Sunday, June 22, 2014

आठवते का काही

सुन्न मनाने बसलो असता कानी आले काही
कोण म्हणाले कुणास ठावे, 'आठवते का काही?'
क्षणचित्रांचा पडदा झर्रकन डोळ्यापुढून गेला
डोळे मिटुनी मलाच पुसले... 'आठवते का काही?'
-----------------------------------------------------

तलम धुक्याच्या शालीमध्ये ओलेत्या अंगाने
हुळहुळणाऱ्या वाऱ्याच्या अन गोड मृदू स्पर्शाने
शहारलो होतो दोघेही आठवते का काही
                                                   
ओठांचा मी चंबू करूनी शीळ वाजवित जाता
तू ओठांना दुमडून घेई स्मित लाजरे फुटता
चुंबन त्यांचे असे घेतले आठवते का काही

मुकेच बसलो धुके पांघरून ऊंच कड्याच्या काठी
गहिवर होते मनात, होती दरीत दहिवर दाटी
मुके राहुनी किती बोललो आठवते का काही       

जरा चुकीचे वळण घेतले, धुंद मनाने जेव्हा
चमकून होते मला बघितले प्रश्नांकित तू तेव्हा
त्या वळणावर देऊळ होते आठवते का काही     

तुझ्या पापण्या झुकल्या होत्या नेत्रकडांना पाणी
हळवी असली प्रिती अपुली आठवते का राणी
डोळ्यांची भाषा आताशा आठवते का काही

हुरहुरण्याची मजा आगळी छंद असे झुरण्याचे
प्रितीमध्ये देऊन सारे पुरूनही उरण्याचे
कुरकुरण्याचे कारण तेव्हा आठवते का काही

तू जाण्याच्या जखमांनाही गंध फुलाचा येतो
रडता रडता त्या गंधाने थोडे हसून घेतो
वेडे होते मला म्हणाले आठवते का काही
मी ही वेडा त्यावर हसलो आठवते का काही
------------------------------------------------

ज्या गीताने पुन्हा उसवले गत-स्मरणांचे धागे
त्या गीताच्या वैभवास ये मुजरा करू या दोघे
किती प्यायले अमृत त्याचे..........आठवते का काही
=================================
सारंग भणगे. (२२ जून २०१४)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...