Sunday, January 13, 2013

आत्मशोध

एकदा बाकीचे प्रश्न सोडून
एकच प्रश्न डोक्यात घेत..
कोऽहम कोऽहम करत..
खूप आत जावं..
तिथे आत्मशोध नावाच्या प्रकरणामध्ये ..
काही प्रश्न विचारावेत ...
निरागस हसणारा तू कुठे गेलास?
आणि काही उपप्रश्न हि विचारावेत ..
कि नक्की प्रश्न कशाचा आहे?
निरागसतेचा कि हास्याचा ?


आणि मग याचीहि खोटी उत्तरं देत ,
आत्मशोध संपूर्ण झाला ..
असा शेरा मारून ..
ते प्रकरण ..
कायमचे मिटवून टाकावे आपल्यापुरते ...
आणि एका नवी प्रकरणाला सुरुवात करावी..
विश्वशोध ..
कारण इथे खोटेपणा केल्यावर ..
तिथे कुणीच विचारत नाही खरी उत्तरं..!!

Vinayak Ujalambe
================================


विश्वाशोध मागची संकल्पना फारशी कळली नाही. प्रश्न हास्याचा कि निरागसतेचा हा प्रश्नही सुस्पष्ट नाही. काय म्हणायचे आहे ते कळते आहे, परंतु आत्मशोध सारख्या विषयात हे विषयांतर वाटते, निदान इतर काही विचारगर्भ ओळी वाचल्यावर तरी!
 
निरागस हसणारा कुठे गेलास? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्यातून किती आत्मशोध घडेल ठाऊक नाही, पण निरागसपणा म्हणजे विकारांची पुटं न चढलेलं मन, असे मी समजतो. खरेतर फक्त विकाराच नाही तर विचार देखील.
 
अध्यात्य्माच्या दृष्टीकोनातून विचार केला (माझ्या मर्यादित ज्ञान आणि समजुतीनुसार) तर निरागसता हि परमेश्वराच्या जवळ नेणारी असते. कारण विकारहीन मन म्हणजेच मुक्त मन. परंतु खरी मुक्त हि केवळ विकारांपासुनाची मुक्ती नसावी. खरी मुक्ती हि ऐहिक, भौतिक विचार-भाव-भावना, अगदी जरी त्या विकारवश नसल्या तरीही, त्यांच्यापासुनाची मुक्ती असावी. म्हणजे निर्विकार आणि निर्विचार अवस्था हे कदाचित निरागसपणाचे निकष असावेत. बघा ना, लहान बालकाला आपण निरागस म्हणतो. लहान बालकामध्ये विकार नसतात, तसेच विचारही नसतात. काही भाव-भावना जरूर असतात, परंतु त्या विकारवश नसतात. त्या बालकाला राग, द्वेष, मत्सर किंवा काम इत्यादी विकारांची लागणही झालेली नसते कि त्याच्या मनातून कुठल्याही प्रकारचे विचारदेखील नसतात, म्हणजेच ते मन मुक्त असते.
 
विचार देखील एक प्रकारे विकारच असतात. निदान विचारातून विकार निश्चितच निर्माण होतात. कदाचित अध्यात्माच्या दृष्टीकोनातून हर्ष, उत्साह हे देखील विकाराच असावेत. त्यामुळे विचारातून निर्माण झालेल्या अशा सकारात्मक भावना देखील एक प्रकारे विकाराच मानल्या जाऊ शकतात. आता बघा ना, साधा सुंदर निरागस शब्द आणि मी त्याच्यावर विचार मांडून मांडून त्या शब्दातील निरागसता घालवून टाकली कि नाही! म्हणूनच कुठेतरी विचार देखील विकार मूलक असावेत असे वाटून जाते.
 
म्हणजे निरागसता म्हणजे अगदी मुक्त मन असे जरी नसले, तरी वर म्हटल्या प्रमाणे मुक्त मनाच्या प्राप्तीची सुरुवात निरागसतेतून होत असावी काय! (हा एक प्रश्नही आहे आणि विचारही)
 
परमेश्वराच्या जवळ जाने म्हणजेच आत्मप्रत्यय येणे; आत्मप्रचीती येणे. म्हणजे अत्माशोधाचे फलित होणे. म्हणजे आत्मशोधाची सुरुवात कदाचित 'निरागसपणा कुठे गेला?, आणि त्या निरागसपणात देखील आलेलं ते निरागस हसू कुठे गेलं?' अशा प्रश्नाने होऊ शकते. कदाचित कविता येथेच यशस्वी होऊन जाते. कवीने कुठेतरी खूप खोल विचार न करताही त्याला सहजपणे आत्मशोध कसा घ्यावा हे उमगलेलं असावं, असं वाटून जातं.
 
आता या कवितेचा दुसरा परिच्छेद म्हणजे एक प्रकारे उपरोध आहे. किंबहुना संपूर्ण कविताच कुठेतरी उपरोधाच्या अंगाने लिहिली आहे. परंतु हा उपरोध कुणाचा उपहास करणारा नसून, मला वाटते त्याप्रमाणे आत्मशोध घेण्यामध्ये मनुष्यप्राण्याला आलेल्या एक प्रकारच्या अपयशातून निर्माण झालेला तो उपरोध असावा. मला खात्री आहे कि कवीने तो उपरोध जाणून बुजून न लिहिता, तो त्या भावनेतून आपोआपच कवितेत प्रकट झाला आहे. काही जणांना माझे हे उपरोधाचे मत पटणार नाही, परंतु तो वेगळा विषय आहे.
 
जसे एखादे सरकारी प्रकरण बंद केले जाते किंवा त्याहूनही अधिक म्हणजे एखाद्या सरकारी रुग्णालयात मृत रोग्याची फाईल (याला काही मराठी शब्द आहे का हो!) बंद केली जाते, तशाच कोरडेपणातून अत्माशोधाचे प्रकरणदेखील बंद केले जाते अशी काहीशी वैफल्यग्रस्त भावना या उपरोधातून प्रकट होते. म्हणजे अत्माशोधासारखा विषय देखील केवळ एक प्रकरण होऊन राहिला आहे असेच कुठेतरी कवीला सुचित करावयाचे असावे.
 
तो उपरोध 'विश्वाशोध' यामध्ये देखील जाणवतो. जरी मला हे विश्वाशोधाचे प्रकरण अत्माशोधातल्या खोटेपणाशी कसे निगडीत याचा अर्थबोध फारसा झाला नाही, तरी देखील एवढे मात्र लक्षात येते आहे कि जिथे अत्माशोधावर प्रकरण बंद केल्याची 'लाल फीत' लावली जाऊ शकते, तर त्यासमोर विश्वाशोध काय चीज आहे!
 
कवितेचे कौतुक असे आहे कि कविता इथेच थांबते, उगाच त्या विषयावर असंबद्ध चर्चा चर्वण न करता, कुठल्याही प्रकारे विस्ताराचा मोह (आणि दोषही) आवरून कविता नेमकेपणाने संपते. कवीशी व्यक्तिगत परिचय असल्याने याची कल्पना आहे कि कवीला कवितेचा अंत दिसतो आणि मग कविता स्फुरत जाते. म्हणजेच कवीला कवितेतून नेमके कुठे जायचे आहे ते आधीच माहित असते, त्यामुळे तिथे कसे जायचे एवढाच प्रश्न जो उरतो, तो कवी त्याच्या स्वभावाप्रमाणे सहजतेचा मार्ग स्वीकारून सोडवतो.
 
कवितेतील दुसरा सुरेख भाग म्हणजे कविता खरोखरच कुठेतरी आत्मशोधाचा प्रयत्न करते. तिथे तो निरागस हास्याचा प्रश्न येतो.
 
तिसरा खूप महत्वाचा भाग म्हणजे, कवितेमध्ये कुठे कवी डोकावला आहे असे वाटत नाही. म्हणजे कवी त्रयस्थपणे हि कविता मांडतो. त्यामध्ये त्याचे विचार मिश्रित करत नाही. कवी कवितेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो आहे असे वाटत नाही. कवितेच्या विषयाला हे खूपच पूरक आहे.
 
चौथा सौंदर्याचा भाग म्हणजे कवितेला कुठलाच मुलामा नाही. कविता एखाद्या निर्वस्त्र सुस्नात कुमारीकेसारखी वाटते. थोडी काहीतरी भलतेच रूपक योजल्याबद्दल माफी असावी, परंतु जे मनात आले ते लिहिले....................अगदी निरागसपणे! म्हणायचे एवढेच आहे कि कवितेमध्ये कवीची अहंमन्यता किंवा तत्सम कुठला अभिनिवेश दिसत नाही. कविता टाळ्या किंवा वाहवा घेण्यासाठी लिहिली आहे असे वाटत नाही.
 
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कविता वाचताना तुम्हाला फारसा विचार करावा लागत नाही कि वाचल्यानंतर काही विचारांचा कल्लोळ वगैरे ती ठेऊन जात नाही. परंतु तरीही कवितेवर विचार जरूर केला पाहिजे असे वाटूनही जाते.
 
सर्वावर कडी म्हणजे, कवितेमध्ये जो प्रश्न आहे तेच त्याचे उत्तर आहे. कविता नुसता पर्ष्ण विचारून जाते असे वाटले तरी ती खरेतर उत्तर देऊन जाते, जे तुम्हाला शोधावे देखील लागत नाही. कविता कुठेही वाचकाची परीक्षा घेत नाही; आत्मपरीक्षणाचे डोसही पाजत नाही, परंतु हवे असल्यास आत्मशोध घेऊ शकता असे काही सुचवते.
 
लिहिता लिहिता कविता उलगडत जाते, कवितेवर लिहायला घेतले तेव्हा २-४ ओळी लिहू शकेन असे वाटले होते. परंतु हा तर एक लघु निबंध झाला तरीही लिहायची उर्मी संपली नाही, असेच काहीसे कवितेबाबत होते.
 
आता थांबतो. वाचणार्यांनी माझेच कौतुक करावे इतपत तसेही मी आता लिहिलेच आहे. असे काही लांबलचक लिहिले कि लोक आपोआपच कौतुक करतात, बरेचदा हे लांबलचक लिहिलेले न वाचताच.
--
सारंग भणगे

Sunday, January 6, 2013

तरहि गझल

ओघळणाऱ्या अश्रुंसोबत वाहून गेलीस,
येता येता आयुष्यामधे राहून गेलीस.
 
तू नसताना मी जगण्याचा प्रयत्न करतो,
पाऊस वेडा डोळ्यांमधुनी झरझर झरतो.
 
कातरवेळी अंधाराच्या छायांसोबत,
प्राण प्रियेच्या चिरविरहाची झाडते नौबत.

अर्जाव होती श्वासांसोबत जगवायची,
स्वप्नांमध्ये तरी सांगत करावयाची!

खंत कशाला उगाच केली तू नसण्याची,
आठवणींवर होती मोहर तू असण्याची.
 
उगा विराण्या लिहू कशाला तुझ्या विरही,
मतला तू अन जीवन माझे गझल तरहि.
==========================
सारंग भणगे. (५ जानेवारी २०१३)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...