Friday, June 21, 2013

झाली संध्याकाळ


जीवन धागे विणता विणता झाली संध्याकाळ
उसवीत गेला काळ क्षणांना झाली संध्याकाळ.
 
फुलाफुलांनी सजली असते आयुष्याची बाग,
परी अखेरी जाळून जाते देह चितेची आग.
मनी कुणाच्या पेटून उठतो आठवणींचा जाळ!!
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
 
कुणी लावते आठवणींचे दीपक संध्याकाळी,
कुणी विराणी उदासवाणी गाते संध्याकाळी.
घनदुःखाने भरून येते डोळ्यांचे आभाळ
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
 
संध्याछाया भिववत असता कशी सोडली साथ,
हात द्यायच्या वेळी सुटला कसा नेमका हात!
हृदयामध्ये घुसत राहतो एकांताचा फाळ
काळ उसवतो क्षणाक्षणाला होते संध्याकाळ.
========================
सारंग भणगे. (२० जून २०१३)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...