Monday, February 22, 2010

गवतफुला

फुलं किती सुंदर असतात नाही! कितीतरी रंग; कितीतरी गंध; कितीतरी आकार; नि कितीतरी प्रकार. मला वाटतं फुलं सगळ्यांनाच आवडत असतील.

एकदा तुमच्या मनात तुम्हाला माहित असलेल्या फुलांची उजळणी करून बघा बरं! गुलाब, कमळ, जाई-जुई, मोगरा, शेवंती, झेंडु...... तशी यादी खुप खुप मोठी नक्किच आहे. पण ही यादी कितीही मोठी केली तरीसुद्धा एका फुलाला तुम्ही नक्कि विसरणार; अगदि नक्कि. कोणतं ते फुल?

फुलं किती सुंदर असतात नाही! कितीतरी रंग; कितीतरी गंध; कितीतरी आकार; नि कितीतरी प्रकार. मला वाटतं फुलं सगळ्यांनाच आवडत असतील.

एकदा तुमच्या मनात तुम्हाला माहित असलेल्या फुलांची उजळणी करून बघा बरं! गुलाब, कमळ, जाई-जुई, मोगरा, शेवंती, झेंडु...... तशी यादी खुप खुप मोठी नक्किच आहे. पण ही यादी कितीही मोठी केली तरीसुद्धा एका फुलाला तुम्ही नक्कि विसरणार; अगदि नक्कि. कोणतं ते फुल?

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;

गवतफुल. पाहिलंय कधी तुम्ही ते? कुठे? नीट आठवुन बघा बरं!

कधी कुठल्या टेकडीवर, निळ्याभोर आकाशाच्या छताखाली, संध्याकाळच्या वेळेला लांबवरच्या डोंगरापाठीमागे मावळणारा सुर्य बघताना आपल्या बाजुला, आपलं कधीच लक्ष जात नाही असं, एक छोटंसं गवतफुल आपल्याकडे बघुन हसत असतं. आणि अशाच त्या छोट्याशा गवतफुलावरती ज्येष्ठ कवियित्री इंदिरा संत यांनी एक अतिशय छानशी कविता केली आहे. वाचुया का मग ही छानशी; गोडशी कविता?

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

आपण या गवतफुलाकडे एकदा बारकाईने बघु या. त्याचा निळा किंवा पिवळा रंग, त्याच्या इवल्याशा पाकळ्या आणि त्या पाकळ्यांच्यामध्ये त्या छोटुकल्या गवतफुलाचा गोडसर चेहरा. एखादं छोटंसं निरागस आणि कोमल बाळ असावं तस्सं हे गवतफुल.

बघा ना, कवियित्रीने त्या छोटुकल्या फुलासाठी रंगुल्या, सानुल्या असे किती गोंडस शब्द शोधुन योजले आहेत नाही! आपल्या डोळ्यासमोर एखाद्या छोट्याशा बाळाचा चेहरा उभा राहतो नाही. आणि मग त्या बाळाचा जसा लळा लागतो, तसा लळा या गवतफुलाचा लागला नाही तर नवलच.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

मी म्हटले ना कि एखाद्या टेकडीवर तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हे गवतफुल भेटेल खचित. पण कवियित्रीला ते माळावर पतंग उडवित असताना भेटले. इथे माळ म्हणजे मोकळे पठार किंवा आवार. आता तुम्ही म्हणाल कि आता असे मोकळे माळ राहिलेत कुठे. आणि पतंग तरी कुठे उडवतात आता.

पण म्हणुनच एकदा कधीतरी या गवतफुलाला भेटायला तुम्ही जवळ कुठेतरी टेकडीवर जा, किंवा पिकनिकला गेलात कि अशा गवतफुलाला नक्कि शोधा आणि बघा ते गवतफुल कसं तुमचं हसुन स्वागत करेल. आणि त्याचं ते इवलंसं सौंदर्य पाहुन तुम्हीदेखिल हरखून जाल, या कवियित्रीसारखेच.

बघा बघा, ती कवियित्रीदेखिल पतंग उडवताना या वा-यावर हळुवार झुलत झुलत हसणा-या गवतफुलाकडे पाहुन पतंग वगैरे सारं विसरून त्या गवतफुलाच्या रंगामध्ये हरवूनच गेली. अस्सं त्या गवतफुलाचं गोड-गोंडस रूप कि त्याचे काय वर्णन करावे! हं, काय वर्णन करावे, ते आता पुढच्या कडव्यात पाहुयात.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

या ओळी पुन: पुन्हा वाचा. त्यात किती रंग सामावले आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टींविषयी त्यात वर्णन आहे, प्रत्येक रंग आणि गोष्टीला काय विशेषणं लावली आहेत...सगळं सगळं नीट बारकाईनं वाचा.

बघुया हं आपण आता हे वर्णन कसं सुंदर आहे. गवताच्या ज्या पात्यांवर हे छोटुसं फुल वा-यावर झुलत असतं त्या पात्याचा हिरवा गार रंग डोळ्यासमोर आणा. ते नाजुक पातं, त्याचा मऊ मऊ रेशमी स्पर्श! तुमच्या बोटांना तो स्पर्श होतोय असा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. त्या पात्यांची अलवार वा-याबरोबर होणारी अलगद हालचाल पहा. आणि मग अशा या हिरव्या नाजुक गवताच्या पात्यांमध्ये एक निळ्या-निळ्या पाकळ्यांचं ते छोटुकलं फुल कसं डुलत असेल नाही! इथे लिहीलेला निळुली हा शब्द आधी तुम्ही कधी ऐकलाय का हो! नाही ना...मी ही नाही ऐकलेला. पण इंदिरा संत यांनी तो मुद्दामच वापरलाय आपल्या छोटुकल्या-पिटुकल्या सानुल्या गवतफुलासाठी. 'निळी पाकळी' यातुन फक्त ती पाकळी निळी आहे, एवढेच सुचित होते. पण निळुली पाकळी यातुन मात्र निळी आणि छोटीशी पाकळी असे दोन्ही सुचित होते, होय कि नाही! कवितेमध्ये कवि असेच काही नवीन शब्द वापरून भाषा समृद्ध करत असतात.

तर या निळ्या निळुल्या पाकळ्यांच्या मध्ये मात्र पिवळ्या रंगांचे परागकोष असतात आणि सुर्यकिरणांमध्ये ते झगमगतात. बघा किती विहंगम रंगसंगती आहे. हिरव्या पात्यांच्या मध्ये निळ्या पाकळ्या नि पिवळे पराग असलेलं निसर्गाचं ते छोटंसं अद्भुत रूपडं किती गोड वाटत असेल नाही!

अहाहा! अशा त्या तान्हुल्या फुलाबरोबर सगळं सगळं, अगदि शाळा, टीचर, आभ्यास, विसरून त्याच्यासारखचं लहान लहान व्हावसं वाटलं ना! वाटु दे. आपल्या कवियित्रींना देखिल तेच वाटलं बरं का मित्रांनो. बघा तर खरे पुढचं कडवं...

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

लहान मुलासोबत खेळताना लहान व्हावे वाटते आणि त्याच्याबरोबरच सारे विसरून खेळत रहावे वाटते ना, तसेच या आपल्या गवतफुलाबरोबर देखिल सर्व काही विसरून त्याच्या गोडगोजि-या विश्वात हरवुन जावेसे वाटते.

आभ्यास माफ होईल का माहित नाही, पण एकदा अशाच कुठल्याशा माळरानावर जाऊन आपल्या या छोटुकल्या सानुल्या गवतफुलाला तुम्ही भेट भेट देऊन या सुंदर कवितेचा जीवंत अनुभव घेणार ना!

सारंग भणगे.

Sunday, February 14, 2010

प्रकाशप्रेत

व्याकुळ सांजवेळी डोंगरमाळ रडते;
हिरव्या पाण्यामध्ये खिन्न छाया पडते.

सुर्य क्षितीजापाठी जराजर्जर दडतो;
राऊळकळसावरती अंधार गर्द पडतो.

डोंगरसरणावरती प्रकाशश्वास मेला;
रीत्या रांजणामध्ये अंधार खोल गेला.

बंद दिशांचे पिंजरे भरले अंधाराने;
उजेड पळुन गेला मावळत्या दाराने.

जीवंत झाल्या पुन्हा गूढ उदास छाया;
गावकूसात शिरली भयजर्द काजळमाया.

अवघा आसमंत काळ्या पुरात भिजला;
वृक्षांच्या अंगोपांगी अंधार पुरता थिजला.

विश्व स्मशान झाले पुरला उजेड आहे;
प्रेतास जाळणारा उरला उजेड आहे.
==================
सारंग भणगे. (१४ फेब्रुवारी २०१०)

Tuesday, February 2, 2010

आनंद

दु:खाच्या डोहात; आनंदाचं पाणी,
दु:खाच्या मुखात; आनंदाची गाणी.

दु:खाच्या काट्यावर; आनंदाचं फुल,
आनंदाच्या फाट्यावर; दु:खाला हुल.

आनंदाच्या चुलीत; दु:खाची लाकडं,
दु:खाच्या देवाला, आनंदाचं साकडं.

दु:खाच्या जीवनात; आनंदाचा श्वास,
दु:खाच्या मथुरेत; आनंदाचा रास.
===================
सारंग भणगे. (१ फेब्रुवारी २०१०)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...