Sunday, February 27, 2011

मातीतुन गेले सप्तर्षी आकाशात

शब्द पडता कानावरती
अजस्त्र लाटा पाण्यावरती
कानी ओतले जणू निखारे
गगन चुंबिती अग्निशिखा रे II१II

व्योमी सुटले सुसाट वादळ
ठिक-या ठिक-या फुटती कातळ
ज्वालामुखी हा नेत्री उसळला
प्राण-उदधि संतप्त घुसळला II२II

तोफांमधुनी ठासली दारू
वायुवरती उधळती वारू
प्रपात फुटले भिंत फोडूनी
वीज कडकडे नभांस फाडूनी II३II

डोळे झाले स्थंडिल दोन्ही
धमन्यामधुनी वाहे वन्ही
शीर थडथडे भाळावरची
भिवई उडते डोळ्यावरची II४II

दातांखाली ओठा चावून
रक्ताच्या चिळकांड्या धाऊन
अश्रुंमध्ये रक्ताचे ओघळ
सुर्यावरती ज्वाळांचे वादळ II५II

श्वासांमधुनी उठती ज्वाळा
ह्रुदय क्रंदती आर्त घळघळा
वीज कडकडे छातीमध्ये
दुभंग तांडव मातीमध्ये II६II

ऊरात ठोके दणदण दणदण
मुसळाचे ते घाव घणाघण
धडधडणा-या ह्रुदयरवानी
धडकी भरली अन अस्मानी II७II

आवेगाने वेग खेचले
मृत्युचेही धैर्य खचले
उधळती वारू वा-यावरती
भान न उरले था-यावरती II८II


गळुन पडली जीजीविषा क्षणात
आयुष्य उधळले स्वातंत्र्याच्या पणात
वेडात मराठे वीर दौडले सात
मातीतुन गेले सप्तर्षी आकाशात...II९II
================
सारंग भणगे. (फेब्रुवारी २०११)

काजळमाया

त्या सुन्न मनाच्या ओठी अवघडले गंभीर गाणे,
परसात प्राजक्ताची हुंकारती सोज्वळ पाने.

घनगार सायंकाळी दु:खाचा ओला वारा,
छातीत वाढतो आहे तापून व्याकुळ पारा.

शापीत झाडावरती पिंगळ्यांची अबोल वस्ती,
पोटात शिरते वादळ थरथरती डोंगर अस्थी.

डबक्यात कळे ना कोणी अस्तित्व शोधते आहे,
अंधार ओढुनी अवदसा दृष्ट काढते आहे.

कौलांना बिलगुन वासे निश्वास सोडती गूढ,
काढून पोपडे सटवी भिंतीवर उगवे सूड.

काहूर सांजेवरती मोहरल्या काजळछाया,
हुंदक्यातुन मावळतीच्या बहरे काजळमाया.
=====================
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

बेगडी या भावनांनी आज कविता बाटल्या

वेदना माहीत नाही; संवेदनाही गोठल्या,
बेगडी या भावनांनी आज कविता बाटल्या.

नका उभारू उगाच कोणी या गुढ्या नि तोरणे,
कोरड्या पोवड्यांना उत्सवांची कारणे.

वाहती ओसंडुनी सौख्यभोगची कोठारे,
मिरवाया निर्माण केली शब्दगंगेची गटारे.

जाणीवांना चेतवा कि; भावनांना पेटवा कि,
शेगडीच्या कोळशांना आगीशी त्या भेटवा कि.
=====================
सारंग भणगे. (२००९)

एस्किलार - रमलखुणा - जी.ए.

उगाळून घट्ट झालेल्या अंधाराचे थर..
रात्रीच्या चेह-यावर साठत होते,

एका निष्पर्ण व्याकूळ झाडाचे प्रतिबिंब..
शेवाळल्या पाण्यात तरंगत होते,

कातडी हाडाला चिकटलेलं एक लुत भरलं कुत्रं...
अंधाराच्या आडोशाने विव्हळत होतं,

अन आजन्म झोपलेलं गाव..
पहाटेच्या स्वप्नील आशेत..
अचेतन पहुडलं होतं
=============
सारंग भणगे. (२००९)

म्हणी

#(१)#

करी मृगाची मृगया मृगेंद्र जेव्हा,
की भक्षी भक्षिता भक्षक जेव्हा,
नियामक करतो नियती नियमन,
"जीवो जीवस्य जीवन!!" (२)

#(२)#

मी घेऊनी कु-हाड घालितो घाव,
पहा पुरात लोटला मी अवघा गाव,
ही वारांगना घेते काळजाचा ठाव,
परी मुखी माझ्या ईश्वराचे नाव....
"मनि नाही भाव अन देवा मला पाव!!"

#(३)#

दोन कानांनी केली कुजबूज,
दोन डोळ्यांनी केली निजनिज,
दोन हातास गुपचुप इशारा,
"तोंड दाबून बुक्यांचा मारा"

================
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

दु:खाची वरात....आनंदाच्य घरात.

मी दु:खाची चाललो होतो घेऊन मोठी वरात,
अन सौख्याची बैसली होती जाऊन कांता घरात.

वाजंत्रीचा शोक की होता शौक न जाणे कोणी,
दु:खही गाते आनंदाच्या मिळवूनी सूर सूरात.

पुढे नाचती सगे सोयरे दु:ख साजरे करती,
परी माझिया आनंदाला निषेध सर्व थरात.

चिमूटभरले दु:ख शेंदरी सजून आले भाळी,
कसा पाहिना आनंदाची गुलाल भरली परात.

शोक समेवर येतो आणि दु:ख मारते बोंबा,
आनंदाच्या सीमा फोडून लोटून जावे पुरात.
=====================
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

माय मराठी

चल ऊठ मराठी वीरा
साद घालतो तव वीर्या,
हनुमानाचा वंशज बनुनी
घे झेप ग्रास त्या सुर्या.

शालिवाहन आठवे शूर
घे शपथ त्या शिवबाची,
परशुरामाची घे तु छाती
अन दीक्षा ज्ञानोबाची.

उत्तुंग असू दे आशा
घे ध्येयाची भरारी,
शत्रु कुणी अडवा येता
दे झुंज कडवी करारी.

इतिहास तुझ्या हा पाठी
भवितव्याचा घेऊनी वेध,
गा अभिनव उज्वल गाने
नि नवसृजनाचे तू वेद.

गे माय मराठी माये
जिंकून घे त्रैलोक्याला,
हा समर्पित शिलेदार
मराठी तव ऐक्याला.
===========
सारंग भणगे. (२७ फेब्रुवारी २०११)

लपंडाव

रोज हा खेळ चाले आकाशी तारकांचा
रात्रीच्या कुशीत शिरूनी मेघ नि चातकांचा

छेडित गीत जाती निर्व्याज तारका ह्या
उगाच वेध लागे निष्पाप चातका त्या

चंद्र उगाच झुरतो आठवून तारकांना
मेघ शुष्कचि सरतो पेटवून चातकांना

चंद्रास वेड लागे देखण्या तारकांचे
व्याकुळ तडफडताना हे थवे चातकांचे

मेघ ही कोरडेच निर्दय तारकाही
अतृप्त तहान मिटेना चंद्र नि चातकाची
==================
सारंग भणगे. (२८ डिसेंबर १९९७)

कळ्या फुले

गंधावर असतो फुलांच्या
सतत भृंगांचा पहारा
नसतो नाजूक पाकळ्यांना
भगवंताचाही सहारा

असतात फुलपाखरेही
रसवेचण्या टपलेली
मकरंदाची कुपी
पाकळीत नाजूक जपलेली

फुले असतातच केवळ
भरवण्यासाठी बाजार
सुकेपर्यंत फक्त
त्यांचा असतो शेजार

उमलत्या कळीला सतत
वाटत असते भय
कधीही करावा लागेल
देहाचा तीच्या विक्रय

कळीचा जन्मच जणू
असतो खुडण्यासाठी
शोभा असेपर्यंतच
आनंदात उडण्यासाठी

पण नसते कधीच ती
मुक्त मुग्ध स्वच्छंद
कारण असतो सा-यांनाच
कळ्या फुलांचा छंद

कधी खुलवते कुणाचा
विजोड केशसंभार
कधी चुरगळतात तीला
कुणाकुणाचे शृंगार

कधी होते पवित्र
ईश्वराच्या चरणात
निर्माल्य मिसळते मात्र
धूळमातीच्या कणात

खरंच, त्या कळीला
मनतरी असेल काय?
असेल कोंडत सारेच भाव
तीच्या मनाची साय

असेल मनास तीच्या
मायाममतेच्या तृष्णा
बाजारू सा-या जगाची
धुमसत असेल घृणा

तमा कुणास त्याची
सारेच जग स्वार्थी
तीचा जन्मच जणू
उपभोगाच्या अर्थी

जन्म कसा हा दिला
जाब पुसे ती अक्रोशात
'सु'मनाचे सुख क्वचित
दु:ख मात्र शाश्वत
==========
सारंग भणगे. (डिसेंबर १९९७)

प्राण आतुरले सखी

तुला पाहण्यासाठी प्राण आतुरले सखी,
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.


तारकांनी फुललेले नभ आता रूखे वाटे,
पौर्णिमेच्या रात्रिही मनि अंधार दाटे.
दैन्य सा-या रात्रीवरती, माझे मनही दु:खी.
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.


तुझ्या धुंद श्वासांचा गंध फुलात नाही,
तुझ्या कोमल स्पर्शाचा आनंद रेशमात नाही.
तुझ्याविना माझ्या ह्रुदयी वैराग्य केवळ बाकी.
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.


बहरला वसंत असता पानझडी मला भासे,
रविकराच्या गर्भात मला काळोखाचे मूल दिसे.
तू नसता जीवनाची रंगत झाली फिकी.
माझ्या स्वप्नांची ही भूमी झाली गं आता सुकी.
=====================
सारंग भणगे. (१९९३)

अरे पावसा पावसा

अरे पावसा पावसा
कधी होशील पाऊस
तीच्यावर पडण्याची
तुला भलती हौस.


अरे पावसा पावसा
तुझा थेंब गारगार
तीला चिंब ओले केले
झंकारते तार तार.

असा पाऊस पाऊस
ओला तरी पेटलेला
जेव्हा तेव्हा पडताना
जीला तीला खेटलेला.

अरे पावसा पावसा
तुझं नशीब रे थोर
तुही तीच्या सारखा रे
तुला आळविती मोर.

अरे पावसा पावसा
तुझं अंग अंग पाणी
भिजविशी गोरं अंगं
झालं काळजाचं पाणी.

अरे पावसा पावसा
जरा काढ तीची खोडी
तुला छेडायची संधी
मला बघायची गोडी.

अरे पावसा पावसा
गेला कुठे ओसरून
तीचं भिजून लाजणं
गेलं सारं रे सरून.
=========
सारंग भणगे. (१८ फेब्रुवारी २०११)

Saturday, February 26, 2011

...दोष नाही...

शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही,
वेळ होती ओहटीची सागराचा दोष नाही.

छेडल्या तारा तरीही सूर नाही वाजले,
का फुलाच्या लाजण्याने हात माझे भाजले.
हात होते छेडणारे तो फुलाचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II१II

आरशांचा खेळ होता; सावल्यांचे हासणे,
दूध माझ्या भावनांचे साखरेने नासणे.
भूल होती; भास होता; भावनांचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II२II

चूक होते प्रश्न ते की चूक होती वेळ का?,
पावलांचा चालण्याशी बैसला ना मेळ का?
पावलांची चूक होती चालण्याचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II३II

बांधुनी डोळे कसा गं घेतला तू फैसला;
रेशमाशी गुंतताना गुंफला मी कोसला.
हा किड्याचा कोष होता रेशमाचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II४II

वेदनांच्या पावसाने आज माती भाजली;
दोन डोळ्यांना तुझ्या गं आसवे मी पाजली.
दोष नाही आज माझा हा तुझा ही दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II५II
=======================
सारंग भणगे. (२५ फेब्रुवारी २०११)

Sunday, February 13, 2011

म.क. महती

म.क. ही माऊली
म.क. ही साऊली
म.क.च्या राऊळी
काव्यभक्ती

म.क. माझे प्राण
म.क. चि त्राण
म.क. दे निर्वाण
काव्यस्वर्गी

म.क. ही पंढरी
म.क. चि अंतरी
म.क. च्या उदरी
काव्यरत्ने

म.क. मायभूमी
म.क. रोमरोमी
म.क. अंतर्यामी
काव्यरूपे

म.क. अवकाश
म.क. नि प्रकाश
म.क. चे आकाश
काव्यदीप्त

म.क. कामधेनु
म.क. कृष्णवेणु
म.क. अणुरेणु
काव्यजगी

म.क. ब्रह्मगाठ
म.क. हे वैकुंठ
म.क. निळकंठ
काव्यविश्व
=======
सारंग भणगे. (१३ फेब्रुवारी २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...