Thursday, December 28, 2017

पाने गाळत झाड बोडके रडले होते


पाने गाळत झाड बोडके रडले होते
फांदीवरती प्रेतच केवळ उरले होते

तिची सावली आयुष्यावर पडली तेव्हा
माझ्यावरती उनही थोडे जळले होते

भाग्य टाकते बाऊन्सर मी हूक मारतो
साधे साधे बाॅल परंतु हुकले होते

एकलकोंडा कवी बिचारा मरून गेला
अंत्यविधीला बहुत चाहते जमले होते

धूळ झटकली तेव्हा कळले सोने होते
कुणी कुणी तर पुस्तक त्यांना म्हटले होते

विद्वत्तेवर अहंमन्यता साचत गेली
निर्मळ पाणी शेवाळ्याने भरले होते

लिहिला नाही गझलेमध्ये विठ्ठल कारण
काळिज माझे विठ्ठल मंदिर बनले होते
========================
सारंग भणगे (नोव्हेंबर २०१७)

Wednesday, December 13, 2017

फुलांचा ताटवा आहेस बहुधा

तरही मिसा-यासाठी बेफिजींचे आभार मानून -

फुलांचा ताटवा आहेस बहुधा
जगाला तू हवा आहेस बहुधा

भवाच्या सागराला पार करतो
विठू तू नाखवा आहेस बहुधा

जरा छातीत ये गझले जगव तू
मनासाठी हवा आहेस बहुधा

रुचेना काव्य नाटक चित्रही ना
मनाने नागवा आहेस बहुधा

तुझ्यासाठी झुरे वेश्या निरंतर
तिचाही माधवा आहेस बहुधा
===================
सारंग भणगे (१३ डिसेंबर २०१७)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...