Tuesday, June 25, 2013

आकाशस्थ

संथ वाहत्या पाण्यावरती
शशि शलाका नर्तन करती
चंदेरी पाण्याची ओंजळ
तळ्यात धरते सुंदर धरती

अवघ्राण झुकूनी घेतो चंद्र
सलील हसते लहरीतुनी मंद्र
तनु शहारे रात्रीचे अन्
रोमांचित होते रंध्र नि रंध्र

असा अवतरे आकाशस्थ
चाळविण्या अवनीचे चित्त
श्रृंगाराला किनार सात्त्विक
काठावरले गिरि ध्यानस्थ
================
सारंग भणगे. (२४ जून २०१३)

 

Friday, June 21, 2013

झाली संध्याकाळ


जीवन धागे विणता विणता झाली संध्याकाळ
उसवीत गेला काळ क्षणांना झाली संध्याकाळ.
 
फुलाफुलांनी सजली असते आयुष्याची बाग,
परी अखेरी जाळून जाते देह चितेची आग.
मनी कुणाच्या पेटून उठतो आठवणींचा जाळ!!
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
 
कुणी लावते आठवणींचे दीपक संध्याकाळी,
कुणी विराणी उदासवाणी गाते संध्याकाळी.
घनदुःखाने भरून येते डोळ्यांचे आभाळ
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
 
संध्याछाया भिववत असता कशी सोडली साथ,
हात द्यायच्या वेळी सुटला कसा नेमका हात!
हृदयामध्ये घुसत राहतो एकांताचा फाळ
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
========================
सारंग भणगे. (२० जून २०१३)

Sunday, June 16, 2013

केतकीचे अंग माझे गंधवेडा नाग तू

केतकीचे अंग माझे गंधवेडा नाग तू
मार्ग तो मी ज्यास नाही थांग त्याचा माग तू
 
जेवढा तू राधिकेचा गोपिकांचा तेवढा,
मी फुलांचा ताटवा अन ताटव्यांची बाग तू

गुंतलेले केस माझे सोड रे तू मोकळे,
छेड तारा कुंतलांच्या आळवूनी राग तू

पाहते मी स्वप्न ज्याचे मी तयाची चंद्रिका
एकमेका पाहण्याला झोपते मी जाग तू.

घे सुखाचा घास तू अन मी उपाशी दु:खिता
ताट माझे जेवताना पाहिजे तर माग तू.
==========================
सारंग भणगे. (२ मार्च २०१३)

बेधडक


मी दिली आमंत्रणे
वेदनांनो भेट घ्या,
घाव घालू नका पाठी
जीव माझा थेट घ्या.

हारलो मी संकटांना
जिंकण्याची जिद्द आहे,
हारणे मी हीच त्यांच्या
... जिंकण्याची हद्द आहे.

घालती आघात माझ्या-
वरी वैरी दैव माझे
झुंज देणे हीच भक्ती
सांगती मज देव माझे.

धाड दूतांना यमा मी
बांधले आहे कफन,
कोण होते ते बघूया
या धरेखाली दफन
==============
सारंग भणगे. (२०१३)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...