Tuesday, December 7, 2010

'ई-वर्ले अक्षर'

हे अक्षर जे ई-वरले
ऐकुनी काळीज गहिवरले!

प्रतीभेच्या त्या उज्वल वाटा;
उदधिवरती प्रशांत लाटा;
कुसुमावरती फुलुनी काटा;
रोमांचित ते थरथरले,
ते अक्षर हे ई-वरले II१II

पाऊस बोले अमुची वाणी;
गाई गारवा अमुची गाणी;
ग्रीष्मावरती शिंपून पाणी;
मेघस्वरांनी सरसरले,
ते अक्षर हे ई-वरले II२II

साखरे सारखी गोड अक्षरे;
सुस्वर गाती काव्यपाखरे;
रसिक ऐकती मोदमंदिरे;
भावसुधेने जे भरले,
ते अक्षर हे ई-वरले II३II

आंत्रनेत्र (Internet) तो भिजून जातो;
नभपटलावर (virtual) दिसून जातो;
ह्रुदय-कोंदणी बसून जातो;
मनामनातुन जे अंकुरले,
ते अक्षर हे ई-वरले II४II

मरणानंतर सरणावरती;
फुटलेल्या अन धरणावरती;
पाऊल पडता पर्णावरती;
नाद समेचे कुरकुरले/ चुरचुरले,
ते अक्षर हे ई-वरले II५II
=================
सारंग भणगे. (५ डिसेंबर २०१०)

Saturday, December 4, 2010

संमोहिनी

अशी ही रूपगर्विता चालली वनामध्ये
यौवनास पाहुनी सळसळी मनामध्ये

सांजवात चोरटा छेडतो निलाजरा
हासतो गुलाबही होउनी लाजरा

पावलास स्पर्शता धन्य ती वसुंधरा
चालते; नाचते तृणात ती सुंदरा

गोड बोल बोलते माधुरी ती मोहिनी
घालते सहजचि मोहना संमोहिनी.
================
सारंग भणगे. (४ डिसेंबर २०१०)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...