Friday, June 29, 2012

तू

हाताच्या रेघांवर तू नसलीस
तरी काळजाच्या रेघांवर अजूनही तूच आहेस...

पाऊस जरी पडला नाही तरी,
गदगदलेल्या आभाळात तूच आहेस......

आलेल्या पत्रांच्या शाईत तू कुठेच नव्हतीस,
पण जाळलेल्या पत्रांच्या राखेत तूच आहेस...

माझ्या उषेच्या प्राचीत तू कधीच नव्हतीस,
पण मावळणाऱ्या संध्याछायेत तूच आहेस......

माझ्यावर झालेल्या वारांमध्ये तू कधीच नव्हतीस,
पण झालेल्या प्रत्येक जखमेत तूच आहेस......

माझ्या जगण्यात तू कणभरही नव्हतीस,
पण माझ्या कणाकणान मरण्यात तूच आहेस......
---------------------------------------------------------------
सारंग भणगे (२९ जून २०१२)
 

ठिणगी

कवितांचा पेटवी वणवा
या काळजातली ठिणगी
आभाळभर बोलू लागे
माझी अबोल मुलगी.

शब्दांवर शब्दांचे घर्षण
कवितेची ठिणगी उडते
नि केव्हा हृदयावरती
कवितेची ठिणगी पडते.

कवितांच्या वाचून ठिणग्या
कधी विशाल क्रांती पेटे
नि जीवनी वेचून ठिणग्या
कविता विशाल होते.

कधी ठिणग्या विझून जाती
उरते नुसती धगधग
कवितांमधून मग वाहे
ओसाड नदीची तगमग.

कधी अशी पडावी ठिणगी
या भाव उदधि माझ्या

कवितांच्या भगव्या लाटा
जाळती मनास माझ्या.

हे स्थंडिल व्हावे जीवन
अन त्यात पडावी ठिणगी
कि चेतविण्या ज्वाळांना
हे जीवन व्हावे ठिणगी.
--------------------------------
सारंग भणगे (२९ जून २०१२)

Thursday, June 28, 2012

जीवना

फार झाल्या जीवनाच्या यातना
तू विजेता हारलो मी जीवना

भारताच्या संस्कृतीची थोरवी
भूतकाळाच्याच साऱ्या वल्गना

काय डोळे हे इशारे बोलती
ओठ थोडे खोलुनी तू सांग ना

दूर ती गेली तरी ना एकटा
आज माझ्या संगतीला वेदना

जिद्द आहे जिंकण्याची; याहुनी
दैव देते कोणतीही साथ ना

नित्य नेमे पाहतो फोटो तुझा
ही नसे का दिव्य माझी साधना!

वादळा धावून ये तू अंगणी
मी उभा दारी तुझी जा खैर ना
===================
सारंग भणगे. (१९ जून २०१२) 

Sunday, June 17, 2012

ओढ वेदनेची

जखमा फुलून आल्या
हृदयावरी फुलांच्या,
शृंगार साज केला
अश्रूतुनी दवांच्या

मज ओढ वेदनेची
काट्यातुनी फुलावे,
चुपचाप अन रडावे
वक्षात यामिनीच्या

प्रेतास पाकळ्यांच्या
अभिप्रेत शोक आहे,
गाणे समीर गातो
शोकात मूक त्यांच्या

काही सुकून गेल्या
दु:खाविना कळ्याही,
वेचावया न कोणी
त्या सोबती क्षणांच्या

त्या साद घालती का
मेघास आर्त वेड्या,
त्याने तरी रडावे
डोळ्यातुनी ढगांच्या

हे गीत वेदनांचे
कोणास गीत वाटे
गाणे न या कहाण्या
गंधार्त जीवनाच्या.
=============
         सारंग भणगे (१७ जुने २०१२)

Saturday, June 16, 2012

खपली

=१=
जखमा इतक्या झाल्या कि
वाट पाहतो सरणाची,
आता तरी खपली धरावी
जगण्यावरती मरणाची.
=२=
जखमा म्हणजे फुलणे असते
खपली म्हणजे सुकणे,
जखमा म्हणजे वाहत राहणे
खपली; 'त्याला' मुकणे.
=३=
इतक्या जखमा देशील का रे
चाळण होईल आत्म्याची,
फुलेल ओल्या जखमांवरती
खपली माझ्या कवितेची.
==================
सारंग भणगे. (१४ जून २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...