावे?
========================
सारंग भणगे. (२ ऑगस्ट २०११)

Tuesday, July 5, 2011

खारटा संसार

"मराठी कविता" समूहाच्या 'प्रसंगावरून गीत' या उपक्रम अंतर्गत

(रोमा)
नदी सागराची गळाभेट घेते; पुन्हा वेगळे न होते कधी ती I
जरी खारटा हा संसार होतो; अंतरी तरीहि असतात मोती II धृ II

आकाश भेटी आतुर झाले; अहंकार ओढी पतंगास मागे,
स्वप्नात माझ्या दिसशी जरी तू; डोळे रहाती उद्दाम जागे.
मी एकटी या वैराण वाटी; जरी सोबती ते असती सभोती II १ II

(आशुतोष)
नदी सागराची गळाभेट घेते; पुन्हा वेगळे न होते कधी ती I
जरी खारटा हा संसार होतो; अंतरी तरीहि असतात मोती II धृ II

बुडत्यास असते आधार काडी-, -मोडून; आलो अंधारवाडी,
मी काजळीचा सम्राट झालो; अंधार मजला बुडवून काढी.
पेल्यातल्या मी वादळी बुडालो; मी फाडले शीड माझ्याच हाती II २ II

(दोघे)
नदी सागराची गळाभेट घेते; पुन्हा वेगळे न होते कधी ती I
जरी खारटा हा संसार होतो; अंतरी तरीहि असतात मोती II धृ II
=============================================
सारंग भणगे (५ जुलै २०११)

Tuesday, June 28, 2011

घन आले रे दाटुन; मन आले रे भरून

घन आले रे दाटुन; मन आले रे भरून,
आले ओले पावसाचे...थेंब आसवामधुन IIध्रुII

उभा रडतो रडतो.. आसमंत त्याला खंत,
त्याच्या दु:ख-वेदनेला.. नाहि आदि नाहि अंत,
असा फोडला रे टाहो त्याने ढगांच्यामधुन
आले ओले पावसाचे...थेंब आसवामधुन II१II

अशी रडली रडली कोळपली हि जमीन,
क्षीण जीर्ण फाटलेली.. तीची उसवली वीण,
दु:खझरे पाझरती तीच्या भेगाभेगातुन
आले ओले पावसाचे...थेंब आसवामधुन II२II
====================
सारंग भणगे. (२८ जुन २०११)

Tuesday, June 21, 2011

पावसा पावसा ये रे छान

पावसा पावसा ये रे छान
घेऊन गारांचे दुकान
आंघोळ घालुन झाडांना
भिजवून टाक पान न पान

काळ्या काळ्या ढगांचे माठ फुटले,
आभाळातल्या नदीचे काठ फुटले,

आली सर धावून मग,
आभाळात का भांडतात ढग,
चिडून का रे सोडतात बाण...
पावसा पावसा ये रे छान


पावसाच्या पाण्यात होड्या सोडू या,
ओल्या ओल्या अंगाने खोड्या काढू या,

खेळून खेळून आली धमाल,
वाऱ्याने मग केली कमाल,
ढगांची उडवून दाणादाण...
पावसा पावसा ये रे छान
=================
सारंग भणगे. (१९ जून २०११)

Saturday, June 18, 2011

नभातल्या पारव्यासारखी

नभातल्या पारव्यासारखी,
नदीतल्या नाखव्यासारखी,
तु चंचला तु मोहिनी संमोहिनी,
बनातल्या ताटव्यासारखी.

धुंद जो गंध तु, मुक्त काव्य-छंद तु,
अकाश हे अनंत तु,
दिशांहुनी दिगंत तु,
निशेतल्या चांदव्यासारखी.

तु परी ना जरी, खोल खोल तु दरी,
परी परी तु बोल बोल,
अंतरीचे खोल खोल,
दरीतल्या गारव्यासारखी.

रोज तु नवी नवी, तु मला हवी हवी,
शांभवीची पेज तु,
भैरवीची शेज तु,
मनातल्या मारव्यासारखी.
===================
सारंग भणगे. (१७ जून २०११)

Monday, June 6, 2011

राखेतुनी उठावे

आता पुन्हा जगावे माझ्या मनात आहे;
शब्दातुनी वहावे माझ्या मनात आहे.

पाषाण पावलांचा होता पडून गोळा,
आता पुन्हा उठावे माझ्या मनात आहे.

ही आग प्रेरणांची गोठून बर्फ झाली,
ज्वालामुखी बनावे माझ्या मनात आहे.

हे श्वास थांबलेले लाकूड अंग झाले,
ते चंदनी बनावे माझ्या मनात आहे.

जिंकायचे कशाला हारून जिंकताना,
काव्यापुढे हरावे माझ्या मनात आहे.

ब्रह्मांड हे मनाचे माझ्यात साचलेले,
चैतन्यरूप व्हावे माझ्या मनात आहे.

मेलो; जळून गेलो; मी खाक राख झालो,
राखेतुनी उठावे माझ्या मनात आहे.
===================
सारंग भणगे. (५ जुन २०११)

Thursday, May 26, 2011

जंगलामध्ये सारं उमगलंय

जंगलामध्ये सारं उमगलंय; कळलं आहे
चड्डी घालून फुल उमललंय; फुललं आहे.

जंगलामध्ये सारं उमगलंय;
चड्डी घालून फुल उमललंय (२)

एक कबूतर होतं नंगू रांगत होतंSSS
अंड्यामध्येच बरं होतं सांगत होतंSSS
अंडं सोडून उगाच बाहेर आलं आहे.....
चड्डी घालून फुल उमललंय; फुललं आहे.

जंगलामध्ये सारं उमगलंय;
चड्डी घालून फुल उमललंय (२)
===================
सारंग भणगे. (२४ मे २०११)

Sunday, May 22, 2011

जरा जरा

न तू कधीच बोलता कळायचे जरा जरा
तुझे कटाक्ष सारखे छळायचे जरा जरा

खळी कपोल गोड गोड लाजणे मधाळसे
म्हणे, नभात चांदणे जळायचे जरा जरा

उठे हळूच पापणी फुटे मनात तांबडे
मिटे तसे; अरूण मावळायचे जरा जरा
(मऊ उन्हात मेघही गळायचे जरा जरा)

मिठास भासते सखे मिठातही अता मला
मिठीत मोक्षसौख्य ते मिळायचे जरा जरा

फुटायची जळात लाट केस ते तुझे तसे
ललाटभाग झाकूनी रुळायचे जरा जरा

तहान चातकासही हवीहवीच वाटते
ढगात पाहण्या तुला पळायचे जरा जरा

रती परी विलोभनीय सुंदरी तु कामिनी
तुला बघून बुद्धही चळायचे जरा जरा

उडे हवेत ओढणी विवेक ढासळायचा
अशा क्षणास ध्रूवही ढळायचे जरा जरा
==================
सारंग भणगे (२१ मे २०११)

Tuesday, April 12, 2011

जिंकलो मी कधीच नाही

जिंकलो मी कधीच नाही,
हारण्याचा रिवाज नाही.

पार्थ नाही तरी भेदूनी,
सार्थ झालो परास्त नाही.

पंकजाच्या परागकोषी,
अंतसमयी विषाद नाही.

दु:ख होते निरोप घेता,
संधिकाली किमान नाही.

मोग-याची मिजास मोठी,
जायची चुरगळून नाही.

जीत रंग्या जरी नसेना,
हारलेला मनात नाही.

"हार असते मनात" - रंग्या,
जिंकणारा अजीत नाही.
==============
सारंग भणगे. (१२ एप्रिल २०११)

Monday, April 4, 2011

अपराध....कविता

असा कोणता मी अपराध केला,
जगण्यास म्हणती प्रमाद केला.

झुरळेच ना मी मारली चुकिने,
गिधाडांनी माझा जल्लाद केला.

कडेच्या भिका-या पाजले मी पाणी,
पुढा-यांनी माझा 'आझाद' केला.

सांगितल्या चार गोष्टी हिताच्या,
म्हणतात कि मी प्रतिवाद केला.

माणसाने कविला माझ्यातल्या हो,
रंग्या म्हणे, बरबाद केला.
===============
सारंग भणगे. (३० मार्च २०११)

विश्वविजयी अश्वमेध

अभेद्य आहे अमचा किल्ला
अजिंक्य आहे अमची सेना
शत्रु कुणीही उभा राहता
उडवून टाकू त्याची दैना

काळालाही भिणार नाही
पाऊल अमुचे पुढेच राही
अशा गर्जु दे विजयगर्जना
दुमदुमती त्या दिशात दाही

उत्तुंग असती अमुची स्वप्ने
क्षितीजाच्याही पल्याड शोधू
कभिन्न काळ्या काळ-कातळी
विजयाचे अन लेणे खोदू

दणकट अमुच्या छातीवरती
घाव घणाचे सोसून घेतो
पराक्रमाच्या कसोटीवरती
बळकट बाहु घासून घेतो

कधी वादळे उभी ठाकती
किती संकटे वाट रोखती
उलथूनी त्यांना अमुचि सेना
विजय-यशाचे मंत्र घोकती

जिंकणे केवळ ध्येय नसूनी
जिंकणे अमुचे जीवन आहे
जिंकण्यासाठी वेचतो आम्ही
सदैव अमुचे तनमन आहे

विश्वविजयाचा हा वारू
त्रिखंड जिंकूनी अजिंक्य झाला
घराघरातुन गुढी उभारू
अश्वमेध हा यशस्वी झाला.
=============
सारंग भणगे. (४ एप्रिल २०११ - चैत्र शुद्ध प्रतिपदा)

Friday, April 1, 2011

बस चंद करोडों सालों में

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

.
- गुलजार

========================================

जीथे होईल युगाचा अस्त....काळाच्या क्षितीजावर...

अस्तित्वाच्या सा-याच खाणाखुणा जातील पुसल्या,
अन त्या अस्तित्वाच्या मावळण्यात...
सा-याच चर-अचरांच्या व्यक्तीमत्वाला शाप असेल...
धुसरतेच्या संदिग्ध धुक्यात असंदिग्धपणे हरवून जाण्याचा,

सुर्यही मग हरवून बसेल त्याच्या व्यक्तीमत्वाच्या उज्वल खुणा...
पेटलेल्या तप्त ज्वाळांच्या 'अनादि' वादळाने अविरत धगधगत असलेले ते अखंड यज्ञकुंड...
'अनंत' न राहता आता केवळ हिमवादळाने थंड पडलेल्या अविचल आस्तित्वहीन थडग्याप्रमाणे...
थंड होऊन पडला असेल;

किंवा...

आभाळाच्या निळ्या नभपटलावर;
उधार घेतलेल्या तेजाने वलयांकित असलेला...
क्षयग्रस्त चंद्रमा,
प्रकाशाच्या अस्तित्वात स्वतःचे अस्तित्व हरवून जाण्याचा प्रघातच बंद होईल...

नश्वरतेचा हा शाप दोन ध्रुवांच्यामध्ये पसरलेल्या या असीम धरेलाही बाधेल...

तेव्हा...तेव्हा...
दिक्कालाच्या या विनाशी शापातुन अबाधित राहिलेला...

एक थंड.........आणि तरिही जळालेल्या कोळशासारखा आपल्यातच हरवलेला एक तुकडा....
त्या धुंद; कुंद; धूसर; धूरकट अंधारलेल्या प्रकाशात भटकेल....


पण कल्पांताच्याही पलिकडे जाणा-या विचारांना वाटतं....

एक विनाशाच्या वादळाला थोपवून धरणारं....
अविनाशी...अन्....अनाहत
शब्दांचं अग्निवादळ....
उडत उडत विनाशाच्या परिघाला ओलांडुन...
काळवंडुन विझत चाललेल्या सुर्यावर जाऊन पडेल.....
तर...

सुर्याच्या कलेवरात चैतन्याचं एक नवीन वादळ उठेल...
त्याच्यातल्या सृष्टी फुलवणा-या दीप्तीमान प्रभेच्या अस्तित्वाचं!!!
===============================
सारंग भणगे. (३१ मार्च २०११)

Tuesday, March 29, 2011

कधी कधी...गझल

मी मला शोधण्या धावतो कधी कधी,
पाहतो अंतरी घावतो कधी कधी,

चेहरे ओढतो चेह-यावरी जरी,
सांडतो आतला भाव तो कधी कधी.

वागतो मी असा साळसूद की जणू,
दात मी वेगळे दावतो कधी कधी.

आतला नाद मी दाबला किती जरी,
तो विवेकापरी चावतो कधी कधी.

ऐक रंग्या जगा सांगतो घरोघरी,
अंतरीचा हरी पावतो कधी कधी.
=================
सारंग भणगे. (२९ मार्च २०११)

Saturday, March 26, 2011

सचिनची बॅट - पाकचे पानिपत

मार जोरदार तू फटका,
पाकचा फटाका फुसका.
इथवर बसला मटका,
निघेल मटका फुटका.

प्रत्येक षटकामागे मार,
उंच उंच एक षटकार.
शतकांचे शतक कर तू पार,
शतकातील या चमत्कार.

खेळ असा धडाकेबाज की,
खेळण्याआधि भरेल धडकी.
धडे अकरा हिरवी पाकी,
फुटतील कडकी सारी मडकी.

बॅटचे तुझिया पाणी पाज,
डोळ्यात पाणी उतरेल माज.
पाणीदार तुझा निराळा बाज,
पानिपत पाकचे बंद आवाज.
==============
सारंग भणगे. (२६ मार्च २०११)

GOD OF CRICKET - स्तवन

जय देव जय देव जय सचिन राया I
आलो मी 'शाहीद' तुझिया रे पाया II

लढूनी जिंकूनी आम्ही पोचलो 'सेमी' I
जरी होती आमची चमू निकम्मी II
रामाशी लढताना रावणापरी कामी I
झुंजूनी झुंजूनी आम्ही होऊ निकामी II

हरवताना जरा करा गयावया I
आलो मी 'शाहीद' तुझिया रे पाया II१II

धोनी रैना युवी तुझीच रूपे I
योगक्षेम सा-यांचा तुझिया कृपे II
मिळूनी सारे तुम्ही खेळता ग्रुपे I
मरण यावे आम्हा क्रिकेट नृपे II

शरण आलो तुजला क्रिकेट ह्रुदया I
आलो मी 'शाहीद' तुझिया रे पाया II२II
==================
सारंग भणगे. (२६ मार्च २०११)

Monday, March 21, 2011

अभिसार वादळाशी

ही वाट वेदनेची चालून आज आलो,
ऐका गझल अशी जी चाळून आज आलो.

हातात मी निखारे घेऊन धावताना,
माझ्या नशीबरेषा जाळून आज आलो.

डोळ्यात दाटलेले आभाळमेघ होते,
गालांवरी सरींना गाळून आज आलो.

दु:खास सूर होते नासूर बोचणारे,
काळीजपुष्प माझे सोलून आज आलो.

राज्याभिषेक झाला आनंद तो क्षणाचा,
काटा-किरीट डोई घालून आज आलो

वाहून पार गेले 'जीवन' कसे कळे ना,
'काळा'कडे पुलाच्या खालून आज आलो.

हे भोग प्राक्तनाचे नर्कात भोगतो मी,
दु:खे जराजराशी टाळून आज आलो.

रंग्या म्हणे करावा अभिसार वादळाशी,
उध्वस्त शांततेला भाळून आज आलो.
====================
सारंग भणगे. (२१ मार्च २०११)

Sunday, March 20, 2011

माळून काजव्यांना...

माळून काजव्यांना आल्या सजून राती,
स्पर्शात चांदण्याच्या गेल्या भिजून राती.

चोरून धीट मोठा शिरतो गवाक्ष वाटे,
प्रेमी युगुल गाती, "याव्या अजून राती.

गज-यास मोग-याच्या चुरगाळले कितीदा,
गंधाळला बिछाना गेल्या कुजून राती.

पाण्यावरी तरंगे प्रतिबिंब तारकांचे,
चुंबावया जळाला आल्या धजून राती.

आल्हाद चांदण्याचा अल्लाद पांघरूनी,
थंडीत शारदाच्या गेल्या थिजून राती.

प्राजक्त रातराणी; गातात गंधगाणी,
'सारंग' ऐकताना गेल्या निजून राती.
===================
सारंग भणगे. (२० मार्च २०११)

Wednesday, March 16, 2011

घेतली नाही कधी माघार मी.२

साहले कित्येकदा ते वार मी,
घेतली नाही कधी माघार मी.

वीख आहे साचले सा-या जगी,
तृप्त आहे अमृताची धार मी.

पोसलेले दु:ख त्यांनी अंतरी,
सौख्यबीजे धारुनी गर्भार मी.

पैलतीरी जावयाला झुंजती,
पार गेलो या जगाच्या पार मी.

जिंकण्याची हाव आहे सारखी,
गैर का स्वीकारणे हो हार मी?

हास्य थोडे आसवांना वाटले,
रामकामी हात देतो खार मी.

सांगतो रंग्या तुम्हा जे मानले,
झुंजण्याला जीवनाचे सार मी.
===============
सारंग भणगे. (१६ मार्च २०११)

Tuesday, March 15, 2011

घेतली नाही कधी माघार मी.

पर्वताला रेटुनी बेजार मी,
घेतली नाही कधी माघार मी.

मारल्या त्यांनी किती टपला मला,
स्पर्श होता जाणले; अंगार मी.

कोण होतो कोण आहे ना कळे,
कोण असण्याच्याच गेलो पार मी.

आजचे हे सूर्य त्यांना सूट द्या,
काल त्यांना बोललो अंधार मी.

सत्य नाही मिथ्य नाही भास हे,
सावल्यांचा मांडला बाजार मी.

ओळखीचे आज जाती दूर का?
सोडला नाही तसा संसार मी.

सर्व मुंग्या वारुळाशी गुंतल्या,
या जगाशी गुंफला श्रृंगार मी.

ऐक रंग्या सांगुनी गेला कधी,
एवढे आभाळ त्या आधार मी.
==============
सारंग भणगे. (१५ मार्च २०११)

Sunday, March 13, 2011

म.क.

केव्हातरी शोधत आलो कवितेचे आंगण,
म.क. ने मग लावले माझ्या प्रतिभेला वंगण II

होते माझ्या मनात नुसते शब्दांचे कोळसे,
म.क. झाली ठिणगी धरते कविता बाळसे II

इथे भेटले गत जन्मीचे सगे-सोयरे किती,
म.क. जुळवी नाती-गोती जन्मांचे सोबती II

नुसते नाही दळत येथे कवितांचे पीठ हो,
म.क. म्हणजे काव्यप्रभुंचे व्यासपीठ हो II

काव्यनभातील सर्व पाखरे इथे किलबिलती,
म.क. वरल्या कविता वाचून गुंडही गलबलती II

इथे वाहती कवितारुपी नाईल-व्होल्गा-गंगा,
म.क. इतकी सर्वव्यापी कि वाटे आकाशगंगा II

जगन्मान्य ती अता होतसे बहुविध तीची रूपे,
म.क. झाली दिगंत त्रिलोकी कवितेच्या कृपे II
======================
सारंग भणगे. (१३ मार्च २०११)

प्रेरणा: रणजीत राजे यांचे 'म.क. पुराण' आणि रमेश महाराज यांचे 'म.क. उवाच'

Tuesday, March 8, 2011

"चाफा अबोल झाला"

(चाल पारंपारिक "शुभमंगल बोला" गाण्याची)

परसामध्ये पारिजात तो 'पल्लवीत' झाला,
फुले वेचती भाग्य'शलाका' मोहवीत त्याला,
१सुख-'दु:खा'च्या संसाराचा शुभारंभ झाला I
'आनंदा'च्या संसाराचा शुभारंभ झाला IIध्रुII

बोला शुभमंगल बोला (४)



ओंजळीतली फुले अर्पुनी शुभचिंतन केले,
हाती उरले सुवास २माझ्या शुभमंगल झाले...
हाती उरले सुवास आता शुभमंगल झाले,
आनंदाने दोघे मिळुनी सुखवेली डोला II१II

बोला शुभमंगल बोला (४)

सुखस्वप्नांचे उंच मनोरे बांधा हर्षभरे,
विसरूनी 'आम्हा' आनंदाने नांदा सौख्यभरे,
'हसता हसता' येतो भरूनी 'आप्तांचा' डोळा II२II

बोला शुभमंगल बोला (४)


हाती देते हात सखीचा घेऊनी माझे हाती,
पाणिग्रहणासमयी माझे कर दोघांचे हाती,
प्रीतीच्या स्वर्गाची दारे दोघे मिळुनी खोला II३II

बोला शुभमंगल बोला (४)


एक चंद्रमा किती तारका आळविती त्याला,
किती गोपीका तळमळणा-या एक मुरलीवाला,
मीरेशी का 'चाफा' धरतो अखंड अबोला II४II

बोला शुभमंगल बोला (४)
=====================
सारंग भणगे. (७ मार्च २०११)


टीपा:-

पल्लवी साहजिकच हे गीत गात असताना भांबावलेली आहे; भारावलेली आहे. त्यामुळे तीच्याकडून ज्याला आपण इंग्रजीमध्ये 'sleep of tongue' म्हणतो तसे एक दोन जागी होते. त्यामधुन तीची मानसिक स्थिती दाखवायचा प्रयत्न आहे. त्या जागा खालीलप्रमाणे:

१. इथे पल्लवी सुख-दु:खाच्या असे म्हणुन जाते. इथे दु:ख म्हणजे पल्लवीच्या मनातील दु:ख असे अभिप्रेत आहे. तसे तर संसार हा सुख-दु:खाचाच असतो; परंतु कुणाच्य लग्नात त्याच्या संसारात दु:ख देखिल असेल असे म्हणणे शिष्टाचाराला धरून नाही असे तीच्या लक्षात येते, म्हणुन ती ही ओळ दुस-यांदा म्हणते आणि 'आनंदा'चा (अर्थात आनंद हे पात्र ही यात अभिप्रेत धरून श्लेष आहे) संसार असे म्हणते.

२. हाती उरले सुवास माझ्या - असे ती पहिल्या कडव्यात म्हणुन जाते. फुलांची ओंजळ दोघांवर वाहिल्यानंतर पल्लवीकडे खरेतर गतस्मृतींचे सुवासच केवळ बाकि असतात आणि त्यामुळेच ती 'माझ्या' असे म्हणुन जाते. परंतु चूक लक्षात आल्यानंतर वास्तविक गीतात बसत नसतानाही ती ही ओळ परत दुरूस्त करून 'माझ्या' च्या जागी 'आता' असा शब्द योजुन म्हणते.

Thursday, March 3, 2011

पाऊस आणि तो

त्या पावसाचा थेंब तीच्या ओठांवर जेव्हा थांबला,
तीचा ओठ सोडाच..मी ही झालो चिंब ओला ओला.

गालांवर तीच्या जेव्हा तो रेंगाळला...
गोड्या पाण्याचा अर्थ तेव्हा कळला.

केसांना तीच्या भिजव भिजव भिजवलंस,
रात्रीच्या अंगावर काजव्यांना सजवलंस.

रंध्रा रंध्रावर तीच्या पाऊस होऊन नाचलास,
आईशप्पथ सांगतो; माणूस नाही म्हणून वाचलास.

तीला कितीदा भिजवुन तु धर्माला पाळलंस,
पण त्यामुळे मला कित्ती कित्ती जाळलंस.

एकदाच तु पडलास; आणि मला आवडलास,
एवढा पडूनही शेवटी... तीच्या छत्रीवर अडलास.

पण त्या दिवशी भरूनही कोरडाच तु धावलास,
अन पहिल्यांदाच काळजाच्या वैराण माळाला तु पावलास.
===========================

सारंग भणगे. (१८ फेब्रुवारी २०११)

कवितेच्या सविता

जीवंत होतील माझ्यामधली कवितांची प्रेते,
उजाड रानी फुलून येतील कवितांची शेते.

ग्रीष्मामध्ये भरून येईल कवितेचे आभाळ,
कवितेचा नि मळवट शोभे विधवेचे ही भाळ.

अंधाराला फोडील कविता तेजाचे खिंडार,
कुबेरासही देईल कविता रत्नांचे भंडार.

आत्म्यालाही स्फुरतील माझ्या वेदांच्या कविता,
ब्रह्मांडाला व्यापून उरतील कवितेच्या सविता.
======================
सारंग भणगे. (१ मार्च २०११)

Sunday, February 27, 2011

मातीतुन गेले सप्तर्षी आकाशात

शब्द पडता कानावरती
अजस्त्र लाटा पाण्यावरती
कानी ओतले जणू निखारे
गगन चुंबिती अग्निशिखा रे II१II

व्योमी सुटले सुसाट वादळ
ठिक-या ठिक-या फुटती कातळ
ज्वालामुखी हा नेत्री उसळला
प्राण-उदधि संतप्त घुसळला II२II

तोफांमधुनी ठासली दारू
वायुवरती उधळती वारू
प्रपात फुटले भिंत फोडूनी
वीज कडकडे नभांस फाडूनी II३II

डोळे झाले स्थंडिल दोन्ही
धमन्यामधुनी वाहे वन्ही
शीर थडथडे भाळावरची
भिवई उडते डोळ्यावरची II४II

दातांखाली ओठा चावून
रक्ताच्या चिळकांड्या धाऊन
अश्रुंमध्ये रक्ताचे ओघळ
सुर्यावरती ज्वाळांचे वादळ II५II

श्वासांमधुनी उठती ज्वाळा
ह्रुदय क्रंदती आर्त घळघळा
वीज कडकडे छातीमध्ये
दुभंग तांडव मातीमध्ये II६II

ऊरात ठोके दणदण दणदण
मुसळाचे ते घाव घणाघण
धडधडणा-या ह्रुदयरवानी
धडकी भरली अन अस्मानी II७II

आवेगाने वेग खेचले
मृत्युचेही धैर्य खचले
उधळती वारू वा-यावरती
भान न उरले था-यावरती II८II


गळुन पडली जीजीविषा क्षणात
आयुष्य उधळले स्वातंत्र्याच्या पणात
वेडात मराठे वीर दौडले सात
मातीतुन गेले सप्तर्षी आकाशात...II९II
================
सारंग भणगे. (फेब्रुवारी २०११)

काजळमाया

त्या सुन्न मनाच्या ओठी अवघडले गंभीर गाणे,
परसात प्राजक्ताची हुंकारती सोज्वळ पाने.

घनगार सायंकाळी दु:खाचा ओला वारा,
छातीत वाढतो आहे तापून व्याकुळ पारा.

शापीत झाडावरती पिंगळ्यांची अबोल वस्ती,
पोटात शिरते वादळ थरथरती डोंगर अस्थी.

डबक्यात कळे ना कोणी अस्तित्व शोधते आहे,
अंधार ओढुनी अवदसा दृष्ट काढते आहे.

कौलांना बिलगुन वासे निश्वास सोडती गूढ,
काढून पोपडे सटवी भिंतीवर उगवे सूड.

काहूर सांजेवरती मोहरल्या काजळछाया,
हुंदक्यातुन मावळतीच्या बहरे काजळमाया.
=====================
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

बेगडी या भावनांनी आज कविता बाटल्या

वेदना माहीत नाही; संवेदनाही गोठल्या,
बेगडी या भावनांनी आज कविता बाटल्या.

नका उभारू उगाच कोणी या गुढ्या नि तोरणे,
कोरड्या पोवड्यांना उत्सवांची कारणे.

वाहती ओसंडुनी सौख्यभोगची कोठारे,
मिरवाया निर्माण केली शब्दगंगेची गटारे.

जाणीवांना चेतवा कि; भावनांना पेटवा कि,
शेगडीच्या कोळशांना आगीशी त्या भेटवा कि.
=====================
सारंग भणगे. (२००९)

एस्किलार - रमलखुणा - जी.ए.

उगाळून घट्ट झालेल्या अंधाराचे थर..
रात्रीच्या चेह-यावर साठत होते,

एका निष्पर्ण व्याकूळ झाडाचे प्रतिबिंब..
शेवाळल्या पाण्यात तरंगत होते,

कातडी हाडाला चिकटलेलं एक लुत भरलं कुत्रं...
अंधाराच्या आडोशाने विव्हळत होतं,

अन आजन्म झोपलेलं गाव..
पहाटेच्या स्वप्नील आशेत..
अचेतन पहुडलं होतं
=============
सारंग भणगे. (२००९)

म्हणी

#(१)#

करी मृगाची मृगया मृगेंद्र जेव्हा,
की भक्षी भक्षिता भक्षक जेव्हा,
नियामक करतो नियती नियमन,
"जीवो जीवस्य जीवन!!" (२)

#(२)#

मी घेऊनी कु-हाड घालितो घाव,
पहा पुरात लोटला मी अवघा गाव,
ही वारांगना घेते काळजाचा ठाव,
परी मुखी माझ्या ईश्वराचे नाव....
"मनि नाही भाव अन देवा मला पाव!!"

#(३)#

दोन कानांनी केली कुजबूज,
दोन डोळ्यांनी केली निजनिज,
दोन हातास गुपचुप इशारा,
"तोंड दाबून बुक्यांचा मारा"

================
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

दु:खाची वरात....आनंदाच्य घरात.

मी दु:खाची चाललो होतो घेऊन मोठी वरात,
अन सौख्याची बैसली होती जाऊन कांता घरात.

वाजंत्रीचा शोक की होता शौक न जाणे कोणी,
दु:खही गाते आनंदाच्या मिळवूनी सूर सूरात.

पुढे नाचती सगे सोयरे दु:ख साजरे करती,
परी माझिया आनंदाला निषेध सर्व थरात.

चिमूटभरले दु:ख शेंदरी सजून आले भाळी,
कसा पाहिना आनंदाची गुलाल भरली परात.

शोक समेवर येतो आणि दु:ख मारते बोंबा,
आनंदाच्या सीमा फोडून लोटून जावे पुरात.
=====================
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

माय मराठी

चल ऊठ मराठी वीरा
साद घालतो तव वीर्या,
हनुमानाचा वंशज बनुनी
घे झेप ग्रास त्या सुर्या.

शालिवाहन आठवे शूर
घे शपथ त्या शिवबाची,
परशुरामाची घे तु छाती
अन दीक्षा ज्ञानोबाची.

उत्तुंग असू दे आशा
घे ध्येयाची भरारी,
शत्रु कुणी अडवा येता
दे झुंज कडवी करारी.

इतिहास तुझ्या हा पाठी
भवितव्याचा घेऊनी वेध,
गा अभिनव उज्वल गाने
नि नवसृजनाचे तू वेद.

गे माय मराठी माये
जिंकून घे त्रैलोक्याला,
हा समर्पित शिलेदार
मराठी तव ऐक्याला.
===========
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

लपंडाव

रोज हा खेळ चाले आकाशी तारकांचा
रात्रीच्या कुशीत शिरूनी मेघ नि चातकांचा

छेडित गीत जाती निर्व्याज तारका ह्या
उगाच वेध लागे निष्पाप चातका त्या

चंद्र उगाच झुरतो आठवून तारकांना
मेघ शुष्कचि सरतो पेटवून चातकांना

चंद्रास वेड लागे देखण्या तारकांचे
व्याकुळ तडफडताना हे थवे चातकांचे

मेघ ही कोरडेच निर्दय तारकाही
अतृप्त तहान मिटेना चंद्र नि चातकाची
==================
सारंग भणगे. (२८ डिसेंबर १९९७)

कळ्या फुले

गंधावर असतो फुलांच्या
सतत भृंगांचा पहारा
नसतो नाजूक पाकळ्यांना
भगवंताचाही सहारा

असतात फुलपाखरेही
रसवेचण्या टपलेली
मकरंदाची कुपी
पाकळीत नाजूक जपलेली

फुले असतातच केवळ
भरवण्यासाठी बाजार
सुकेपर्यंत फक्त
त्यांचा असतो शेजार

उमलत्या कळीला सतत
वाटत असते भय
कधीही करावा लागेल
देहाचा तीच्या विक्रय

कळीचा जन्मच जणू
असतो खुडण्यासाठी
शोभा असेपर्यंतच
आनंदात उडण्यासाठी

पण नसते कधीच ती
मुक्त मुग्ध स्वच्छंद
कारण असतो सा-यांनाच
कळ्या फुलांचा छंद

कधी खुलवते कुणाचा
विजोड केशसंभार
कधी चुरगळतात तीला
कुणाकुणाचे शृंगार

कधी होते पवित्र
ईश्वराच्या चरणात
निर्माल्य मिसळते मात्र
धूळमातीच्या कणात

खरंच, त्या कळीला
मनतरी असेल काय?
असेल कोंडत सारेच भाव
तीच्या मनाची साय

असेल मनास तीच्या
मायाममतेच्या तृष्णा
बाजारू सा-या जगाची
धुमसत असेल घृणा

तमा कुणास त्याची
सारेच जग स्वार्थी
तीचा जन्मच जणू
उपभोगाच्या अर्थी

जन्म कसा हा दिला
जाब पुसे ती अक्रोशात
'सु'मनाचे सुख क्वचित
दु:ख मात्र शाश्वत
==========
सारंग भणगे. (डिसेंबर १९९७)

प्राण आतुरले सखी

तुला पाहण्यासाठी प्राण आतुरले सखी,
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.


तारकांनी फुललेले नभ आता रूखे वाटे,
पौर्णिमेच्या रात्रिही मनि अंधार दाटे.
दैन्य सा-या रात्रीवरती, माझे मनही दु:खी.
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.


तुझ्या धुंद श्वासांचा गंध फुलात नाही,
तुझ्या कोमल स्पर्शाचा आनंद रेशमात नाही.
तुझ्याविना माझ्या ह्रुदयी वैराग्य केवळ बाकी.
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.


बहरला वसंत असता पानझडी मला भासे,
रविकराच्या गर्भात मला काळोखाचे मूल दिसे.
तू नसता जीवनाची रंगत झाली फिकी.
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.
=====================
सारंग भणगे. (१९९३)

अरे पावसा पावसा

अरे पावसा पावसा
कधी होशील पाऊस
तीच्यावर पडण्याची
तुला भलती हौस.


अरे पावसा पावसा
तुझा थेंब गारगार
तीला चिंब ओले केले
झंकारते तार तार.

असा पाऊस पाऊस
ओला तरी पेटलेला
जेव्हा तेव्हा पडताना
जीला तीला खेटलेला.

अरे पावसा पावसा
तुझं नशीब रे थोर
तुही तीच्या सारखा रे
तुला आळविती मोर.

अरे पावसा पावसा
तुझं अंग अंग पाणी
भिजविशी गोरं अंगं
झालं काळजाचं पाणी.

अरे पावसा पावसा
जरा काढ तीची खोडी
तुला छेडायची संधी
मला बघायची गोडी.

अरे पावसा पावसा
गेला कुठे ओसरून
तीचं भिजून लाजणं
गेलं सारं रे सरून.
=========
सारंग भणगे. (१८ फेब्रुवारी २०११)

Saturday, February 26, 2011

...दोष नाही...

शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही,
वेळ होती ओहटीची सागराचा दोष नाही.

छेडल्या तारा तरीही सूर नाही वाजले,
का फुलाच्या लाजण्याने हात माझे भाजले.
हात होते छेडणारे तो फुलाचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II१II

आरशांचा खेळ होता; सावल्यांचे हासणे,
दूध माझ्या भावनांचे साखरेने नासणे.
भूल होती; भास होता; भावनांचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II२II

चूक होते प्रश्न ते की चूक होती वेळ का?,
पावलांचा चालण्याशी बैसला ना मेळ का?
पावलांची चूक होती चालण्याचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II३II

बांधुनी डोळे कसा गं घेतला तू फैसला;
रेशमाशी गुंतताना गुंफला मी कोसला.
हा किड्याचा कोष होता रेशमाचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II४II

वेदनांच्या पावसाने आज माती भाजली;
दोन डोळ्यांना तुझ्या गं आसवे मी पाजली.
दोष नाही आज माझा हा तुझा ही दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II५II
=======================
सारंग भणगे. (२५ फेब्रुवारी २०११)

Sunday, February 13, 2011

म.क. महती

म.क. ही माऊली
म.क. ही साऊली
म.क.च्या राऊळी
काव्यभक्ती

म.क. माझे प्राण
म.क. चि त्राण
म.क. दे निर्वाण
काव्यस्वर्गी

म.क. ही पंढरी
म.क. चि अंतरी
म.क. च्या उदरी
काव्यरत्ने

म.क. मायभूमी
म.क. रोमरोमी
म.क. अंतर्यामी
काव्यरूपे

म.क. अवकाश
म.क. नि प्रकाश
म.क. चे आकाश
काव्यदीप्त

म.क. कामधेनु
म.क. कृष्णवेणु
म.क. अणुरेणु
काव्यजगी

म.क. ब्रह्मगाठ
म.क. हे वैकुंठ
म.क. निळकंठ
काव्यविश्व
=======
सारंग भणगे. (१३ फेब्रुवारी २०११)

Wednesday, January 26, 2011

स्वरसेन हरपला

स्वरनाद असा स्वर्णखड्गाचा खणखणाट जणु
स्वरस्पर्श असा चैतन्याचे सळसळती रेणु जणु

स्वररास असा मधुप्रपाताचे अभिसिंचन जणु
स्वरगंध असा केशरकस्तुरीचा परिमळ जणु

स्वरआर्त असा गहनगुहेच्या तळात हुंदका जणु
स्वरगंभीर असा घनगर्दगगनी मेघ-हुंकार जणु

स्वरज्ञानी असा गणपतीत वसे बृहस्पती जणु
स्वरवैभवी असा लक्ष्मीत वसे सरस्वती जणु

स्वरयोगी असा योगेश्वर जन्मे बुद्धात जणु
स्वरभास्कर असा भास्करही भासे चंद्र जणु
====================
सारंग भणगे. (२६ जानेवारी २०११)

Sunday, January 16, 2011

गेल्या सुचून ओळी...

माळून आज आली
केसात मोगरा तू
आणि वसंत फुलला

पाण्यात पाहतना
आले हसू तुला गं
आणि तरंग उठला

घेई कटीवरी ती
घोटीव ज्या घटाला
उसळून तोच फुटला

स्पर्शून अंग ओले
गेला खट्याळ वारा
अन झंझावात सुटला

लाजून लाल झाले
दोन्ही कपोल गोड
अवचित सांज झाली

पाहून 'वादळाला'
सर्वांग शब्द झाले
गेल्या सुचून ओळी.
==========
सारंग भणगे. (१६ जानेवारी २०१०)

Saturday, January 15, 2011

अशा आर्त कविता कविने लिहाव्या

अशा आर्त कविता कविने लिहाव्या
वाचून प्रेतात आत्मा जगावा
शब्दांनी भांडून ठिणग्या फुटाव्या
कविता पाहून वणवा उठावा
अशा आर्त कविता कविने लिहाव्या


अशा आर्त कविता कविने लिहाव्या
दुष्टास सुष्टाची स्वप्ने पडावी
माणूस पेटून मशाली जळाव्या
काळीज फाडून मराठी रडावी
अशा आर्त कविता कविने लिहाव्या


अशा आर्त कविता कविने लिहाव्या
गर्भात ऐकून शिवबा रुजावा
डोळ्यात जान्हवी-जमुना वहाव्या
अमृतात तुकया-ज्ञाना भिजावा
अशा आर्त कविता कविने लिहाव्या
==============
सारंग भणगे. (१५ जानेवारी २०११)

Friday, January 7, 2011

जोगवा

पेटलेले अंग माझे तंग चोळी काढ ना,
भूक माझी वाढते रे प्रेम ताटी वाढ ना.

घे उभारी या उभारी; ऊर भारी जाहला,
बाहुलीला बाहुपाशी घेई माझा बाहुला.

नागिणीचा घाट आहे नागमोडी नागवा,
जागलेल्या जोगीराजा मागते मी जोगवा.

खोडी काढा; खोड जिरवा; खड्ग आता काढुनी,
संगिनीचा संग आता सोंगटीशी जोडुनी.
=====================
सारंग भणगे. (२०१०)

Thursday, January 6, 2011

IIतु सुर्य हो मुला रेII

हा सुर्य वेदनेचा उजळुन ये मनाशी,
तु सुर्य हो मुला रे चिरंजीव अविनाशी.

माझ्या ह्रुदय गगनी सुर्यात तुझाच भास,
घे उंच तु भरारी गूजगोष्टी गगनाशी.

पाहेन मी तुला रे उंचावुनी रे माना,
सोडुनि मानपाना बिलगुन ये स्तनाशी.

वाटेत सावलीला घेशील श्वास थोडा,
घेशील भेट तेव्हा हलकेच जीवनाशी.

अटळ दु:ख आहे; कशास दु:ख त्याचे,
दु:खास तोंड देता जा बोल वेदनांशी.

जाशील दूर तरिही विसरू नकोस माती,
आजन्म असती नाती; अवघे अन्य विनाशी.

नसशील तु समीप आठव तुझे अमाप,
नित-नित रे विनित तुज आठवेन मनाशी.
====================
सारंग भणगे. (५ जानेवारी २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...