Thursday, October 30, 2008

नाती

रोज एक अनुभव काहीतरी शिकवतो,,
माणसा-माणसातील खोल दरी दाखवतो.

आपली माणसं म्हणून आपण प्रेम वाटतो,
त्यांच्या मनातला मायेचा झरा मात्र आटतो.

वेदना आपल्या ह्र्दयी अदृश्य कळ मारतात,
मरत चाललेल्या नात्यांचे फ़क्त वळ उरतात.

खंत मनातील आपुल्या आणावी कशी ओठी,
समजणार कोण त्यांना ही नातीच खोटी.

मग उगाच का मैत्रीचे पांघरावेत बुरखे,
सूतच नसेल तर का फ़िरवावेत चरखे?


प्रत्येक अनुभव असा डंख मारत जातो,
अन् नात्यांच्या पक्षांचा पंख विरत जातो.

उरतात फ़क्त पडसाद कुठेतरी पुसटसे,
अन् काळाच्या पडद्यावर जखमी स्मृतींचे ठसे.
======================================
सारंग भणगे. (Oct. 1997)

मीच मला कळेना

कोणास काय लिहू; मीच मला कळेना
माझ्याच अंतरीचे कोडे; माझे मला सुटेना
करू शब्दांचा जरी उदो; भावना जर घुसमटतात
जगाच्या या गोंगाटात माझेच शब्द हरवतात
कोण ऐकणार माझी रड; प्रत्येकच इथे रडतो आहे
रडत रडत एकमेकांस सारेच जण हसतो आहे
सारेच सारखे तरी सुद्धा ही जीवाची स्पर्धा का?
आपला ढोल पिटण्यासाठी हरेक जीव अर्धा का?
मी ही आता एक नगारा घेऊन इथे ऊभा आहे
तोच माझा कर्कश नाद माझ्या भोवती घुमतो आहे.
=======================================
सारंग भणगे. (1996)

Monday, October 27, 2008

स्वप्नपूर्ती

एका भूमीमध्ये पेरली मी स्वप्नांची बीजे,
परी प्रयत्नेवीण एकही बीज नाही रूजे.

या स्वप्नांच्या पूर्तीसाठी कष्ट सर्व उपसले,
दैवा हाती सारे आता मम नेत्र नभी भिडले.

पांढरे ढग आकाशी सारे नेकही काळा मेघ,
बुजेल कशी मग भूमीमधली ही उजाड भेग.

पण आता मज थांबणे हे असंभव वाटतसे,
दैवाकडे जाईन मी उमटवीत पावलांचे ठसे.

म्हणेन "मम पाठीवरती द्या मेघांचे हे ओझे,
अवजड जरी हे वाहत नेईन अंतापर्यंत सहजे".

दैवही माझी परीक्षा घेऊ पाहतसे कठोर,
परी ठावा नसे त्यासी मम मनिचा जोर.

स्वस्वप्नांच्या पूर्तीखातर मी एवढेही न करीन का?
अवजड मेघ घेऊन पाठी मी पुरे न धावीन का?

हा विश्वास सार्थ करीत धावलो कधी न थंबलो मी,
एक ही मेघाचा अंशही न सांडीता आलो मी.

आता या मेघा बरसवीन मम स्वप्नबीजांवर,
एक स्वप्न आणिक पेरीन फ़ुटेल सर्वा अंकुर.

आता हे मेघही झाले बरसण्या आतुर,
ओझे हे जड झाले आता मम पाठीवर.

अन् पहा ते कसे बरसले पूर्ण भरुनी जल,
जसे बाळा पाहताच वाहे आईचे अंचळ.

धन्य झाली ती भूमी बीजे ती धन्यही,
धन्य माझे प्रयत्न अन् धन्य ते मेघही.

हळूच पहा डोकावतसे भूमीमधून अंकुर,
आता स्वप्नपूर्तीचा मंगल दिन नसे तो दूर.


वाजतो माझ्या मनि मृदंग वाजंत्री चौघडा,
शांती सुखाने भरला माझ्या मनाचा हा घडा.

=============================================
सारंग भणगे. (1997)

नैराश्य-हास्य


घनतमी या अवसनभी,
शुभ्र चांदणे चुकून हसावे.
उदास आर्त व्याकुळ नयनी,
प्रसन्नतेचे स्मित दिसावे.

निष्पर्ण रीत्या झाडांवरती,
नवी पालवी जशी फ़ुटावी;
निःशब्द गूढ अधरांवरती
आनंदाची लकेर उठावी.

विराण उभ्या वाटेवरती
तिन्ही सांजेने रंग भरावे,
मरगळलेल्या प्राणांमधुनी
चैतन्याचे मंत्र स्फ़ुरावे.

=============================================
सारंग भणगे. (12/06/2000)

शेवटच्या भेटी

कॉलेजच्या शेवटच्या वर्षी लिहीलेली कविता............

आता मोकळे नभ हे झाले दूर उडाले पक्षी,
घरटे सारे रीते जाहले; कुणी न उरले साथी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

किलबिल सारी शमली आता, खळखळणारी दमली सरिता.
हे विरहाचे गीत अनावर पोळून गेले ओठी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

गेली पाखरे आपुल्या देशी, उजाड वाटा पडक्या वेशी.
सखे सोयरे व्याकुळ सारे तोडून गेले गाठी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

तुटती तारे उजळे मंडल, रीक्त नभ हे वाटे पोकळ.
मनि कल्पता विरहवेदना तुटतुटते पोटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

कळिकाळाची नदी वाहिली, ॠतूचक्रेही फ़िरता पाहिली.
कळिफ़ुले ही सुकली आता, गंध उरले पाठी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

येऊन गेले वादळ आणिक ठेऊन गेले चित्र भयानक.
उदास नयनि उगा होतसे अश्रूंची दाटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

सुताविनाही फ़िरतील चरखे; स्वकीय सारे बनतील परके.
नवीन पालवी फ़ुटेल तरीही; भरतील पुन्हा न घरटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

काऊचिऊचा खेळचि न्यारा; पाणी शिंपूनि घालती वारा.
पुसून अक्षरे गेली सारी; कोरीच उरली पाटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

=============================================
सारंग भणगे. (1998)

चारोळ्या

पूर्वी कधीतरी केलेल्या चारोळ्याः

1)
काही म्हणतात जगता जगता
जीवनात काहीच उरलं नाही
काही म्हणतात मरताना मात्र
जीवन काही पुरलं नाही.

2)
मृत्युनंतर शरीराला
जमिनीत पुराव
पण तरीही मागे
काहीतरी उरावं.

3)
जगण्यालाही सीमा असावी
पण जगता जगता मरु नये.
मरण यावे सुखाने अलगद
पण मरत मरत जगू नये.

4)
निशा माझ्या उशाशी
चंद्र माझ्या डोईवर
चांदण्याचे पांघरूण अन्
क्षितीज आहे भूईवर.

5)
चन्द्राचे कधीकधी
वाईट वाटते, कारण
तो उगवतानाच
रात्रही दाटते.

6)
रात्र ही वधू असेल
तर माझा नकार नाही,
पण पुत्र म्हणून मात्र
अंधार मला स्वीकार नाही.

7)
आकाशात उडण्यासाठी
आपण पंख पसरतो,
पण मधेच कुठेतरी
आपण आकाशच विसरतो.

Sunday, October 26, 2008

मनातील संध्याकाळ.



1) ती सांज

शांत एकांत हा, मंजुळ कोकिळ गान
रम्य श्यामल धुंद द्रौपदीसमही सांज.

किलबिलती पाखरे जाती आपुल्या घरा
शांत निवते ही रखरखती वसुंधरा
दुरुनी कोठुनी, मंदिरामधुनी,
झंझंकारती झांज.
रम्य श्यामल धुंद द्रौपदीसमही सांज.

दूर क्षितीजावरी तो भास्कर रेंगाळतो
शाम येतायेता दिन हळुच ढळतो.
दुरुनी कोठुनी, मंदिरामधुनी,
झंझंकारती झांज.
रम्य श्यामल धुंद द्रौपदीसमही सांज.
=================================
सारंग भणगे. (1989)

______________________________________________________
2) सायंकाळ सावळी

काल मी सावळी सायंकाळ पाहिली,
डोळ्यात तिच्या होती, तांबूस लाली.

मेघांच्या पापण्या ओढलेल्या,
किंचित होते उघडे डोळे.
अन् त्या नेत्रकडातून
बरसत होते रंग आगळे.

सांद्र नेत्र अन् होती पापणी ओली,
डोळ्यात तिच्या होती, तांबूस लाली.


क्षणभरच अचानक ते,
उठे पापणी उघडे डोळे,
मेघांच्या त्या गर्दीमधूनी
तरवारीसम वीज सळसळे.

शुभ्र प्रकाशे ही तीन्ही विश्वे नाहिली
डोळ्यात तिच्या होती, तांबूस लाली.

=================================
सारंग भणगे. (1995)

Saturday, October 25, 2008

दिवाळी



दिवाळी अशीही, दिवाळी तशीही
कोणाला कशी कोणाला कशी.

बंगल्यात उजळतात दीप अनेक,
झोपडीत तेवतो दीप एक.
बंगला प्रकाशात नाहिला असे,
झोपडीत तिमिर मावत नसे.

मधुर मिठायांचा बंगल्यात सुवास
दुर्गंधीने झोपडीत कोंदटे श्वास.
हास्याने सारा बंगला भरतो,
झोपडीवासी मूक रडतो.

बंगल्यात फ़टाक्यांची आतषबाजी,
झोपडीत रोज पोटाची काळजी.

एक ठिणगी अशीच उडाली,
झोपडीवर जाऊन पडली.
पेट घेई झोपडी सारी,
ज्वाळांनी वेढली बिचारी.

बंगल्यातील मुले टाळ्या पिटती,
झोपडीतील तान्हे आर्त आक्रंदती.
प्रकाश असाही वेढे झोपडीस,
वावडे त्याचे नसे बंगलीस.

अशी ही दिवाळी, अशीही दिवाळी,
अशी कशी डिवाळी, अशी कशी?
==========================================
सारंग भणगे. (1993)

भारत

भा

माझा भारत महान;
आहे अतिसुंदर छान.
सुजलां सुफ़लां देश आमचा
वंदन करुया या देशाला
आहे अतिसुंदर छान;

माझा भारत महान.

उत्तरेस हिमाचल असति,
दक्षिणेस तो सागर वसति,
पश्चिमेस रे अरबि आणि

एस तो बंगाल.
माझा भारत महान


शोभा देती कोकणपट्टी,
सह्याद्रीशी हीची रे गट्टी,
भीमा कोयना करिती मस्ती,
महाराष्ट्राची ही शान्
माझा भारत महान.

मिलन होते दक्षिण टोकी,
तीन सागर एकत्र येती,
तिथेच विवेकानंद वसति,
जो ग्यानाची खाण,
माझा भारत महान.
===================================
सारं णगे. (1988/89)

सवाल


अंधाराला अंत नाहीये,
प्रकाश कुणी दाखवील काय?

मिटलेल्या कळीचे,
फ़ुल कधी उमलेल काय?

क्षितीजापल्याडच्या नजरेला माझ्या
क्षितीज तरी गवसेल काय?

वाट चुकलेला पांथ मी,
वाट कुणी दावील काय?

तेलात बुडवलेल्या अंतर्यामीच्या वाता,
कुणी कधी पेटवील काय?

स्वर्गाची पाडी,
माझ्यासमोर उघडेल काय?

जीवनाचं कोडं,
कधी तरी उकलेल काय?

सवालाला माझ्या या,
जवाब कधी मिळेल काय?
========================================
सारंग भणगे. (1994)

Friday, October 24, 2008

जुने स्वप्न


सप्तसूर्यांची झळाळी जेथे
सा-या अवनीवर पसरते,


रात्रही जेथे पौर्णिमा होऊन अवतरते,

जेथे जीवन सरिता प्रेमाचे सूर् आळवते,

वर्तमानाचे पंख जेथे स्वप्नांना लाभते,

सप्तस्वरांच्या मैफ़लीत भान जेथे हरपते,

विद्यादेवी ज्ञानाची माला जेथे गुंफ़ते,

आत्मोन्नतीसाठी जेथे जीवन झटते,

कर्तव्याची कास धरुनी भावनांची भरती येते,

द्वेषाच्या काट्यावरती प्रेमफ़ुल जेथे उमलते,

घेऊन चल गा मला देवा
माझे मन तेथेची रमते
(1989/90)

Sunday, October 19, 2008

कनकप्रभा

ओष्ठद्वय ते मकरंदी
कपोल दोन्ही गुलकंदी

लोचन काळे करवंदी
वर्ण गुलाबी जास्वंदी

सरळ नासिका चाफ़ेकळी
शुभ्र हासते सोनसळी
बंद पापणी कमळकळी
भृकुटी रेखीव लहर जळी

भाळी कुंकुम चकाकती
कर्णभूषणे लकाकती
रेशमी कुंतल लहरती
हनुवट; खळी लोभवती

मान नाजूका हंसासम
स्कंध रत्न-मूठीसम
कोरीव कर खड्गासम
गळा कर्दळी देठासम

मधुघट भरीव वक्ष:स्थळ
अग्र माणकी दु-अंचळ
नाभि कस्तुरी परिमळ
कटी-अंगुष्ठी अवखळ

गाली गुलाल लालिमामुखमंडल ते चन्द्रमापूर्णप्रभा तू पौर्णिमाकांचनकांती स्वर्णिमा
मधुराज्ञि तू मधुवंती
रसमाधुरी रसवंती
सुमनसंपदा वासंती
लावण्यविभा दमयंती
शीतल शालीन शीलवती
कुलीन कन्या कलावती
विद्यावैभवी वेदवती
ज्ञानशारदा सरस्वती.

Sunday, October 12, 2008

भोंडला

भोंडला भोंडला भोंडला मांडला
या सयांनो या बायांनो
भोंडला मांडला।

रिंगण घालू गाऊ गाणी
नाचू मिळून सा-या जणी
विसरून जाऊ कधी कुणाशी
कोण कसा भांडला।

भोंडला भोंडला भोंडला मांडला

आई अंबेचा गाजर करुया
नारळ ओटी पदर भरुया
शोधा पाहू धरेवरती
आनंद किती सांडला।

भोंडला भोंडला भोंडला मांडला

सुनासासवा जावा जावा
नाती जावी लोभ उरावा
रिंगणात या माणूसकीचा
अध्याय नवा जोडला।

भोंडला भोंडला भोंडला मांडला

Thursday, October 9, 2008

अशी वादळे येती....

नव्या वादळाचे,
नवे हे बहाणे,
उध्वस्त दाखले,
नव्याने पहाणे।

कधी वादळाने,
दिली काय हूल,
भकास शांतता,
वादळ चाहूल।

उगा वादळाला,
नको नवी नावे,
कुणी अंतरात,
कुठे ध्वस्त गावे।

'इथे' आदळे,
'तीथे' आदळे,
अंतर बाह्य,
रोज वादळे।

अशी वादळाची,
अजिंक्य दळे,
कशी जीवना,
अधाशी दळे।

जुन्या वादळाची,
नवी ही घराणी,
सुचे भावगीत,
'ते' गाई विराणी।

Sunday, October 5, 2008

सृष्टी संगीत


थाप पडली मृदंग वाजला,
थेंब पङता मृद्गंध लाजला।

बोटे हलली वीणा झंकारली,
सुमनांच्या वेली पर्णे शहारली।

ओठ स्फुरले पावा घुमला,
आम्रराई रावा घुमला।

किणकिण घंटा आतुर देवळे,
झिळमिळ हलले अंकुर कोवळे।

छुमछुम पैन्जण पाय थरकले,
लपलप लाटा तोय हरखले।

कीर्तनाचे रंगी झांज पखवाज,
सृष्टीमंदिरी अनाहत आवाज।

Saturday, October 4, 2008

मधुरात्र

काही काळापुर्वी सुचलेल्या ओळी, पण त्या पूर्ण केल्याच नाहीत कधी..........

आजही आहे माझ्या मधुरात्र ती लक्षात ग,
चांदणे अवघ्या तनुवर चंद्र अन् वक्षात ग।

उत्तररात्रीतही उतरेना उन्मत्त ते आवेग ग,
उत्तर ना यास उतारा लगाम ना वेग ग।

स्मित ते विसरु कसे स्मरतो हरेक नखरा ग,
लज्जा खोटी रागही लटका, हां भाव तुझा न खरा ग।
=============================

आज त्यात भर घातलेल्या काही ओळी.....
________________________________________

करू नकोस उगाच सये रुसण्याचे रूक्ष बहाणे,
मार्दवाची आर्जवे करून वेडावती शहाणे।

खेळ केला तारकांनी चंद्र वेडावला बिचारा,
पूर ओसरून गेला कोरडा वेडा किनारा।

घे मला जवळि आता दूर लोटू नको गडे,
कोसळावे काय आता संयमाचे उंच कड़े।

रातराणीच्या फुलांचा गंध हां विरेल ग,
निशेस्तव रातकिडा रातदिन झुरेल ग.

Thursday, October 2, 2008

धीरे धीरे मचल


"अनुपमा" मधील 'धीरे धीरे मचल......' या अनुपम गीतावरून.....

चाहूल ती येणार कुणी,

डोळ्यात डोह अस्फुट पाणी,

वाहू लागल्या आठवणी।

उभ्या पिकात कुणी शिरावे,

शांत शिवार चाळवावे,

वा-यास कसे आवरावे।

पाउल ते वाजताच,

अलगुज कुजबुजे मनातच,

हळवी हुळहुळ तृणातच।

उगाच वारा पदर हलला,

संथ मनाचा चाळा चळला,

परसात कावळा कळवळला।

स्निग्ध तळ्यास कुणी छेडावे,

जल लहरींचे पेव फुटावे,

आकाशाचे बिंब हलावे।

खोड कुणाची कुणी येईना,

आशा असली जाता जाईना।

सैरभैर मन आवरेना.

Wednesday, October 1, 2008

आजची अंगाई

आई आपल्या तान्हुल्यावर नेहेमीच प्रेम करते. जुन्या काळी आणी आजही. पण आज 'निंबोणीच्या झाडाखाली.....' ला किती अर्थ राहिला? गोठाच माहीत नाही; मग पाडस कुठून माहीत असणार.
मग काय आजच्या आईने अंगाई गाउच नये काय? कदाचीत ती अशी गाईल का "आजची अंगाई"।

----------------------------------------------------------------------------------------------
निज निज माझ्या बाळा,

रात्रपाळीचा प्रहर झाला।

उद्या सकाळी पुन्हा धावपळ,
सवडीचा ना मिळे एक पळ,
अधुरी निद्रा तुझी चाळता,
तुटतुटते रे काळिज तिळतिळ।

जरी समजते अपुरी सोबत;
कशी थांबवू पळत्या काळा।

पाळणगृही करीता पाठवण,
कितीदा येते तुझी आठवण,
जरी हरपले तुझे बालपण,
भवितव्याची असे साठवण।

संध्याकाळी तुला पाहता;
उरी दाटतो माय उमळा।

इतक्यातच येतील तात तुझे,
घेतील हाती हात तुझे,
विसरूनी भूक तहान शीण,
घेतील मुके गात तुझे।

डोळे भरूनी येते माझे;
पाहूनी पितृप्रेम जिव्हाळा.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...