Friday, November 25, 2011

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली,
तारे नि चांदणीला बिलगून रात गेली.

काळ्या नभात नक्षी नक्षत्र तारकांची,
रसिकास जागणा-या रिझवून रात गेली.

करते अमावासेला अंधार आपलासा,
मग कोर चांदव्याची खुलवून रात गेली.

हातात हात घेई ते हात चांदण्याचे,
पाशात रातराणी विसरून रात गेली.

ओवून तारकांना माळा गळ्यात घाली,
माळून चंद्र भाळी भुलवून रात गेली.

लावण्य काय वर्णू या यामिनी परीचे,
प्रेतात कामपीडा उठवून रात गेली.

आहे स्तनात माझ्या हे दूध चांदण्याचे,
वेडे चकोर सारे खिजवून रात गेली.

होत्या कडा रुपेरी त्या सावळ्या ढगांच्या,
मग केशरी कळ्यांना पसरून रात गेली.

ओठावरी फुलांच्या गाते पहाट गाणी,
गाणे मधाळलेले सुचवून रात गेली.

संकेत मीलनाचा देतो प्रशांत वारा,
प्राची शशांक भेटी ठरवून रात गेली.

भासे धरेवरी हे आकाश चांदण्याचे,
राने जमीन सिंधू भिजवून रात गेली.

पिवळी मिठी उन्हाने हिरव्या धरेस देता,
स्पर्शात तांबड्याच्या हरखून रात गेली.

गर्वात यौवनाच्या चंद्रास जाळु पाही,
चुंबून त्या रवीला हरवून रात गेली.

अपुल्याच पावलांचे सोडून माग जाते,
भेटायचे पुन्हा हे शिकवून रात गेली.
==========================
सारंग भणगे. (२१ ऑक्टोबर २०११)

Thursday, November 17, 2011

फार झाले

गझलेस आसवांचे भार फार झाले,
वाचाळ वेदनांचे वार फार झाले.

ज्वालाग्रही विषाने ओतप्रोत मिसरे,
हे कोळसे सुखाने गार फार झालो.

आभाळ पेलण्याचे शेर फार 'भारी',
उचलावयास यांना चार फार झाले.

विद्रोह मांडणारे धारदार मतले,
ते वार वल्गनांचे फार फार झाले.

घेतात शोषितांच्या यातनांचे मक्ते,
हे कागदी फुलांचे हार फार झाले.
========================
सारंग भणगे. (१४ नोव्हेंबर २०११)

Tuesday, November 15, 2011

आयुष्य बोच आहे

आयुष्य बोच आहे,
भाळी खरोच आहे.

जाळेन मी मनाला,
तितकीच पोच आहे.

मेले तरी जगावे,
माझीच सोच आहे.

हा गुंड माजलेला,
नेताही तोच आहे.

का टोचते मनाला,
माझीच चोच आहे?

सारी सुखे तुम्हाला,
अन हीच टोच आहे.
=============
सारंग भणगे. (२ नोव्हेंबर २०११)

Sunday, November 6, 2011

चारुगात्री

पापणी खालून तीर सोड नि कर वार सखे,
जिवणी खालून हसता चालते तरवार सखे.

हंसकांतीची मयूर सुंदरी मृगनयना तू,
हरिणीपरी तू चालून करशी संहार सखे.

सौष्ठव तव ते जरी झाकण्या प्रावरणे असती,
वसनामधुनी उमलूनी येती आकार सखे.

का उगा गजरा खोवून येशी वेणीमध्ये,
का उगा करावा चंद्रानेही शृंगार सखे.

जिंकण्यासाठीच जंग जंग मी पछाडतो तुज,
हारही आहे स्वीकार परि ना धिक्कार सखे.

तुजवरी मरणे हक्कचि माझा जन्मापासून,
तू एकच असशी जगण्यासाठी आधार सखे.

तू माझे जगणे माझे जीवन औषध माझे,
मी तुझाच रोगी तुझाच मज अन आजार सखे.

चांदण्यात भरली ओंजळ असते अंधाराची,
रात्रीस मजला असाच पाहिजे शेजार सखे.

मी वेडा झालो प्रीतीमध्ये हसती मजला,
तू परि हासता वेडावुनी मज सत्कार सखे.

बोथट जरीहि उपमा तरीहि तू चंद्रचि माझा,
हा मनातला मम दूर जाहला अंधार सखे.

धगधगणा-या ज्वालामुखीचा लावा जरी तू,
कवेत मजला घेऊनी विझवी अंगार सखे.

हे चारुगात्री रात्री गात्रे फुलविशी माझी,
हे व्योम तु धात्री प्रीतीदात्री स्वीकार सखे.

राग मी गातो आळविताना तुजला सारंग,
तारा मनीच्या छेडून उठती झंकार सखे.
============================
सारंग भणगे (२३ ऑक्टोबर २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...