Sunday, October 27, 2013

दुःख


ऐकण्या पुरतेच त्याला चाहते,
दुःख माझे मूक होऊ पाहते.

काळजामध्ये कट्यारी खोवल्या,
भावना रक्तात माझी नाहते.

गर्भ माझा वेदनांनी अंकुरे,
आसवांचे मूल डोळी वाहते.

दु:ख आहे पोरके माझ्यापरी,
प्राण माझा होऊनी ते राहते.

द्रौपदीचा वारसा माझ्याकडे,
पंचप्राणांच्या चुकांना साहते.
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)
 

Wednesday, October 2, 2013

प्रिया बावरी



तुझ्या रूपाने संमोहित हि झाली अवघी धरणी
नयनअंगणी मधुबन फुलले तुला पाहुनी सजणी
...
किती साजिरा तुझा गोजिरा मला चेहरा वाटे,
मयूरपिसारा जणू पाहुनी नभ मेघांनी दाटे,
सारंगांना भीती नसे कि फुलाभोवती काटे.

रती-अप्सरा भरतील पाणी प्रिया तुझिया चरणी,
नयनअंगणी मधुबन फुलले तुला पाहुनी सजणी II१II


गोड गोजिरी लाज लाजरी तुळसमंजिरीसम ही,
निरांजन मी म्हणू तुला कि देव्हाऱ्यातील समई,
भूपाळीची हाळी जैशी येते प्रभात समयी.

जरी झुरावे कुणी कितीही प्रिया उमेशराणी,
नयनअंगणी मधुबन फुलले तुला पाहुनी सजणी II२II
---------------------------------------------------
सारंग भणगे (१ ऑक्टोबर २०१३)



Related Posts Plugin for WordPress, Blogger...