Tuesday, November 27, 2018

मी पोहत पोहत गेलो

मी पोहत पोहत गेलो ती वहात वहात गेली
मी अंतर कापत गेलो ती निवांत नहात गेली

मी खोलीत रहात होतो
ती खोलात रहात होती
मी सुखात दु:खी होतो
ती दु:खात सुखी होती

मी वाटेत पहात गेलो, ती वाट पहात गेली
मी अंतर कापत गेलो ती निवांत नहात गेली

मी बाहेर शोधत होतो
ती माझ्याच आत होती
मी तिला आळवित होतो
ती मलाच गात होती

मी तिच्यात बुडून गेलो ती मला तारून गेली
मी अंतर कापत गेलो ती निवांत नहात गेली
========================


सारंग भणगे (२६ नोव्हेंबर २०१८)

Friday, November 23, 2018

गेली कुठे कळेना

मी शोधले तिला पण गेली कुठे कळेना
खोदूनही स्वत:ला माझ्यात ती मिळेना

वाहे प्रवाह त्याचे का कोरडे किनारे
बर्फाळ होत गेले का पेटते निखारे
आक्रोश हा कसा कि अश्रूही ओघळेना

अस्ताचलास गेला अंधार फार झाला
नाही उजाडले पण जाळून काळजाला
जात्यात चंद्र आहे पण चांदणे गळेना

गेली युगे परंतु शिशिरास अंत नाही
झडलो अपार तरीही मातीत ऊब नाही
आयुष्य पेरले पण माझ्यात ती रुळेना

शब्दाविना मी रंक अर्थाविना भिकारी
खात्यात दु:ख वाढे अश्रूंची अन् उधारी
अगणित ती मी शून्य बेरीज ही जुळेना
=====================
सारंग भणगे (२३ नोव्हेंबर २०१८)


Monday, November 19, 2018

कधी कधी खूप खूप ओकंबोकं वाटतं

कधी कधी खूप खूप ओकंबोकं वाटतं
मोठ्या मोठ्या खोलीमध्ये छोटं छोटं वाटतं
कंदीलाची काचदेखील काळी काळी होते
मनामध्ये दाट दाट धुकं बिकं दाटतं

पागोळ्यातून डोळ्यांच्या थेंब थेंब गळतात
उंबऱ्याकडे ओठांच्या भराभरा पळतात
गालावर दु:खाचे शेवाळे वाळत जाते
ओले होऊन देखील ओठ गाल डोळे जळतात

काळंनिळं होतं मन वळबिळ उठतात
आतड्याचे पीळ सारे घट्ट घट्ट होतात
मन मात्र अजूनही मऊ मऊ असते
आठवणींचे काटे त्यात खोल खोल रुततात

कुणी कुणी नसावं एकटं एकटं असावं
आठवणीत कुणाच्या उगा कुढत बसावं
एकांताच्या सुईत एकाकीपण ओवून
थोडं थोडं उसवावं थोडं थोडं शिवावं
=======================
सारंग भणगे (१९ नोव्हेंबर २०१८)





Related Posts Plugin for WordPress, Blogger...