Sunday, August 23, 2009

पाहूनं वादळ सुटलंय सुसाट.

----------------------
हिरव्याकच्च देठाची पोरगी अफ़ाट,
पाहूनं वादळ सुटलंय सुसाट.

गुलाब गो-या रंगानं;
काकडीच्या अन अंगानं,
येई अशी जशी येई पहाट,
पाहूनं वादळ सुटलंय सुसाट.

गुलमोहराच्या मोहरानं;
आंब्याच्या अन बहरानं,
शिडात वारं भरलंय पिसाट,
पाहूनं वादळ सुटलंय सुसाट.

सजीव मूर्ती कोरीव;
घाटदार वळणे घोटीव,
बेभान बेफ़ाम उत्तान लाट,
पाहूनं वादळ सुटलंय सुसाट.
==========================
सारंग भणगे. (२२/०८/२००९)

Saturday, August 22, 2009

ईथे ओशाळला म्रुत्यु (२) - तात तुमची कुशी मिळावी...

-----------------
हाय हा मी झालो अंध
नुस्ता रक्त-लक्तराचा गंध

ठसठसती या ठायी ठायी
जाळ जखमांची लाही लाही

कोंडुनी या बंदीगृहात
ही गिधाडे वाट पहात

मारून चोची तोडी लचके
श्वास मोजके आणि आचके

भ्याड श्वापदे अशी लुचती
हाडेकाडे सडून पिचती

नसानसांना गेली छिद्रे
सुमुख झाले वेडेविद्रे

बद्ध हाती-पायी बेड्या
फ़ोक फ़टके फ़ोडी नाड्या

अवयव ते सारे सुजले
रक्त-व्रणांनी शरीर सजले

देह पिंजला वेदनांनी
धीर खचला यातनांनी

मांडीची ती उशी मिळावी
तात तुमची कुशी मिळावी...
तात तुमची कुशी मिळावी...
======================
सारंग भणगे. (२२ औगस्ट २००९)

Sunday, August 16, 2009

जीवंत मरण..

-------------------------

रस्त्यावरचा कर्कश्श हॉर्न

कर्णबधिर करतानाच...

तुझ्यामागे फ़िरताना,

किती जणांचे कान बधिर केले..ते स्मरले,

आणि तो कर्णबधिर ध्वनि

तुला कर्णमधुर वाटायचा,

आणि तो ऐकण्यासाठी तु अधिर असायचीस,

असं; तुझ्या लडिवाळ लाघवी शब्दात..

तु सांगितल्याचं आठवलं.

त्या धुरात माखलेल्या चौकात..

तुझ्या बरोबर खाल्लेल्या पाणीपुरीचा स्वाद,

जीभेच्या सा-या संवेदनांना जागवीत,

तुझ्या स्वादिष्ट स्मृतींना संजीवन करून गेला,

अन् त्या स्मृतींच्या आस्वादात न्हाऊन निघालेल्या मनातुन,

एक घामाचा ओघळ..

तापलेल्या कानशीलाच्या मागुन निथळुन गेला.

आणि..

कुणीतरी..

कानशीलात वाजवावे..

असा एक कर्णकर्कश्श आवाज..

शेवटचाच..

काळजावर धुरकट ओरखडा ओढत..

डोळ्यातील आसवांच्या पिशवीला,

एक पाशवी टाचणी टोचत..

निघुन गेला...

तुझ्याबरोबर..

आणि तुझ्याबरोबरच्या त्या आठवणीं बरोबरच..

त्या जीवघेण्या अपघाताच्या..

स्मृतींना जीवंत करीत..

तुझा जीव एकदाच घेऊन गेला..

मला मागे जीवंत सोडुन..

रोजच माझा जीव घेण्यासाठी,

त्या जीवघेण्या..

आठवणींबरोबर जगण्यासाठी..

रोज एक..

जीवंत मरण..
=================

सारंग भणगे. (16 ऑगस्ट 2009)

भारत

-------------------------------------------
काही काळापुर्वी भारत या विषयावर झालेले विचारमंथन -
-------------------------------------------

"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...."

हे सांगण्यासाठी प्रतिज्ञा घ्यायला लागते तो माझा 'भारत देश' म्हणजे काय? वर्षभर मन मानेल तसं वागल्यावर तोंडी लावायला असलेल्या लोणच्यासारखं १५ ऑगस्टला सा-या भारतीयांची मनं अशी उचंबळुन कशी येतात? 'आपल्या देशात...' या वाक्यागणिक स्वत:च्याच देशाचे उट्टे पदोपदी काढणारे, भारत-पाकिस्तान मैचच्या वेळी डोळ्यांच्या दुर्बिणी करून टी. व्ही. कसे काय पाहतात? बैलपोळयालाही पुरणपोळी करून खाणारे आपले भारतीय १५ ऑगस्टला साधे शिकरणही करीत नाहीत. अशांच्या मनात राष्ट्रीयत्वाची ज्योत कशी काय असते? ब्राह्मण-मराठा,श्रेष्ठ-कनिष्ठ अशा अनेक भेदांच्या भिंतींनी भेगाळलेला याच राष्ट्रातील हा समाज तिरंग्याच्याखाली मात्र न फ़ुटणा-या पाण्यासारखा एकत्र येतात, ही जादू कसली? या सा-याच्या मागे असणा-या राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना, राष्ट्रीयत्व अशा भावनांचा अमूर्त प्रेरणास्त्रोत कुठला? ती अदृश्य स्फ़ुर्तीगंगा कुठली?

राष्ट्र नावाची संकल्पना कुठल्यातरी प्रगल्भ मनाच्या अत्युत्कट अवस्थेमध्ये झालेला उदात्त भावनाविष्कार असावा. राष्ट्र ही एक संकल्पनाच असू शकते.

राष्ट्र किंवा देश म्हटल्यावर भौगोलिक प्रादेशिक निष्ठा कदाचित असू शकतील. परंतु जर राष्ट्र म्हणजे केवळ एक विशिष्ट भूभागच असेल तर आपल्या भूभागाशी जोडलेला, जिंकलेला नवा भूभाग हा कदाचित राष्ट्र म्हणता येणार नाही, किंवा मग त्याला वाढलेले राष्ट्र असे म्हणावे लागेल.

राष्ट्र म्हणजे नावाशी निष्ठा असेल तर ती एकाच नावाशी असू शकते. भारत, इंडिया, हिंदुस्थान अशा विविध नावांशी असलेली निष्ठा त्या नावाच्या मागे असलेल्या राष्ट्र नावाच्या भावनिक व मानसिक संकल्पनेशी निगडित असते. राष्ट्र म्हणजे एखादा आकार, भूभाग, त्या भूभागावर उभी राहिलेली सभ्यता व संस्कृती, त्या भूभागाचे नाव अशा सा-या गोष्टी असू शकणार नाही. कदाचित या सा-याच्या समन्वयातूनच राष्ट्र या संकल्पनेचा उदय होत असेल. परंतु या सर्व घटकांचा राष्ट्र कल्पनेची बांधिलकी नसतेच.

राष्ट्र म्हणजे मुख्यत: एक विशिष्ट भूभाग असेच मानले जाते. परंतु राष्ट्र या संकल्पनेचे त्या राष्ट्राचा भूभाग हे केवळ एक मूर्त व पार्थिव स्वरूप आहे. मूलत: राष्ट्र संकल्पनेचा मनाशी निगडित असलेला हिस्सा अधिक महत्वपूर्ण व वर्चस्वपूर्ण आहे.

राष्ट्र हे एक तत्व आहे. ते मानवी अभिव्यक्तीच्या पलिकडे असते. मनावर कोरल्या गेलेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावना पुसणे हे कदाचितच शक्य असते. परंतु राष्ट्र नावाची संकल्पना पुसणे मात्र शक्य नाही.

प्रत्येकाला या उघड्या निळ्या आकाशाच्या छताखाली राहण्यासाटी घराचं छप्पर हवं असतं. प्रत्येकाला निळ्या विभोर आकाशात उडण्याची ईच्छा असते, माणसाची मुक्ततेची कल्पना अशीच असते. पण तरीही घराच्या छपराखालची बंधनयुक्ततेची ऊबही माणसाला हवीच असते.

राष्ट्र असेच आहे. विश्व निळ्या आकाशासारखे व्यापक आहे तर राष्ट्र हे घरासारखे आहे. राष्ट्र नसलेला, राष्ट्रीयता नसलेला माणूस बेघर भिका-यासारखाच असतो. कुठल्याही राष्ट्रात सुखाने राहणारा माणूस आपल्या मनातल्या राष्ट्राशी मात्र निष्ठा सांगतो. राष्ट्राचा संबंध केवळ भौगोलिकतेशी नसून मानसिकतेशी असतो.

सर्व धर्मशास्त्रांप्रमाणे ईश्वर हा निर्गुण व निराकार आहे. ईश्वराला आकार नाही, रूप; रस; गंधादि विकारही नाहीत, आणि म्हणूनच तो अव्यक्त आहे. पण अशा निर्गुण, निराकार अव्यक्ताला व्यक्तित्व किंवा व्यक्त स्वरूप घेण्याची स्फ़ूर्ती होते तेव्हा "एकोSहं बहुस्याम्' या संकल्पातुन तो मूर्त रूप धारण करतो.

त्याचप्रमाणे मनातील राष्ट्राची संकल्पना स्वरूपतः मूर्त होण्यासाठी त्याला भौगोलिक आकार, लोक, व्यक्ती, संकृती, ईतिहास, राज्यतंत्र, घटना, संविधान, राज्यपद्धती या सर्व गोष्टींची आवश्यकता भासते.

'छोटा चेतन'ला रंग, रूप, रस, आकार नव्हता, पण अस्तित्व होते. तरिही, जगात वावरण्यासाठी या सा-याची जरूर होतीच. अन्यथा जगाने त्याचे अस्तित्वच मान्य केले नसते.

तसेच माझे राष्ट्र हिंदुस्थान हे सांगताना, तो कुठे आहे हे सांगणे बंधनकारक आहे. "हिंदुस्थान हम दिल में लिये घुमते है" हे वाक्य कदाचित सिनेमात चालु शकेल, पण मनातला तो हिंदुस्थान कुठे आगे हे सांगण्यासाठी हिमाचलाच्या मुकुटाने शोभायमान, अंगावर गंगा-यमुना-ब्रह्मपुत्रेचे अलंकार घातलेला, हिरव्या वनश्रीची वस्त्रे परिधान केलेला आणि तीन सागरांच्या अद्वितीय संगमावर 'भूमातेच्या चरणतलांचे' पादक्षालन करत असलेला ऊत्तम, ऊदात्त, पवित्र आणि स्वतंत्र असा भूमीलेखच असला पाहिजे.

====================================
सारंग भणगे. (१५ औगस्ट २०००)

Wednesday, August 12, 2009

ईश्काची गझल

वृत्तः आनंदकंद (गागालगा लगागा)

गुंतून मी पडावे की सोडवून घ्यावे
खड्गास या दुधारी सांगा कसे धरावे

गोडीत त्या गुलाबी गंधात धुंद झालो
बंदीस्त पद्मकोशी सांगा कसे सुटावे

पेल्यात वीख होते ओठात प्यास होती
ओठास तोषवावे व्याकूळ की मरावे

गोठून पार गेलो पाशात प्रेयसीच्या
आगीत लोळताना का गारठून जावे

जाऊ कसा फ़ुलांच्या अलवार बाहुपाशी
काट्यात सोलताना सांगा कसे हसावे

केली अखेर गल्ती ईश्कात गुंतण्याची
गुंतून पुष्पकोशी सारंग-दंग व्हावे
==========================
सारंग भणगे. (10 ऑगस्ट 2009)

Saturday, August 8, 2009

कल्पीच्या गझलवरून

(वृत्त आनंदकंद - गागालगा लगागा गागालगा लगागा)

हास्यात गोड तुझ्या कळ्या फ़ुलून येती
सुस्नात कुंतलाच्या डोई डुलून येती

ता-यात चांद वेडा एकाकि तो दिवाणा,
पाहून तारका त्या त्याला भुलून येती.

बोलावितो कुणाला वारा उदासवाणा,
कळ्या फ़ुलात वेली थोड्या झुलून येती

गाताच काव्य होते व्याकूळ सांज जेथे,
त्या श्यामला सखीला आसू खुलून येती.

पाण्यास काय त्याचे काठांस दुःख झाले,
आटून नीर जाता भेटी जुळून येती.
=============================
सारंग भणगे. (8 ऑगस्ट 2009)

मित्रहो नियमानुसार गझल लिहायचा प्रयत्न केला आहे. काही ओळी उत्स्फ़ुर्त आहेत, काही जुळवल्या आहेत. एक प्रयत्न आहे.

कदाचित तंत्रात बसते आहे, मंत्रात कितपत बसते आहे ते तुम्ही ठरवा.

आपल्या सुचनांचे स्वागत आहे!

Sunday, August 2, 2009

काजळले दिवे

___________
ओसरीत दिवा
कण्हत राहिला
दु:खाचे गाणे
म्हणत राहिला

घराच्या नसात
ठसठसतो प्रकाश
भिंतीवर सावल्या
भेसुर भकास

छताशी झोंबतात
आठवांचे पिंजरे
घुशींच्या खिंडारात
हिंडतात मांजरे

तुटक्या पाय-यांचे
खचलेले सोपान
वंशावळीतुन
फ़ाटलेले पान

डोळ्यात फ़ुटलेला
अश्रुंचा घुळणा
कणकीचा दिवा
रिकामा पाळणा
===========
सारंग भणगे. (३१ जुलै २००९)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...