Sunday, July 26, 2009

विद्युल्लतेची आरती

------------------------------------

जयदेवी जयदेवी जय तडितादेवी ।
मेघ-स्फ़ुल्लिंगातुनि जन्मासी येई ॥
प्रकटूनी निमिषार्धे जरी लुप्त होई ।
रूद्राच्या नेत्रासम प्रदीप्त होई ॥१॥


गगनाच्या गर्भातूनी गर्वाने गर्जे ।
सृष्टीच्या सृजनाचे श्रृंगार सजे ॥
वाजे वाजे ढग-पखवाज वाजे ।
भाजे भाजे भानुमती वीज भाजे ॥२॥


कुणी विद्युल्लता कुणी म्हणे वीज ।
मेघधारांचे धारियले बीज ॥
कडकडता व्योमी हो ऐसा आवाज ।
प्रणवाचे हुंकार भरी कुणी द्वीज ॥३॥

------------------------------------
सारंग भणगे. २२ डिसेंबर २००८.
------------------------------------

Friday, July 24, 2009

तळे


उंच सुंदर डोंगर होते
तळास त्यांच्या तळे होते
आभाळाच्या प्रतिबिंबाने
पाणी तळ्याचे निळे होते

सभोवताली झाडे हिरवी
रंगीत पक्षी नभात मिरवी
गालांवरती अवखळ वारा
हात, तळ्याच्या अलगद फ़िरवी

उठे शिरशिरी जळावरती
गोड लहरी तळ्यावरती
हसू उमलते ओठांमध्ये
भान उरे ना ताळ्यावरती

मऊ लव्हाळी हळवी काठी
पानफ़ुलांची सुरम्य दाटी
प्रतिबिंबातुन तळे घेते
आकाशाशी गाठीभेटी

नभी अचानक मेघ जमले
गगन मंदिरी म्रुदंग घुमले
तळ्यामधल्या जळासंगे
जळथेंबांचे नाते जमले

तळ्यात काही जळचर होते
दर्शन त्यांचे पळभर होते
नितळ निळ्या पाण्यावरती
स्फ़टिक शुभ्र ते दहिवर होते

कमळफ़ुलांची पुष्करिणी
तळ्यात फ़ुलली कुमुदिनी
मोहक रमणी रूपवती
जणू पाहे निळ्या दर्पणी

नभी अवतरे शशांक रात्री
हळुच ऊतरे निलजलपात्री
अंग झाडता गळे चांदणे
तळे शहारे पुलकित गात्री

नि:शब्द रात्रीच्या ऊत्तर प्रहरी
ऊभा पाहुनि ध्यानस्थ गिरी
वरती ऊठती चंचल लहरी
निश्चल होते तळे अंतरी

निश्चल होते तळे अंतरी
========================
सारंग भणगे. (जुलै २००९)

Thursday, July 16, 2009

एकदा पुन्हा मला लहान व्हायचंय

------------------------
सोडले मागे कितीतरी, किती घ्यायचे राहिले,
पुढे पुढे जाताजाता, मागे कधिच ना पाहिले.

भूतकाळी बालपणीच्या एकदा गहाण रहायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

मागे राहिले बाल्य हिरवे नि गुलाबी तारूण्यही,
निष्ठुर कोरड्या जगरहाटी प्रेम विरले कारूण्यही.

सारे झिजावे मजसाठी अशी सहाण व्हायचंय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

शौक उनाड शिवाराचे; अल्लड पाणी विहीरीचे,
आंबटचिंबट चिंच-आवळे आणि कच्च्या कैरीचे.

दमून गेल्या मैदानाची मला तहान व्हायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

आजीआबांच्या गोष्टींची मजाच असते न्यारी,
आईबाबांच्या ओरड्याची सजाच असते प्यारी.

खेळुन खेळुन तुटलेली मला वहाण व्हायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

जत्रेमधला चिकटमेवा चन्यामन्या आंबट बोरं,
फ़ाटक्या रबरी चेंडु मागे धावतात सारी पोरं.

तासापुरतंच खोटं खोटं मला शहाणं व्हायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

करता जर आली मला ग्रह नक्षत्रांची हेराफ़ेरी,
काळाच्या या चक्राला फ़िरवता आले जराजरी,

तेवढ्यापुरतं तरी मला थोडसच महान व्हायचय,
खरं सांगतो एकदा पुन्हा मला लहान व्हायचय.
=================================
सारंग भणगे. (15-16 जुलै 2009)

Wednesday, July 15, 2009

मनाच्या फ़ोडणीच्या कविता

मळभ दाटले आकाशात
चिंब देह धरतीचा
तळ्यात बुडाला चंद्र हा
मार्ग धुंडाळी परतीचा.

निळीसृष्टी भेदरली
पिसे झाले क्षितीजही
मान वाकूनि झाड हे
आत्म्यात शोधते वीजही.

अज्ञाताच्या वाटेवर
निर्गुण सावली सरकते
पहाटको-या सुर्यस्तनात
किरणक्षीर पाझरते.

देह झाडाचा सुरकुतला
हात पसरूनी अस्ताव्यस्त
मागे क्रूर उन्हास
हिरवाईचा वरदहस्त.

मऊ रेतीचा पाऊलास
असा हळवा स्पर्श
कुणी हळुवार जशी
फ़िरवावी मोरपीसं.

भिजल्या रात्रीत
थिजले मौन माझे
शब्द रातकिड्याहून
ठरले गौण माझे.

बिनधास्त कोकिळा ही
स्वरसाज आळविते
मल्हार छेडता मी
पिंगळ्यास बोलाविते.
===============
सारंग भणगे. (केव्हातरी...कुठेतरी)

Saturday, July 4, 2009

अभिसार

घेशील देह हा कवळुन बाहुपाशी
घेशील कुंतलांना माझ्या तुझ्या उशाशी
गात्रात मारव्याचे सूर जैसे उठावे
गाण्यात प्रणयवेड्या तु मलाच आळविशी

गोकुळ यौवनाचे भरून तुडुंब वाहे
तु मत्स्य प्रणयाचा तळ्यात डुंबताहे

बुडून जा सख्या रे ने मजलाही बुडाशी
प्रणयसिंधु पोहताना पीळदार हो खलाशी (१)

प्रत्येक पाकळीला तु चुंबुन चिंब घ्यावे
अगणित पाकळ्यांची मी रे कळीच व्हावे

रसात रे विलासी रमलास मधुकोशी
माधुर्य चाखताना रचल्या प्रणयराशी (२)

भरले कणीस रूपाचे शीवार अनावर झाले
ते पाहुनी उपाशी जोरात जनावर आले

मधुचंद्र जोंधळ्याचा चाले चांदण्याशी,
अभिसार पाखरांचा हो बुजगावण्याशी (३)
==================================
सारंग भणगे. (जुन २००९)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...