Tuesday, May 28, 2013

शाश्वत!


फाटलेलं आख्खं आभाळ शिवायला;
कवितेची सुई नि शब्दांचा दोरा...... पुरायचा नाही!
अन धरतीचे अश्रू जर कागदाने पुसले;
तर कवितेसाठी कागदही उरायचा नाही!
 
आताशा कविता म्हणजेही....
कागदाच्या होड्या आणि कागदाची फुलं!
नुसत चित्रातच दिसतंय
कोवळं गवत नि आकाश खुलं.

चकचकीत काचांची चमचमणारी घरं;
सारं जगच झालं आहे शोभिवंत,
पण त्या घरांमध्ये राहायला
खरंच आहे का कुणी जिवंत!

काळोख आता लोपून गेला;
रात्रीसुद्धा दिव्यांची रोषणाई,
टीव्हीच्या गदारोळात आता
कुणी गातच नाही अंगाई.

विषण्णपणे मी आभाळाकडे बघतो....
एक तारा निखळतो;
अजूनही ‘तो’ मात्र शाश्वत आहे!
मेणाचा माणूस अखेरीस वितळतो.
=======================
सारंग भणगे. (२८ मे २०१३)
 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...