Saturday, March 30, 2013

----------- कल्लोळ -----------


कल्लोळ माजला, काळजात खोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल
हिरवं शिवार....करपून गेलं
आता तरी द्येवा... भकताशी बोल

भुकेल्या पिल्लाची चोच....ऱ्हांईली उपाशी
घरट्यात न्हाई दाना.....भटके आकाशी
पक्षीनीला फांदीवर... सावरे ना तोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

पसरलं न्हाई हात...घसरे ना पाय
फाटलेल्या दुधावर...येत न्हाई साय
मुंडासं केलं मोकळं...आतड्याला पीळ
आता तरी द्येवा... भकताशी बोल

खाली मुंडी हाये कशी .... जात मेंढराची
उंडारत ऱ्हाई... युती केली लांडग्यांशी
दिवस थांबंना... झाली संध्याकाल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

गहाण ठेवला सूर्य.... अंधारल्या रानी
ठीगळाला भोक पाडे, अशी जिंदगानी
कोरड्या घशाला .....आसवांची ओल
आता तरी द्येवा... भकताशी बोल

वाटं कडं लावी डोळा... माय ही आंधळी
लांब रुंद होत जाते...कर्जाची सावली
रगात आणि घाम.... सारे माती मोल
आता तरी द्येवा... भकताशी बोल


मरणाच्या दारी जावं... ववाळून जीव
आधाशा सारखा वाटं...पाहतोय गाव
नशिबाच्या फे-या पुढं... नाती गोती फोल
आता तरी द्येवा... बोलाव जवळ

------------------------------------------------------
शब्दशः शब्दशहा !
 
=================================================
 
मंदार,

तु पेटलास; ही कविता लिहीताना तु पेटलास. तुझ्यातलं काव्यस्फुल्लिंग जागं झालं. कविता एकदम नव्या ज्वाळेसारखि फुलुन आली. अचानक केवळ पेटलेल्या नजरेच्या कटाक्षातुन एखाद्या पलित्याने पेट घ्यावे असं ज्वलंत काव्य तुझ्या ह्रुदयातुन आज बाहेर आलं.

एक अशी लाट आवेगात किना-याकडे झेपावली कि तीच्या वेगावर नि आवेगावर भावनांचा कल्लोळ माजला.

होय कल्लोळ माजला कल्लोळ.

कल्लोळ याच शब्दाची मी वाट पहात होतो. एवढा हलवुन सोडणारा आणि ज्याला पर्यायी शब्द हा कल्लोळच असू शकतो असा शब्द या प्रसंगकाव्यात का नसावा. तु तो आणलास.

हा प्रसंग एक कल्लोळच आहे. भावनांचा, वेदनांचा आणि अस्वस्थतेचा. आणि तो काळजात खोल माजला आहे. अहाहा. काय लिहु, काही लिहीण्याची गरज आहे!

कविची मानसिकता प्रसंगात दिलेल्या घटनांच्या पलिकडे जाते. कवि आता अस्वस्थ आहे. तो गेनबाच्या भुमिकेत शिरला आहे. पटकथालेखकानं, दिग्दर्शकानं दिलेल्या निसर्गवर्णनाच्या सूचना तो विसरला. इतरांना सुंदर दिसणारं शिवार गेनबाच्या नजरेत करपून गेलंय. ज्याचं जीवनच करपून गेलंय त्याला भवतालच्या हिरव्यागच्च निसर्गाचं कसलं कौतुक.

घर जळतंय आणि कोजागिरीचं चांदणं भावेल का? मग अंतर्बाह्य तडफडणा-या उद्विग्नतेच्या ज्वालात जळणा-या आपल्या बिचा-या गेनबाला त्या निसर्गाचं काय कौतुक. त्याच्या दृष्टीत तो केव्हाच करपून गेलाय. पुढचे ठाऊक नाही, पण इथे तु गेनबा जगलास.

पक्षीनीला फांदीवर... सावरे ना तोल

- पहिल्या दोन ओळीतही एक कारूण्य आहेच आणि मला ते आधिच्या अनेक कवितांहुन अधिक भावलं. कारण सांगणं कठिण जात आहे, पण भावलं एवढं खरं.

पण त्याहुनही ही तीसरी ओळ फारच आवडली. धनाजीच्या आईने सोडुन जाण्यावर काही अतिशय करूण आणि हेलावुन सोडलेल्या काही काव्यपङ्क्ती लिहील्या गेल्या. परंतु तुझी ही ओळ खुपच वेगळी आहे. त्यात एक प्रकारचा संयतपणा आहे. पक्षिणीची उपमा आणि तीला न सावरलेला तोल लिहीताना तु कवितेचा तोल ढळु दिला नाहीस, हे फारच महत्वाचे. सुभानल्लाह!!!
 
पसरलं न्हाई हात...घसरे ना पाय
फाटलेल्या दुधावर...येत न्हाई साय
मुंडासं केलं मोकळं...आतड्याला पीळ

- मंदार, एक अत्युच्च कडवं लिहीलं आहे. अप्रतिम. हात न पसरण्यात गेनबाचा स्वाभिमान दिसतो; पाय न घसरण्यात त्याचा प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा दिसतो, तसेच याही परिस्थितीत ढळु न दिलेला तोल दिसतो आणि यातुनच त्याचे हिरोपणाचे characater उभारून येते. तु गेनबाला खरा हिरो केलास.

फाटलेल्या दुधावर येत नाही साय - हे खुपच सुंदर उपमा आहे. ती वरील किंवा पुढील ओळीशी कसा संबंध बांधते ते निश्चित कळत नाही. कदाचित असे म्हणायचे असावे कि असं चारित्र्य सांभाळुनही जर परिस्थितीच फाटकी असेल तर त्यावर सुखाची-आनंदाची साय येणार कशी. ही ओळ या अर्थाने फारच अप्रतिम आहे, परंतु ती थोडी इतर ओळींशी सांगड बांधणारी वाटत नाही. पण एवढी सुंदर ओळ लिहील्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

मुंडाशाच्या ओळीतही नक्कि काय म्हणायचे आहे ते स्पष्ट नाही. पण मला त्यातील एक अर्थ लागतो तो असा कि मुंडाशाचा पीळ तर काढला पण आतड्या पडलेला भुकेचा, गरिबीचा, बायकोनं सोडुन गेल्याचा, तलाठ्याच्या तगाद्याचा, आईच्या आंधळेपणाचा, अर्थार्जनाचा पीळ कसा सोडवावा? असाच जर अर्थ इथे अभिप्रेत असेल तर सलाम.

हे कडवं अप्रतिम आहे. मला ह्रुदयनाथ मंगेशकरांची फी परवडणार नाही. पण हे कडवं त्यांच्याचकदे सुपुर्द करावे लागणार.

उंडारत -हाई ... युती लांडग्याशी - मेंढरांची लांडग्याशी युती कशी हे समजत नाही. इथे मेंढरं हे कशाचे रूपक म्हणुन अपेक्षित असावे ते स्पष्ट नाही. ते स्वतःचेच रूपक असे असेल तर ते फारसे योग्य वाटत नाही. इथला लांडगा हा तलाठी असू शकतो. परंतु त्याची कुणाशी युती आणि ती का हे फारसे कळत नाही. ओढुन ताणुन काही अर्थ काढता येतील, पण इतक्या चांगल्या कवितेत मी ते का काढु? त्यापेक्षा मला न पटलेले एखादे असे कडवे मी कवितेतुन काढेन. राग नसावा; लोभ वाढवावा!!
 
गहाण ठेवला सूर्य.... अंधारल्या रानी
ठीगळाला भोक पाडे, अशी जिंदगानी
कोरड्या घशाला .....आसवांची ओल

- तीस-या कडव्याची ताकद या कडव्यातही उतरली आहे, आणि म्हणुनच मध्येच लुडबुडणारे चौथे कडवे मी काढुन टाकावे असे म्हणतो, न समजलेला काही उच्च असा अर्थ नसेल तर.

सुर्याचे गहाण ठेवणे खुपच बंडखोर वाटते. एकदम अंगावर येते. 'कसा सुर्य अंधाराच्या वाहतो पखाली' किंवा 'हा सुर्यही जरासा लाचार पाहिला मी' अशा दर्जाची कल्पना वाटते. पण तो सूर्य कुणी गहाण ठेवला, का गहाण ठेवला, सूर्य हे कशाचे प्रतिक म्हणुन इथे गुंफलेले आहे ई. प्रश्न अनुत्तरीतच राहतात. पण मला त्याची फिकिर नाही. त्या बंडखोरपणातच एक वेगळी मजा आहे, एक विलक्षण अस्वस्थता किंवा उध्वस्तता यांचे ते निदर्शक आहे. जो सूर्य स्वयंपुर्ण आहे, प्रकाशाचे स्वयंभू उगमस्थान आहे तो कुठेतरी गहाण ठेवणे; त्यातही अंधारल्या रानी गहाण ठेवणे केवढे तरी दारूण वाटते. सृष्टीच्या नियमांचा कुठेतरी पराभव होताना दिसतो आणि त्यामुळेच ते काळजात घुसते.

ठिगळाला भोक पडणे हे किती विचित्र दारूण परिस्थितीचे द्योतक आहे. उसवलेल्या आयुष्याला इतकि ठिगळं जोडली आहेत कि आता आयुष्य हेच एक ठिगळ झालं आहे आणि आता तर ते ठिगळही उसवलं तर झाकायचं कसं. हा एक ज्वलंत सवाल आहे. आयुष्याची जीर्णावस्था वर्णन करण्यासाठी याहुन कुठलं उत्तम उदाहरण मिळावं. अफाट कल्पना आहे.

आणि पुढची ओळ तितक्याच ताकदीची. एका पाठोपाठ एक ओळी आदळतात. नुसते घणाघात होतात. घशाला पडलेली कोरड अश्रुंनी मिटवावी अशी विकलांगता आयुष्यात आली असावी! फार सुंदर ओळ लिहुन गेलास मित्रा.
 
लांब रुंद होत जाते...कर्जाची सावली
रगात आणि घाम.... सारे माती मोल

- कर्जाची सावली असते का? परंतु इथे ती पटते. कारण ती कर्जाची सावली ही दुपारच्या रणरणत्या उन्हात आडोसा देणारी, सुख देणारी शीतल सावली नाही; तर गडद अंधा-या रात्री मिणमिणत्या दिव्यात लांब-रूंद होत जाणारी भयावह सावली आहे. सावलीचा असा अर्थ इथे घेतला तर लांब-रुंद होत जाणारी ही सावली थरकाप करते कि नाही. अप्रतिम उपमा.

घाम तर या जगात मातीमोल आहेच. घाम गाळणारा रक्त ओकतो आहे अशी भयंकर परिस्थिती जगभरच आहे. पण त्याचं रक्तदेखिल कसं रे मातीमोल ठरतं? स्वर्गाच्या द्वारात प्रवेश देण्यापुर्वी प्रश्न विचारणा-या चित्रगुप्ताला हा खडा सवाल आहे. अरे कारूण्याचे आणि मायेचे गोडवे गाणा-यांनो जीथे रक्त ओकूनही ते केवळ मातीमोल होणार असेल तर 'हे जीवन सुंदर आहे' नि 'या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे' असे लिहीणा-या कविला 'जिस कवी कि कल्पना में जिंदगी हो प्रेमगीत; उस कवी आज तो तुम नकार दो' असे खडे बोल सुनवावे लागतील. अतिशय ताकदीने ही शेवटची ओळ या परिस्थितीतील गांभिर्य अत्यंत सूक्ष्मपणे आणि तितक्याच व्यापकपणे मांडते.
 
मरणाच्या दारी जावं... ववाळून जीव
आधाशा सारखा वाटं...पाहतोय गाव
नशिबाच्या फे-या पुढं... नाती गोती फोल
आता तरी द्येवा... बोलाव जवळ

- कविता समेवर येते. खुप काही सांगुन गेलेली, ढसढसा रडवुन गेलेली आणि काळजात भावनांचा कल्लोळ निर्माण करून गेलेली कविता अंतास येते. मन विषण्ण आहे, विमनस्क आहे, परिस्थिती विदारक आहे.

अशा विदारक परिस्थितीनं ग्रासून काळवंडून गेलेला हा एक सामान्य कृमीसदृश जीवाणू किती तग धरेल. ताणण्याची क्षमता संपुनही अजुन कुठल्यातरी अनामिक चिवट जिद्दीनं अदृश्य अशा धाग्यावर आयुष्याचा तोल सांभाळत चाललेला हा गेनबा आता मृत्युच्या कवेत जाण्यासाठी अधीर झाला तर त्याला काय हतबल म्हणणार? गुझारीश चित्रपटात संपुर्ण एक तप मृत्युवत आयुष्याशी चिवट झुंज देत जगण्याचा संदेश देणारा इथन शेवटी euthanasia ची गुजारीश करतो आणि ती न्याय्य मागणी आहे हे सांगायला माणसाचच मन पाहिजे असही नाही, तीच परिस्थिती गेनबाची आली आहे. आणि मग तो वेडा मरणाच्या दारी जीव ओवाळुन टाकायला अधीर होत आहे. तसे तर जीव ओवाळुन टाकण्यामध्ये एक त्यागाचा अंश आहे, आवेश आहे. पण गेनबाच्या सद्य परिस्थितीत जीव ओवाळुन टाकणं हे एका आवेशाचंच लक्षण वाटावं इतक्या समर्थपणे त्याच्या परिस्थितीचं चित्रण केल आहे.

गावाचं अधाशासारखं वाट पहाणं त्याच्या मृत्युसमोर जीव ओवाळुन टाकण्याचं समर्थन आहे. तो गाव त्याला खायला उठला आहे हे ही यातुन सुचित होतं.

गाव खायला उठला आहे आणि हा मृत्युचा घास व्हायला उठला आहे. काय भयंकर वैषम्य आहे; आयुष्याची विसंगती आहे....

आणि मग डोळे मिटलेल्या गेनबाच्या भोवती सारं आकाश फिरतंय, सारी जमीन फिरती आहे, नभोमंडल फिरत आहे, तारांगण फिरतं आहे, विश्व फिरतं आहे आणि तो स्वर्गाच्या दारात आता अतिथि म्हणुन उभा आहे; हक्कानं देवा आता मला जवळ बोलव असं म्हणत त्या निर्दय ईश्वरत्वातील मायाळुपणाच्या प्रतिक्षेत............

मंदार - HATS OFF

कैफियत !!


वेदनेच्या मी छेडून तारा ,आळविल्या यातना जेव्हा...
दाद देऊन दर्दी म्हणाले ..".व्वा! काय सुरेल गीत आहे!"

वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''

हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!

बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!

निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!

बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!

कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!


गौरी सावंत
================================================
 
वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''

- मुजरा........त्रिवार मुजरा. खच्याक् शेर आहे.

हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!

- अफ़ाट. अफ़ाट. जबरदस्त संदेश आहे हा. माणसाने आपल्या कपाळावर कोरून ठेवावा ईतका जब्बरदस्त.

बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!

- Madam, आज कहर मांडलाय आपण. अरे काय पोच आहे. काय जबरद्स्त एकावर एक घाव नुसते.

निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!

- अरे थांबा थांबा कुठेतरी. हा काव्यसुरा नुसता फ़िरतोय, गर्दनीवर गर्दनी कलम, काळजाचा भुगा पाडतोय.

बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!
- ठिक आहे, छान आहे.

कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!

- अरे तोडलात अफ़ाट काव्य. जबरदस्त.

वाचा लोकहो, याला कविता म्हणतात.
 
अगदि पुचाट शिळया मरगळलेल्या 'छान' सुंदर, अप्रतिम असल्या प्रतिक्रिया देण्याची ही कविता नाही.

गळा खाजवल्यासारखे तारस्वरात गायलेला हा अभंग नाही, हे नादधुंद गवायानं मैफ़िलीच्या मदात श्रोत्यांवर फ़ेकलेलं अस्सल नक्षत्र आहे.

हे कवितेच्या आभाळाला जोडलेलं शब्दांचं ठिगळ नाही; त्या आभाळात अढळ स्थानासाठी दावा मांडणारं काव्य आहे.

उगाच शब्दांची धुळ उडवणारी ही काव्यवाट नाही; राजप्रासादाकडे जाणारा हा राजमार्ग आहे.

गँलरीतल्या कुंडीत तांब्यातलं उरलेलं पाणी पिऊन वाढलेला हा चिनी गुलाब नाही; एखाद्या पुष्पवनाला सुगंधाचं वरदान देणारं हे कृष्णकमळ आहे.
 
कौतुक कसलं - कवितेचं, कवि/कवियित्री कोण का असेना..... माळ्याला विचारतो केव्हा, त्या फ़ुलातल्या सुगंधाचं कोडं उलगडल्यानंतरच.
 
वेदनेतुन निर्माण होतं त्याला 'आनंदवन' म्हणतात. तिथे ठसठसणा-या जखमातुन आनंदाचे स्त्राव वाहतात; वेदनेचे हुंकार तिथे जगण्याचा नवा ओंकार निर्माण करतात.

वेदना मोठीच आई असते. अशा त्या वेदनेच्या श्रीमंत गर्भाला सलाम.

अशी गोड तू... एक महाग़ज़ल!!!


फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

जणू धन्य माता तुझी जाहली,जन्म देता तुला;
पित्याने तुझ्या सार्थ गर्वात न्हावे, अशी गोड तू...

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...

कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...

शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

मला स्पर्श साधा, तुझा भासतो, 'अमृता'च्यासवे;
'तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?' अशी गोड तू...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

- निरज कुलकर्णी.

=================================================

तु या गझलेत कुणाला गोड म्हटला आहेस देव जाणे, कि तुच जाणे. पण या गझले एवढी गोड कविता मी आजवर वाचलीच नाही. गझल वाचली आणि नुसता मोग-याचा घमघमाट सुटला बघ घरभर. रात्री ११.३० ला माझ्या घरात मोग-याचा वास घेऊन बायको आली आणि म्हटली 'काय चालले आहे?'. तुझे लग्न झाले असेल तर तु बायकोचा टोन, चेहरा हे सारे डोळ्यासमोर आणु शकशील.

मी अरे उगाच शंका नको म्हणुन तातडीने तुझी गझल बायकोला वाचुन दाखवली. वाटले तुझ्या गझलेनंतर ती ही तशीच गोड होईल.....

ती एवढेच म्हणाली....'याला म्हणतात कविता; नाहीतर तु!' (हे ही तु बायको या प्राण्याचे (कि प्राणिचे) हावभाव डोळ्यासमोर आणलेस तर तुला माझी केविलवाणी अवस्था लक्षात आली असेल.)

तरीही मला तुझी कविता (गझल ही कविताच असते असे मी मानतो) इतकि गोड वाटली आहे; काय सांगु! (काय ते मी सविस्तर सांगणार आहेच).

या गझलेमध्ये ती महागझल आहे हे वैशिष्ट्य आहेच. पण केवळ 'महा' आहे म्हणुन ती महान नाही. महानता ही त्या गझलेच्या रूपसौंदर्यात आहे.

अहाहा, काय गोड गझल आहे. एखाद्या सुंदर रमणीचं नितळ सौंदर्य पहाटेच्या प्रसन्नवेळी संगमरवरी शुभ्र-सफेद प्रासादाच्या गवाक्षातुन दिसावं; कि राजहंसानं मोत्याचा चारा खात असताना पुष्करणीतील पंखावर उडालेले सलील-तुषार आपले शुभ्रश्वेत पंख फडफडवुन निथळुन टाकावं. तुझ्या गझलेला उपमाच नाही; किंवा तुझ्या गझलेला इतक्या उपमा लिहीता येईल कि कालिदासाला कदाचित आकाशातुन खाली पडावं लागेल.

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

- हा मतलाच इतका गोड आहे कि काय सांगावे. सुंदर रंगबिरंगी गोड फुले...इतकि गोड कि त्यातुन मधुरस वेचुन रंगीत फुलपाखरे सगळ्या विश्वास मोहवतात; ज्या माधुर्याचे रूपक गोडपणाच्या परिसीमेला दिले जाते, तो मध मधमाशा त्या फुलातुन वेचतात....अशा गोड फुलांनी देखिल तुझ्या गोड दिसण्याने लाजुन चूर व्हावे...

निशा ही गंधितच असते आणि अशा त्या निशेने अक्षरशः गंधात न्हाऊन निघावे, मग ती निशा काय बेधुंद होईल ना!....अशी गोड तु; असा गोड तुझा मतला.
=========================

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

- तारकांनीही तुझी आसूया करावी इतकि तु गोड आहेस. यातुन तु तीच्या गोडपणाचे परिमाण द्यायला सुरूवात करतोस. हे तसे उत्तमच.

पण त्याही पुढे जाऊन चंद्र-सुर्यात त्या तारकांना सोडुन तुझ्या गोड पणाविषयी चर्चा व्हावी, हे तर अजबच, अद्भुतच. यात असाही एक अर्थ दिसतो कि दिवस-रात्र तुझ्या गोड पणाचे गुणवर्णन चंद्र-सुर्यही करत असतात; आणि त्यामुळेच तारकांनाही तुझी आसूया निर्माण होते. १०० गुण या शेराला.
===========================================

नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

- यात खरेतर तांत्रिकदूष्ट्या गोडपणाचा संबंध येत नाही. नभाला आपण कुठल्याही प्रकारे गोड म्हणत नाही. पण ते नभही धरतीला सोडुन जीच्या उंब-यापाशी झुरते ती किती गोड असेल, असा एक अर्थ निघतो. या ओळी मनावर गोड शिरशिरी ठेऊन जातात.

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

- पहिली ओळ ठीक, आहे सुंदर, पण तशी कितीतरी जणांनी ती साधली असती.

पण दुसरी ओळ मी पहिल्यांदाच ऐकतो आहे अशी उपमा. तुझा गोडपणा इतका कि दंवाने उन्हाला ओले करावे.... लक्षात येतंय का! अरे ऊन त्या दंवाला विरघळुन टाकते; पण इथे तीच्या गोडपणाची कमाल इतकि कि ते दंवाचं मार्दव उन्हालादेखिल ओलं करून टाकतं. ऊनही त्या गोडपणाच्या ओलेपणात न्हाऊन निघु लागतं.
=================

मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

- पुन्हा शेराची पहिली ओळ तशी सुरेखच, पण तशी ती पहिल्यांदाच लिहीली गेली असे नाही.

दुस-या ओळीत वरवर पाहता काही विशेष दिसत नाही. परंतु बारकाईने विचार केला तर कळते कि समर्थांनी जीथे म्हटले, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे', ते बापडे कितीही खरे असो, तु इतकि गोड आहेस ना गं कि मनाचे आकंठ समाधान होते. पुर्ण तृप्त होते. एरवी मनाला असे आकंठ समाधान कसे मिळणार?
===============

तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

- पुन्हा पहिली ओळ तितकिशी पटली नाही. असे वाटले कि दुसरी ओळ पहिल्यांदा सुचली असावी आणि पहिली ओळ ही फक्त vaccum filling साठी लिहीली असावी. असो!

तुला पाहता मुलाने हसावे (यातला 'त्या' हा शब्द, जो पहिल्या ओळीशी संबंधित आहे, मी दुर्लक्षित करतो आहे); किती सुंदर कल्पना आहे. इथे मुलाने हे मी लहान मुलासाठी घेगंधकोशी''त्या फुलांच्या गंधकोशी' मधल्या 'बालकांचे हास्य का' या ओळी आठवल्या.
=================

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

- अरे राधा-कृष्ण किती करोडो कवितात येऊन गेले असतील नाही. पण इथे तु त्याच कृष्णाविषयी नि राधेविषयी (जीला तु या कवितेत गोड असे वारंवार म्हणत आहेस, तीला मी रसग्रहणापुरते राधा धरत आहे) किती वेगळे लिहीले आहेस.

मी आजवर राधेच्या-मीरेच्या गिरीधरावरील भक्तीविषयी ऐकले वाचले होते, पण कृष्णाने त्यांची भक्ती केली असे कधीच ऐकले नव्हते. किती एकतर्फी इतिहास लिहीला जातो असे आत्ता तुझ्या ये शेरावरून वाटून गेले.

ईथे श्रीधर आणि हरी हे शब्द कृष्णनिदर्शक आहेत. हे शब्द सहसा कवितेत दिसत नाही, निदान अशा प्रकारच्या कवितेतरी. परंतु इथे ते शब्द खुप समर्पक वाटतात; छान वाटतात.

पहिल्या ओळीत तु राधेच्या मधुराभक्तीचाच आधार घेतला आहेस. तसा तो सामान्यच वाटतो. पण दुस-या ओळीत तु त्या कृष्णाला, हरीला भक्तांच्या रांगेत आणुन बसवले. जे अगणितजणांचे आराध्य दैवत आहे, ज्याच्या भक्तीने कैवल्यमुक्तीचे आश्वासन मिळते, त्या हरीला तु तुझ्या 'ती'च्या भक्तगणांत आणुन बसवले.

कवितेचे सामर्थ्य यातच आहे कि जे आजवर कुणीच केले नाही, जे कृष्णाविषयी राधा किंवा मीरेच्यासंदर्भानेही कुणी कधी विचार केले नाही, ते तु तुझ्या या ओळीत आणुन दाखवलेस. कृष्णाला तुझ्या तीच्य गोडपणाचे भक्त बनवलेस, इतके जितके राधेने कृष्णावर प्रेमवर्षाव केला असेल.
===========================================

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

- पुन्हा एकदा फार वेगळे लिहुन गेलास. यम, मृत्यु वगैरे दाखले अनेकदा आले असतील अशा प्रकारच्या गझलामधुन. पण तु तीच्या गोडपणाच्या सामर्थ्याची चुणुक यमाला पराजीत करून दाखवली आहेस. आणि यमाला कसे पराजित केलेस; मृत्युवर कसा विजय मिळवला, तर तो तीला जिंकुन तुझे श्वासच चिरायु बनले तर तो बिच्चारा यम काय करणार तुझे वाकडे. तो यम प्राण घ्यायला येईल खरा, पण ज्याचे श्वास त्या गोडपणाला जिंकून चिरायु झाले आहेत, त्याला यम तरी कसा परास्त करणार.

कृष्णाच्या उदाहरणा/उपमेनंतर हा दुसरा फारच उत्कृष्ट कल्पनाचमत्कृतीचा नमुना आहे. आणि अजुन पुढे येणार आहेत.
=======================

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

- अरे कुठे पोचलास. लोक अशा गोड तीच्यासाठी देवदास बनतील, चातक-चकोर बनतील, कृष्ण बनतील, जोगी-बैरागी बनतील, बरबाद कवि बनतील..... पण तु तुकाराम बनायला निघालास. या ओळींनी तु या नुसत्या मधुर कवितेला अलौकिक प्रमाण दिलेस. देवदासाचे किंवा मजनुचे प्रेमात भणंग होणे निराळे. तो केवळ भौतीक प्रेमाचा परमोच्चबिंदु मानता येईल, पण सदेह वैकुंठागमन करणा-या तुकारामाचे भणंग होणे हे परालौकिक आहे, पारमार्थिक आहे. तु यात तुकाराम आणि पांडुरंग हा संबंध सहजतेने योजुन या श्रृंगारिक कवितेला प्रासादिक करून टाकलेस. धन्य!

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

- सुरेख शेर. तुझ्या गोड हासण्याने त्या सौदामिनीवर रूसण्याशिवाय पर्यायच उरू नये....अशी गोड तु!
=================

कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

- या उपमेला मी फार गुण देणार नाही. पण ही जी रचना तु केली आहेस आणि या ओळीच्या अनुषंगाने वरच्या ओळीतला 'मुल्य' हा शब्द किती चपखलपणे योजला आहे ते लक्षात येते. हे रचनाकाराचे कौशल्य असते.
=====================

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

- पहिले म्हणजे तीच्या वर्णनाचे वाक्य असूच शकत नाही; ते महावाक्यच असू शकते. महावाक्यमधुन पुन्हा त्या गोडपणाची अलौकिकता सिद्ध केली आहे. पुन्हा हे ही कविच्या प्रतिभेचे द्योतक.

पण त्यापुढे जाऊन, महाभारत, जे भारतात विसरणे म्हणजे मृत्युसमान आहे, विसरले जावे, अशी गोड तु. प्रत्येक उपमेतुन त्या गोडपणाला श्रेष्ठत्व देण्याचा हा प्रयत्न इतका जबरदस्त जमला आहे, कि नतमस्तकच व्हावे.
==================

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

- वरील सर्व शेर एका बाजुला आणि हा शेर एका बाजुला. म्हणे गालिबविषयी का गालिबने कुणाविषयी (कदाचित मीर) असे लिहीले कि तु मला तो एक शेर दे आणि माझी आख्खि शायरी तुझी करून घे, मला तसेच म्हणावे वाटते आहे यार!

काय लिहु. ज्या बोधिवृक्षाने या समस्त विश्वातील संयम, वैराग्य आणि अनासक्तीचा सर्वोच्च आदर्श असणा-या गौतमास; विष्णुच्या आठव्या अवतारास, ज्ञानप्राप्ती करून दिली, त्या बोधिवृक्षाला तु तीच्या गोडपणाच्या मोहाने आकर्षित होऊन तीच्या दर्शनासाठी रांगेत उभे केलेस, काय रे.....कुठे शिकलास हे सारं. तीच्या गोडपणाच्या दर्शनाचा मोह इतका जबरदस्त कि त्या बोधिवृक्षालाही तो आवरता येऊ नये...अगाध, अद्वितीय......नव्हे; एकमेवाद्वितीय!
=====================

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

- बास, खरंय. तु ही थकलास. शब्दही थकले. सारे शेवटी नेती नेतीच झाले. ज्याला शब्दसामर्थ हतबल करावे अशी गोड तु......

खरे सांगु त्या गोडपणाचं खरं परमोच्च वर्णन या शेवटच्या शेरात येतं. एवढी महागझल नि महान गझल लिहुनही शेवटी शब्दांचं पांघरूण त्या गोडपणाला अपुरं पडतं हेच खरं त्याचं वर्णन.

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

- एकच फसलेला शेर. वाचताना सहज न लक्षात येणारा. पण बारकाईने पाहिले तर इथे तीचे गोडपण दुय्यम-तिय्यम झाले आहे तुझ्यापुढे. तीचे नाव घेतल्याने तुला आठवावे, यात तीच्या गोडपणाची महती कशी बरे...... मला वाटते, इथे विकेट पडली आहे. असो, ते महत्वाचे नाही.

मानवंदना...!!!

मानवंदना...!!!

माणसे अशी जन्मली ती पोलादी,
डोळ्यात ज्यांच्या, जळत्या मशाली...
घावांचा त्यांच्या, सर्वांगी तप्त शृंगार,
अन रोमरोमात, जेव्हा पेटला अंगार...
मी रक्त पहिले तेव्हा.......सरता सरता पसरलेले...!

अशा हाकल्या, त्यांनी वादळात नौका,
चुकवीत किनाऱ्याच्या, काळजाचा ठोका...
तांडव, तुफान, विजा, घेऊन माथ्याशी,
ते भिडले जेव्हा, पिसाळल्या लाटांशी...
मी समुद्र पहिले तेव्हा.......वळता वळता ढवळलॆलॆ...!

खेळ त्यांचा असा दमदार,
क्षणी प्रत्येक, चढता झुंझार......
झुकल्या तमाम माना, होवुनी धुंद,
पराभवातही लढले, जेव्हा अशी झुंज...
मी मैदान पहिले तेव्हा.......हरता हरता बहरलेले...!

भोगली त्यांनी, मृत्यूची अशी नशा,
हालविली धरा,हादरल्या दाही दिशा...
ते जगले, मरणाचा असा दिव्य सोहळा,
सरणावरही शहारल्या, जेव्हा पेटत्या ज्वाळा...
मी आकाश पहिले तेव्हा.......जळता जळता उजळलेले...!

s.gouri
========================================

छान, सुंदर वगैरे प्रतिक्रिया या कवितेला येणं हा कवितेचा अपमान वाटावा. एकतर वाचणाराने निशब्द व्हावे नि प्रतिसाद सुचुच नये; किंवा या कवितेवर निदान सविस्तर निबंध लिहावा ईतका प्रशस्त प्रतिसाद असावा. सुंदर वगैरे सारख्या प्रतिक्रिया (माफ करा) पण फारच खुजा वाटतात.

कुणीतरी हिमालयाच्या उत्तुंग गिरीशिखराकडे पाहुन नुसते 'सुंदर' अशी शिळी प्रतिक्रिया दिली, किंवा लताच्या मुग्ध-स्निग्ध गळ्यातल्या सुरावटीला केवळ 'छान' असे म्हटले तर एखादा रसिक वैतागणार नाही का? माझी अशीच काहीशी स्थिती आहे.

आत्ताच भुषणच्या (मार्गस्थ उषेचा) २ अप्रतिम कविता वाचल्या. आणि या समुहावरील आत्यंतिक आणि फक्त दर्जेदारच लिहीणा-या या 'भावी शांताबाईं'ची कविता उघडली आणि जणु मखमली कागदावर सोनेरी रेखांनी कुणी अमृतमयी शब्दांची पाखर करून एखादा अत्युत्कृष्ट काव्यनमुना रेखाटलेला असावा, किंवा लिओनार्दोनं पुन्हा कबरीतुन बाहेर पडुन मोनालीसासाठी वापरलेल्या कुंचल्यानं एखादं जीवंत चित्र रेखाटावं.....तद्वत ही कविता वाटली.

वर लिहीलं ते फक्त प्रतिक्रियांविषयी...

आता थोडेसे कवितेविषयी:

"गर्जा जयजयकार" किंवा "उषःकाल होता होता"च्या दर्जाची ही अत्युत्तुंग कविता आहे. हो आहे, असा निर्णय देताना मला यत्किंचितही अडखळल्यासारखं वाटत नाही.

पहिल्या दोन ओळीत यमकाच्या अभावाने उत्कृष्ट शब्द आणि प्रभावी आशय असूनही तितकासा प्रभाव पडत नाही. पण कविता पुढे वाचाची एवढे निश्चित वाटून जाते.

आणि त्यापुढच्या ओळीत जो घावांचा श्रृंगार रेखाटला आहे तो काळजाचा ठाव घेतो. मृत्युसंगे ज्यांनी समागम केला त्यांचे घाव हा त्यांचा श्रृंगारच झाला नाही का!

आणि अशा घावांची आभूषणं भूषणानं अंगावर वागवीत या बलिदानवेड्यांच्या अंगाअंगार; अर्थात रोमारोमात, लढण्याचा; झुंजण्याचा जो अंगार पेटविलेला आहे तो खरोखरच अद्भुत आहे.

"चुकवीत किना-याच्या काळजाचा ठोका"
- अहाहा! तो सागर तर हेलावला असेलच...पण किना-याचेही काळिज हलले असेल; त्याचाही काळजाचा ठोका चुकला असेल.

तांडव, तुफान, विजा, घेऊन माथ्याशी,
ते भिडले जेव्हा, पिसाळल्या लाटांशी...
- यातील रौद्र केवळ अकल्पनीय आहे. त्या प्रतिमातुन जी सृष्टी निर्माण होते, ती अंगावर काटा आणणारी निश्चित आहे. दोन मिनिटे डोळे मिटून या ओळी पुनःपुन्हा म्हटल्या तर डोळ्यासमोर तो भयंकर वादळी रणसंग्राम उभा राहतो, आणि शरीर केवळ थरथरते.

पराभवातही लढले, जेव्हा अशी झुंज...
मी मैदान पहिले तेव्हा.......हरता हरता बहरलेले...!
- तीस-या कडव्यात या ओळी हरता हरता जिंकून जातात. पहिल्या दोन ओळी या जर एकेरी-दुहेरी धावा असतील; तर या ओळी एकदम दोन षटकार (कारण अजुन अधिक धावा क्रिकेटमध्ये नसतात) आहेत.
षटकार; छे! हे तर फटकारे आहेत. ज्यांनी जय-पराजयाची तमा न करता, परिणामांची भिती-क्षिती न बाळगता केवळ लढण्यासाठी म्हणुनच लढण्याचा हा संग्राम मांडला त्यांचे हे वर्णन. हरता-हरता त्यांनी बलिदानाची विजयपताका लावली. शत्रुही ज्या शौर्याने केवळ दिग्मूढ व्हावा, रणचंडी स्तंभित व्हावी, मृत्युही आवाक व्हावा असा तो पराक्रम या शब्दात साकारलाय.

शेवटच्या ओळी म्हणजे एखाद्या पिसाटलेल्या कविने फेकलेले शब्द-काव्यरत्न आहे. या कडव्याने कविता संपते त्यामुळे कविता एका वेगळ्याच उंचीवर जाते.

'मृत्युची नशा' या शब्दप्रयोगात त्या बेलगाम प्रवृत्ती प्रकर्षाने दिसून येते. मृत्युचे भय त्या वीरांना नव्हते याहुनही पुढे जाऊन त्यांना मृत्युची नशाच होती हे अधिक गहिरे आणि प्रभावी वाटते. 'सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है'. ते युद्ध स्वतःसाठी नव्हतं, कुणाच्या स्वातंत्र्यासाठी नव्हतं, कुणाच्या हक्कांसाठी नव्हतं, कुणाला अन्यायातुन मुक्त करण्यासाठी नव्हतं; पापावरती पुण्यानं विजय मिळवण्यासाठी नव्हतं; विस्थापितांचं प्रस्थापितांविरूद्ध नव्हतं; तो लढा 'haves' आणि 'not haves' मधला नव्हता; त्या लढ्यातुन कुठलाही 'ism' किंवा कुठलीही 'निती' उभी करायची नव्हती किंवा कुठल्याही तत्वासाठी ते नव्हतं, धरतीचा भार कमी करण्यासाठी नव्हतं कि आदर्श जीवनपद्धती किंवा संस्कृतीरक्षणासाठी किंवा पुनर्स्थापनेसाठी नव्हतं.......

ते कदाचित युद्धच नव्हतं, लढाचं नव्हता.

एका क्षणानंतर या सर्व जाणीवा पुसून जाऊन मृत्युशी समागम करण्यासाठी केलेली ती मृत्युची नशा होती. त्यात मृत्युविषयी कटुता नव्हती; राग, द्वेष, मत्सर किंवा स्पर्धाही नव्हती. त्यांना चढलेला होता बलिदानाचा कैफ; सर्वस्व असे काही राहिले नव्हते, परंतु लौकिकार्थाने जे सर्वस्व होते त्या सर्वस्वावर पाणि सोडुन, मृत्युचे पाणिग्रहण करण्यासाठी निघाले होते ते अनाम वीर. 'मृत्युची नशा' यात असं फार मोठंसं काही लिहुन टाकलंय.

आणि त्याचमुळे त्यामुळे त्यांच्यासाठी मरण हाच दिव्य सोहळा झाला. पण हा सोहळाही ते जगले. मरताना, मरण्याचाच सोहळा जगणे ही केवढी अद्भुत, पण तरिही या अशा अनाम वीरांविषयीची केवढी वास्तवदर्शी, कल्पना आहे. म्हणजे कवि जी कल्पना करतेय ते खरेतर वास्तव आहे. असे वास्तव कि जे आपण केवळ कल्पनेतच विचार करू शकतो. पण असे केवळ कल्पनीय असे वास्तव जे जगले त्यांच्या मृत्युसोहळ्याच्या जगण्याविषयीची ही ओळ या संपुर्ण काव्याला केवळ झळाळीच देत नाही तर अतिशय उंचीवर घेऊन जाते. मोजक्या शब्दांमध्ये त्या झुंजीचा संपुर्ण ईतिहास जो आणला आहे तो केवळ अद्वितीय आहे.

"सरणावरही शहारल्या, जेव्हा पेटत्या ज्वाळा..."

या ओळी वारंवार शरीरावर शहारा निर्माण करतात. 'सागरा प्राण तळमळला' हे गीत वाचुन जर हेलावला नाही तर तो माणुस कसला. तद्वतच, या ओळींनी जर शरीरावर रोमांचांची फुलं फुलली नाहीत तर खरोखरच त्याच्या मनुष्यत्वाविषयी किंवा मनुष्यत्वाची जीवंतपणाविषयी शंका घ्यावी लागेल.

त्या थरथरणा-या ज्वाळाही शहारल्या असतील, नक्किच असतील. केवढे अद्भुत सामर्थ्य निर्माण केले या ओळींनी या काव्यात. क्षणभर शेषशय्येवर योगसमाधित असणा-या जगत्पालकाच्याही डोळ्यात काकणभर का होईना अश्रु तरळुन गेले असतील. त्या निर्जीव ज्वाळा, ज्या आजवर निर्विकार निर्दयतेने ज्या शरीरावर आप्तांनी निस्सिम प्रेम केले त्या शरीराच्या ओंडक्याला जाळुन टाकत असतील. परंतु या विभुतींच्या शरीराला जाळताना त्या ज्वाळाही हेलावल्या नसतील तर नवलच.

"मी आकाश पहिले तेव्हा.......जळता जळता उजळलेले...!"

ही सांगता बरेच काही सांगुन जाते. बलिदानाची परमोच्च पातळी ही कदाचित आध्यात्मिक स्थितप्रज्ञतेकडे जात असावी. त्या वीरांच्या शरीरांना जाळणा-या अग्निशिखांनी जळुन जळुन जाताना ते आकाश आत्म्याच्या तेजोवलयांनी उजळुन गेले असेल काय? कि त्या हुतात्म्यांच्या गगनोगमनाने त्या आकाशात त्यांची तेजस्वी आभा पसरली असेल! कि अग्निच्या ज्वाळातुन त्यांच्या तेजःपुंज आत्मतेजाचे कण संपुर्ण व्योमाला व्यापुन प्रकाशांकित करून टाकत असतील! कि त्यांच्या बलिदानाने ते आकाश दिपून गेले असेल!

असे अनेकविध अर्थ आणि आशय यातुन बाहेर पडतील. पण तरीही या अर्थ न लावता मनामध्ये भरून ठेवायच्या मनाला भारून टाकणा-या ओळी आहेत.

रचनेच्या दृष्टीने पाहिले तरी देखिल ही रचना एकदम वेगळी आणि unconventional दिसते. त्यातील शेवटच्या ओळी या संपुर्ण कडव्याचा परिणाम सांगणा-या आहेत. त्या चार ओळी जरी स्वतंत्रपणे वाचल्या तरी त्यातुन एक काव्य निर्माण होतं आणि या संपुर्ण काव्याचा आशय सांगितला जातो. हेच ते वेगळेपण.

खुप लिहीले आणि या काव्यापुढे शब्दप्रभा आणि शब्दसामर्थ्यही तोकडे पडते आहे, म्हणुन थांबतो. परंतु या काव्याने दिलेला अनुभव अशा अनेक काव्यांना जन्म घालेल अशी खात्री वाटते.
- सारंग भणगे.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...