Monday, January 18, 2016

जखमा भरून येतील

जखमा भरून येतील....
तू सुखाने जा,
आठवणींची थोडी हळद.. 
मागे ठेऊन जा

आपण माळलेल्या फुलांच्या माळा 
हव्या तर चुरून टाक,
पण त्यांच्या नि:श्वासांचा दरवळ
मागे ठेऊन जा

दूर देशी गेलेले पाखरांचे थवे 
परतायचे नाहीत,
पण उध्वस्त घरट्याच्या काटक्या
तशाच ठेऊन जा

आपण जगलेल्या क्षणांना पुन्हा जिवंत करणं
आता शक्य नाही,
पण त्यांच्या अश्मावर अंगठ्यान
अश्रूंचं पाणी सोडून जा

मेलेल्या नात्याचं हे शव
क्षणाक्षणांची गिधाडं खाऊन टाकतील
भटकणाऱ्या आत्म्याला
दुसऱ्या नात्याचं शरीर देऊन जा
----------------------------------------
सारंग भणगे.
(१७ जानेवारी २०१६)

Monday, January 11, 2016

मनमंदिरा

घनतिमिराच्या गर्भामधुनी तेजोवलये दिव्य प्रसवतील
तेजोचर घनदाट वनातील अवनीवरती ते अवतरतील

पशुपक्ष्यांचे हे वन भुवन
शांतीरसाचा निर्झर पावन
गानसुधेचे अमृत पाजून
चराचरातून जागवू जीवन
मानस गगनी आनंदाचे नभचर देखिल पंख पसरतील

स्वरगंगेला धाडू निमंत्रण
मैफल अद्भुत घडवू आपण
आनंदाची फिरवून गोफण
निपटून टाकू दु:खाचे तण
सप्तसुरांची सुरा प्राशण्या सुरासूरही खाली उतरतील

नादब्रह्मस्वर भूवर आणून
संगीत फुलवू अणुरेणुतून
स्वरवेदांचे हे आवर्तन
स्वरदेवाचे करते पूजन
तन-तंबोरा मन-मुरलीने स्वरराज्ञीला तू तुष्टवशील

होऊनी निर्मम
करिता साधन
निश्चित मिळते
प्रतिभेच धन

तन मन अन धन
श्वास नि स्पंदन
स्वरस्वतीला
अर्पण जीवन

तन्मय तल्लीन
करणे गायन
हेच असावे
साध्य नि साधन

गगनमंडपी सार्थकतेचे लाखोतारे लख्ख उजळतील
काळोखाचा फोडून कातळ तेज बीजाला अंकुर फुटतील
===================================
सारंग भणगे
(११ जानेवारी २०१६)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...