Tuesday, July 29, 2008

मूड नाही आज

मूड नाही आज,

चल पळ त्रास देऊ नकोस,

मूड नाही आज।

उगाच नको देउस ग

डोक्याला ताप,

सांगितल ना

मूड नाही आज।

तू आलीस की होतो

डोक्याला त्रास।

ते आर्त विचारांचे आवर्त,

आवरता आवरत नाहित।

तुझे माझ्यावर कोसलणे,

सावरता सावरत नाही।

आणी मग,

सरता सरत नाही

सारी रात्र;

कित्येक सत्रच्या सत्र.....

नको बाबा,

आज पिच्छा सोड;

मूड नाही आज।

तू रात्रभर जागवणार;

मला भिजवणार;

तुझी भूक भागवणार,

आणी दुसा-या दिवशी ऑफ़ीसमधे

काम नीट झाले नाही म्हणून,

बॉस साला मला रागवणार।

नकोच नकोच।

जा आज तू,

आज.........मूड नाही आज।

तू एक तर

दुसा-या कुणाचा तरी

मूड बनवणार; किंवा

मूड घालवणार।

त्या पेक्षा सोयीस्कर आहे

मला असे म्हणणे की,

मलाच तुझा,

मूड नाही आज.

Saturday, July 26, 2008

अश्वत्थाम्याचे ह्रुद्गत

तुझ्याशिवाय जगायच?
अशक्य आहे।
हे अटळ मृत्यो!
तुझ्याशिवाय जगायच अशक्य आहे।

आज या पुरातन अश्वत्थ वृक्षाखाली,
उभा आहे मी;
पेलत भार; भाळातून वाहणा-या जखमेच्या वेदनांचा।
घेउन हातात प्राक्तनाचा भणंग कटोरा;
मृत्युमंदिरातल्या गाभा-यासमोर,
करीत यमदेवतेची आराधना।

हे अटळ मृत्यो;
तुझ्याशिवाय जगायचं? अशक्य आहे।

हे कृतका,
माझं आवाहन आहे तुला,
तुझ्या तळहाता एव्हढ माझं हे तडफ़डणार;
मृत्युच्या आशेत फ़डफ़डणार प्राणपाखरू
तुझ्या तळव्याखाली ठेचून टाक।
घे या प्राणविहगाचा ठाव; कायमसाठी।
वापर तुझी अमोघ शस्त्र,
अन् होऊ देत माझा अश्लाघ्य अंत।
तुझ्या कराल कवेत विसावण्यासाठी,
अधीर आहे माझा व्याकुळ जीव।
माझ्या या जीवनाच्या गावाला
फक्त एकच वेस आहे; जन्माची
आणी मग आहे
उंचच उंच तटबंदी;
आयुष्याच्या अंतहीन अमर्याद सीमांची।
लुब्ध करणा-या देखण्या नक्षत्रांनाही
लुप्त देण्याच वरदान आहे;
अन् लुकलुकणा-या तारकांनाही
निखळून तुटण्याच सौभाग्य आहे।

थकलोय मी आता घेउन;
भाळावरती भळभळणार हे प्राक्तन।
झाल्या आहेत यातना माझ्या असीम
या अनंत खिन्न अवकाशासारख्या।

हे आयुष्याचं लक्तर
मृत्युच्या चव्हाट्यावर फ़ेकण्यासाठी,
अवघं आयुष्य आसुसलयं।
मृत्युच्या कठोर आणी सर्वथैव अटळ
यमनियमाला सिद्ध करण्यासाठी म्हणून
माझ्या आयुष्याचा अपवाद का केलास।

उद्दामा, मृत्युघंटानाद करण्याऐवजी
नकारघंटाच वाजवतोस?
चल, माझं आहे तुला आव्हान;
अजिंक्या, आज तुला पराभूत व्हाव लागेल,
तुझ्याशी लढण्याच बळ नसलेल्या
या अश्वत्थाम्याच्या दुर्भाग्यापुढे।

हे धनञ्जयसूता,
असूया वाटते तुझ्याविषयी।
माझ्या पित्यान रचलेल्या मृत्युच्या चक्रव्युव्हात;
तुला जीवनापासून मुक्तता मिळाली;
यमदूताच्या कुशीत अलगद विसावयाची।
पण महापित्यान रचलेल्या जीवनाच्याया अभेद्य अच्छेद्य चक्रव्यूव्हात
मी अडकलोय,सतत मुक्ततेची आर्जव करत।
मरणोन्मुख असून,
अन् मृतवत जीवन जगून,
मरणाची कुठलीही आशा नसलेल्या
त्रिशंकु स्थितीत।

हे सर्वेश्वरा,
दिलीस तू कित्येक मर्त्यास
जीवन संजीवनी,
परंतु युगानुयुगे मृत्युमंदिराचे उंबरठे झिजवणा-या
या चिरंजीव अश्वत्थाम्यावर
कर उपकार, खोलून ते मृत्यूचे महाद्वार।
चिरंजीव असण्याची ही चिरंतन शिक्षा भोगणा-या मला,
मृत्युच्या शाश्वत सत्यापासून विलग ठेउ नकोस।

दे मला
त्या मृत्युदेवतेला पराभूत करणारा
महामृत्युंजय मंत्र,
या अविनाशी आयुष्याचा अंत साधण्यासाठी।

अन्यथा या लय पावणा-या सृष्टीत
प्रलयानंतर अवस्थित असतील
केवळ तीघेच.....
तू...
मी... अन्,
माझा अजिंक्य मृत्यु.

Tuesday, July 22, 2008

माझी प्रेमकहणी - एक लंबकाव्य

तुला पाहून माझ्या
मनात दाटले प्रेम
तुझे नी माझे
सारेच वाटले सेम।

ओळख व्हावी असं
सारखं वाटलं होतं
समोर येता जिभेवारच
पाणी मात्र आटत होतं।

आडोशामागुन मग
तुला मी बघायचो
भूमिगत प्रेमावीराच
जीवन मी जगायाचो।

तुझं हसण मोकळ
अन् मोहक चालण
आवाज तुझा मंजुळ
अन् मधुर बोलण।

तुझ्यापेक्षा तुला मीच
अधिक ओळखू लागलो
तव स्मृतींच्या पुष्पातला
मध चाखू लागलो।

दूरच्या टेकडीवर जेव्हा
वारा शीळ घाले
तुझ्या स्मृती देऊन
आतड्यास पीळ घाले।

स्वप्नांच्या क्षितीजावर
तूच तरळत असे
अन् श्वासांच्या संगात
तूच दरवळत असे।

आताशा स्वप्नांना मात्र
अर्थ आला होता
वाटल...आतापर्यंतचा काळ
व्यर्थ गेला होता।

स्वप्न नुसती पहावी किती
गेलो मी कन्टाळून
ठरवल....
टाकायच एकदा विचारून।

त्या दिवशी मी
आलो छान नटून
म्हटल एकदा
पहाव तरी भेटून।

तुला दुरून पाहता
गेलो मी बावरुन
जवळ यायच्या आत
स्वत:ला घेतल सावरून।

जवळ जशी येता तू
श्वास माझे दुणावले
अन् छातीमधले ठोके
माझे मलाच जाणवले।

उभा समोर राहता
गेलो पार गडबडून
अजाणता मग
काहीतरी बडबडून।

हसतच ओठात तू
हातात वही ठेवली
अन् हासत तुझ्या जाण्याने
सारी आग निवली।

पण आता पडला प्रश्न
काय मी बोललो?
भितीच्या पुंगीवर
कसा मी डोललो।

घाम पुसत मी
वही तुझी उघडली
अन् तुझ्या मनाची
घडी उलगडली।

शब्दकळ्या त्या पाहून
गाठ प्रेमाची सांधली
तू माझा 'सारंग'
मी तुझी 'गंधाली'।

अर्थ जसा कळला
भीती सारी पळाली
तुझ्या मनातली
नाती माझी कळाली।

मनोद्यानामध्ये
हास्यफुले उमलली
अन् हर्षाच्या आकाशी
इंद्रधनूषे उमटली।

आनंदाचे धबधबे
उसळून वाहिले
मानस सरोवर
हर्षलहरींनी व्यापिले।

निळ्या विभोर आकाशी
हर्षपक्षी उडाले
हर्ष - वायु संगे
प्रेमसंकेत धाडिले।

सूर्यकिरणातही
नकळत मार्दव आले
चन्द्ररश्मी भासूनी
मन चकोरेव झाले।

पुष्पसंचातील
झाल्या गंधित कालिका
अवसेला नभात होत्या
लुकलुकत तारका।

विश्व मोहर आला
आनंदाचा कहर झाला
मनाच्या बागेमध्ये
फुलांना बहर आला।

अलंकापुरी नटली हृदयी
लेउनी हर्षलंकार
मनाच्या मृदंगावरी
उमटले हर्षझंकार।

कल्पवृक्ष कल्पनेतला
आज सत्यात आला
गगन झाले ठेन्गणे
स्वर्ग वितात आला।

स्वप्नालाही सत्याचे
पंख मिळतात तर
कालसर्पाच्या दंती
अमृतडंख असतात तर।

आज हां 'सारंग'
गंधमय झाला
अन् गंधालीचा संग
सारंगमय झाला।

प्रेमाची ही मयसभा
मायाच केवळ ठरू नये
आत्माही प्रेममय व्हावा
कायाच केवळ वरु नये।

तीच्या ह्रुदयाताही
प्रेमफुल उमलले होते,
अन् गंधित त्या कळीवर
प्रेमदव उतरले होते।

अजाण म्हणून अव्यक्त
व्यक्त होता फुलल्या कळ्या
नकळतच दूर झाल्या
अजाण (न) वृक्षाच्या मुळ्या।

गंध नि रंगाचे हे
अपूर्व मिलन
नकळत उघडले
ह्रुदयाचे दालन।

आता तिची नजर
जराशी जड़ होती
अन् तिच्या कटाक्षात
माझी पड होती।

रात्री आता कठीण होत्या
दिवसाचीच प्रतीक्षा
खुळ्या स्वप्नातील राजकुमारी
भेटली होती वक्षा।

चन्द्ररश्मी शीतल तरीही
पोळू लागले मन
मार्तंड जरी तप्तही
भासू लागले तापहीन।

इन्द्रधनुच्या शरांनाही
मिळाली होती दिशा
शरपंजरी होतो मी
तरीही नजरेचीच भाषा।

नजरानजर होता
नजर ती चुकवित होती
नजर माझी मात्र
उत्तर किती विचारित होती।

शब्द तुझ्या ओठातले
मम ओठांनी वाचू का?
अन् गालांवरच्या मोहक
(ख)कळ्या मी वेचू का?

ओठांवरची लाली का
येई गालांच्या कुसुमी
आरक्त मुखचन्द्र देखत
मी म्हणतसे हसूनी

"शब्द मम ओठातले
तव अधरी रुळावे
चुंबनासही असे
अर्थ नवे मिळावे।"

जड़ पापणी उठे
आरक्त नेत्र दिसे
तिच्या ओठातूनी
माझे हास्य हसे।

तिच्या अधर खगांची
अधीर झाली फ़डफ़ड
अन् माझ्या ओठातील
बधीर केली बडबड

शांत सागारावारती
उठल्या अजस्त्र लाटा
मनाच्या पंखांनाही
फुटल्या सहस्त्र वाटा।

माझे ओठ तिच्या
ओठांनी चुंबित झाले
त्या अमीप सुखाने
स्वर्गही अचंबित झाले।

आता सुखाचे हे
असीम आकाश उलगडले
अन् तिने प्रेमपाशात
मला सावकाश पकडले।

पहिलाच तो रेशीमस्पर्श
हवाहवासा होता
हां साराच अनुभवही
नवानावासा होता।

होती त्या अनुभवासही
भावभवाची झालर
आत्म्यात अमुच्या
सत्यशिवाचे मंदिर।

असं आमच्या दोघांचं
दोघंचच प्रेम असतं
ते तुमचं आणी आमचं
कधीच सेम नसतं।

ऐका देउनी अवधान
या काव्याच्या अंती
तुम्हा रसिक सज्जनास
माझी कर जोडून विनंती।

मी सांगितली ही कहाणी
असं तीला सांगू नका
ती सांगू लागली तर
माहीत असल्याच दाखवू नका।

अन्यथा आमुची होइल
एक दर्दभरी कहाणी
भातुकलीच्या खेळातले होऊ
आम्ही राजा नि राणी.

Thursday, July 17, 2008

निळशार आकाश

नीळशार आकाश,
अचल, अडग, अविचल, निश्चल,
एका स्थितप्रज्ञ ऋषीसारख।
अविरत, अनादी, अनंत।
धीर गंभीर,
सदाशीवाच्या गळ्यासारख्न,
आल्हाददायक,
माधवाच्या कान्तीसारखं।
रात्रीच्या अंधारात,
आपल्याच कुशीत,
काळीशार शाल पांघरून विसावणार।
देखण्या नक्षत्रांना आणी लाजाळू तारकांना,
आपल्या असीम छातीत सामावणार आकाश।
रोज चंद्राला आपल्या कुशीत घेउन,
अंगाई गीत गात निजणार।
एखादा तारा तुटला,
की रडू आवरणार,
वसुंधरेच्या विरहात तळमळून,
आवेगात तीच्या भेटीला धावणार,
आणी धाय मोकलून रडणार आकाश।
मातीच्या कणाकणाला हिरवाईचा अंकुर प्रदान करणार,
आणी त्या गर्भित अंकुराला पाहून,
आनंदान विहंगम करणार आकाश।
अन् अखेरी,
प्रकाशाच्या अनंत किरणांनी
प्रसवणार
निळशार आकाश.

Wednesday, July 16, 2008

तू

निळ्या नभातील तू शुभ्र तारका;
पराग कुंजातील मधुर सारिका;
पुनव रात्रीची तू पूर्ण चंद्रिका;
पुष्प संचातील गंधित कलिका;
मुक्त स्वछंदी तू मुग्ध बालिका;
स्वर स्वर्गातील सुरेल गायिका.

Saturday, July 12, 2008

ओळखलेस का मला......... मी कर्ण

आज अवचित का हे अश्रु, अश्राप या धारा।
सुन्न विमनस्क वाहे, आर्त अनाथ वारा।

दाटले गर्द मेघ, घालमेल आभाळात।
हंबरडा विझतो, चितेच्या मूक ज्वाळात।

ममताळू मातेच्या, मायेची मंद ज्योत्स्ना।
ती दाट साय नवनीत, की संजीवनी जीवना।

चोचीत घेउनी चारा, भरविते चिऊ पिलास।
की अंचळास जाउन लुचते, आवेगे निर्व्याज पाडस।

उरात गडद होती, स्मृतिचित्रे मातेची।
मर्त्यास अखेर कूस, अक्षर या पृथेची।

लढण्यास सज्ज आहे, अखेरचे हे युद्ध।
हरण्यास साक्ष आहे, अजिंक्य हे प्रारब्ध।

गिळंकृत आजच झालो, फसले विचारचक्र।
शापित आयुष्यावरती, दाटले मृत्यूचे अभ्र।

इतक्यात हलला पडदा, काळीज थरकले।
निष्प्राण शंखात कुणी, जणू संगर फुंकले।

उचंबळल्या लाटा हृदयी, नेत्रात घळघळा पाणी।
कंपित झाले बाहू, अबोल झाली वाणी।

दिसताच करूण ती मूर्ती, आवेगात धरले चरण।
"ओळखलेस का मला", पुसले, "माते, मी कर्ण".

Thursday, July 10, 2008

ओळखलेस का तू मला?

गालांवरच्या खळ्या पाहता; गुलाबकळ्या उमलत हृदयी,

भाळावरच्या बटा उडवी; मोहक किती तुझ्या सवयी।

दुरुना येता तुज पाहता; भिरभिरती फुलपाखरे,

डुलू लागत कळ्याफ़ुले; अवघ्या वल्लरी वृक्ष सारे।

स्पर्शून येई समीर तुजला; तुटतुटे काळजाचे धागे,

तुझ्या स्मृतींच्या हिन्दोळ्यावर; काळ धावतो उगाच मागे।

आज आकस्मिक अशी भेटता; आठवणीन्चा गवाक्ष खुलला,

कशी निर्दया पुसतेस मज; "ओळखलेस का तू मला?"।

कल्लोळ मनाचा दावू कसा; मनी गुंफतो वधूमाला,

पाहून तव गळ्यास पुसतो; "ओळखलेस का(?) तू मला?"

तुझ्या

स्वप्न अजूनही डोळ्यात तुझ्या, सुर अजूनही गळ्यात तुझ्या,

दूर ना मी जवळच आहे, बघ ज़रा अंतरात तुझ्या.

Sunday, July 6, 2008

रुदन काव्य.

हलकेच जीवनावरुन कोणी हात फिरवावा
की त्याचा मोरपिसारा व्हावा।
हलाक्याच मायेच्या स्पर्शान,
पंखात उडण्याची उर्मी यावी।
हळुवार प्रेमाच्या शब्दांनी,
जीवनपुष्पाला गंध मिळावा।
कारुण्याच्या मायाळू हाकेने,
डोळ्यातून अश्रू ओघळावा।
एखाद्या वात्सल्यपूर्ण कुशीत,
मूक हुंदका फुटावा।
अश्रूंना बांध नसावा।
क्रंदनाला क्रम नसावा।
आक्रोशाला बंधन नसावीत।
रुदनाला सीमा नसाव्यात।
सार अंत:करण मोकळ होउस्तोवर
रडायला मिळाव.

ते दिवस.......... असे नसतील

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील,

असेल अवघे आकाश पेललेले....आज हे ओझे न पेलणा-या हातांनी,

असतील तारका मुठीत त्यांच्या, आजच्या रिकाम्या ओंजळीत,

असेल जिद्द आयुष्य उभे करण्याची, आज आयुष्यात उभे न राहू शकणा-यांच्यात,

असतील धुंद स्वप्न तेव्हा, आजच्या डोळ्यांच्या खाचात।

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील,

न्यायासाठी हात पसरायला लागणारे, अन् पसरलेले हात नसतील पडलेले भिजत घोंगड्यासारखे,

नसतील आजच्यासारख्या मिरवणूका, पण असतील भक्तीने कार्यात गुंतलेले जीव।

नसतील पुतळे त्यांचे, पण असतील त्यांच्या प्रतीमा हरेक ह्रुदयात।

नसतील वेदनेचे हुंकार, पण असतील प्रसन्नतेचे ओंकार।

नसतील नासलेले श्रृंगार, पण असतील ओथंबलेले प्रेम असीम।

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील,

भिंतींवर मृत प्राण्यांचे कातडे पसरून, शौर्याची केविलवाणी ग्वाही देणारे,

पण असतील मनुष्यातल्या पशुत्वावर, देवत्वाने मात केल्याचे।

वेदांचे भाट गात असतील, मुक्तीच्या रुचा,

अन् कवींना स्फुरत असतील, मंगल उषेच्या भूपाळ्या।

स्वप्नांचा झाला असेल अंत, एका स्वप्नपूर्तीच्या आरंभामुळे.......

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील.......

दूर दूर जाताना..............................

एक जवळची व्यक्ती करिअर साठी दूर जात असताना लिहिलेले काव्य.....

अंतर जरीही अनंत असले, अंतरी परी नसावे अंतर,
अभंग असतील अपुली नाती, मणि असावे प्रेम निरंतर।

जा झेपावूनी निळ्या आभाळी, कवळूनी घे तारांगण अवघे,
परी ये परतूनी या धरती वरती, साद घालता धावत वेगे।

खुणावती उत्तुंग शिखरे, विराट सागर अथांग क्षितीजे,
उरात असता अभेद्य आशा, अजिंक्य गगन भासेल खुजे।

बंधपाश जरी खेचतील तुजला, फ़िरून पाहू नकोस मागे,
खचशील परी पतंगापरी, तोडशील जर मागील धागे।

अखंड यत्ने जिंकून घे, आकाश अवघे असीम अवनी,
झेपेल इतकीच घे झेप, नको, घास मोठा छोट्या वदनी।

विसावयाचे विसरु नको, परी विश्रान्तीसी विराम हवा,
जिंकशील तीही लोक जरी, मनी अविरत श्रीराम हवा।

हां उपदेश नको मानूस बंधू, प्रेमाचे हे आलिंगन आहे,
शब्दात कितीही गुंफले तरी, अजून खासे अबोलच आहे।

Wednesday, July 2, 2008

सागरा प्राण तळमळला!




जर मी सावरकरान्सारखा त्या सागर किनारी असतो, तर कदाचित मला हे गीत स्फ़ुरले असते.सागरा प्राण तळमळला सारखे अजरामर गीत पुन्हा जन्मणे नाही. त्यामुले हे गीत हां तर खरा एक प्रामादच आहे. परन्तु कविच्या मनात स्फुरलेली एक कविता असे म्हणून ही काव्यपुष्पांजली स्विकारावी.

ढाळीन का मी अश्रु, माते असे वाटते तुजला!
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

ही अवघी वसुंधरा, नको स्वर्गाचा की वारा,
मज मायभू परी दूसरा, नको अन्य कुणाचा थारा।
तीज चरणी मज वाहू,
त्यास्तव मरण यातना साहू,
नेत्रातून वाहिल्या धारा, हां सागरकाठही भिजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

चीत्कार करी काळीज, अन् मनी सळसळे वीज,
जरी कायेची होवो झीज, पेरू स्वातंत्र्याचे बीज।
वीराची ही आरोळी,
रुधिराची खेळू होळी,
केवळ तव भेटीला, हां नश्वर देह मी पिंजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

गगनचुम्बी या इमारती, क्रिडेत अविरत कामरती,
काळीमाही जेथ अंधारती, ही पापाचीही अवनती।
हां विलास असे परी नंगा,
मज स्मरे हिमालय नि गंगा,
या सागरकाठी शिंपला, मी मोतीयासवे त्यजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

मज हनुमंताची वाटे असूया, साधली उरभेदाची किमया,
करी विश्वास हे अनसूया, न च अव्हेरुस माझी माया।
मज रात्रंदिन तुझाच ध्यास,
तव स्वातंत्र्या अर्पण श्वास,
जरी सूळावरी चढला, जीव तुझ्यावरी हां जडला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

हां आङ्ग्लभाषिक ढोंगी, करी मन्मातेला बंदी,
उन्मत्ता, अखेरची संधी, सुरु स्वातंत्र्याची नांदी।
करू क्रांतीचा उद्घोष,
अन् स्वातंत्र्याचा जल्लोष,
मम मातेच्या त्या भाळी, सूर्याचा तिलक सजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।






Related Posts Plugin for WordPress, Blogger...