Tuesday, March 27, 2012

कवि ग्रेस

नियतीन जीवन आणि मृत्यू यांच्यातला अंतरपाट ओढून घेतला; आणि ग्रेस गेले.......

ग्रेस गेले आणि कवितेच्या अंतराळात शेकडो न उकलणारी कृष्णविवरे ठेऊन गेले. अनाकलनीय, अगम्य, गूढ आणि संदिग्ध अशा विशेषणांनी त्यांच्या कवितेला जी दूषणं दिली; किंवा विशेषण दिली, त्याचं काहीच विशेष वाटून न घेता, कवितेला कवितेचच आभूषण देऊन गेले.

ग्रेसची कविता समजण्याची कविता नव्हती, ती समजण्याच्या पलीकडचीहि नव्हती, ती अनुभवण्याची कविता होती. शब्दांच्याही पलीकडे असलेल्या अनाम भावनांना शब्दविभोर करणारी कविता होती.

त्यांची कविता मोर पिसासारखी मृदू मुलायम नव्हती कि तलवारी सारखी धारदारहि नव्हती; ती काळजात खोल दडलेल्या अंधाराच्या शाईत बुडवून काट्याने लिहिलेली कविता होती. दु:खाशी विलासमग्न होत नग्न भावनांनी शब्दांशी समागम करणारी कविता होती, कारुण्याच्या तारुण्याला शब्दांनी समृद्ध करणारी कविता होती. भळभळून वाहणाऱ्या व्रणांना श्रीमंत करणारी कविता होती.

त्यांच्या कवितेवर कुणाची छाप नव्हती, असूच शकत नव्हती; पण त्यांची कविता हत्तीच्या पायाने दलदलीत खोल ठसा उमटवावा तसा ठसा मनावर उमटवणारी होती.

त्यांच्या कविता म्हणजे अजाणतेपणान जाणिवांना ढवळून टाकणारे ओथंब होते. त्यांचे शब्द म्हणजे अमूर्त भावनांचा जगड्व्याळ पसारा होते. खरेतर शब्दांना अगम्य असणाऱ्या भावनांना शब्दांच्या कचाट्यात पकडून भावनांचे धबधबे आपल्या अंगावर लोटून देणारे ते कवी होते. गूढतेच्या गर्भगार डोहात बुडी मारून जाणिवांच्या किनाऱ्यावर घनचिंब शरीराचे निथळणे हि त्यांची अशरीर कविता होती. त्या शब्दांना कोंदण नव्हते; ते शब्द म्हणजे भावनांचे गोंदण होते, त्या शब्दांना चौकटी नव्हत्या; पण त्या शब्दांना भूमितीतल्या 'रेषेची' infinity होती.



अंतर्यामीच्या अंधारविश्वातील अनवट वाटा तुडवत जाताना घनघोर व्यथेच्या ज्योतींनी अज्ञेयाचे पाडाव शोधणारी त्यांची कविता, दुर्बोधतेचा शाप घेतलेली; परंतु अबोध भावनांना शब्द बोध देणारी त्यांची कविता, शब्दांच्या अत्तरानं भावनांचा उग्र घमघमाट पसरवणारी त्यांची कविता, कळण्याच्या अतीत असलेल्या कळांना शब्दकळांनी प्रसवणारी त्यांची कविता, आयुष्याच्या उजाड दुर्गम प्रदेशांना आपल्या तळव्यांच्या स्पर्शाने जीवंत करणारी त्यांची कविता, मनाचे कानडे कोनडे धुंडाळणारी, तळाशी नाळ जोडून तळालाच ढवळून काढणारी त्यांची नितळ कविता, अन प्रकाश किरणांना न सापडलेल्या सांदी कोपऱ्यातून गोठून बसलेला अंधार जगण्याच्या अंगांगावर उधळत वेदनांचा उत्कट जल्लोष करणारी त्यांची कविता.......................

कवितेच्या ज्या वाटांवर सहसा कुणी फिरकत नाही अशा मार्गांवर आपल्याला नेऊन सोडणारा हा वैराग्य-भोगी कवी अक्षरांना अमर करून गेला;

ते श्वास आता थांबलेत; आणि जीवनाचाच जी निश्वास होती ती त्यांची कविताही!

1 comment:

अनुराधा म्हापणकर said...

सारंग..

"ग्रेस" नव्याने कळले... धन्यवाद !

Related Posts Plugin for WordPress, Blogger...