Monday, August 10, 2015

सोड केस सैरभैर

सोड केस सैरभैर बांधुनी मिठीत अंग
पेटवून प्रीतज्योत हो जळावया पतंग

जाहलेत प्रीत-पात्र, रंध्र रंध्र गात्र गात्र
चंद्र-चांदणी बनून जागवू मिळून रात्र
कृष्ण-श्वेत ह्या निशेत कालवू शरीररंग

घे टिपून रंग,गंध,पाकळीतला मरंद
मंद चांदण्यात,शांत घे करून भृंगछंद
धुंद देह-चंदनास वेढ की जसा भुजंग

घे जरा तरी उसंत, हा तुझाच रे वसंत
संथ संथ प्रेम-घास, घेउनी करू रवंथ
थेंब थेंब प्राशु देत अमृतातला प्रसंग

जाळते तनामनास पाहते ही अंत रात
प्रीतमेघ वर्षु देत खोल खोल अंतरात
द्वैत संपवून भेट राहिली उरी अभंग
=========================
सारंग भणगे (जून २०१५)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...