Saturday, March 27, 2010

इंदु

या रात्रीत इंदु दळतोस काय पीठ,
खिडकीतुनी शिरतो निलाजरा धीट.

इवल्या फटीचा तुज पुरेसा सहारा,
बाहुंच्या तुरूंगाला दे चोरटा पहारा.

भिजले चुंबनात चिंब पाही काफिर हा,
रात्रीत फिरणारा एकटा मुसाफिर हा.

वेलबुटी यौवनाची देहास नक्षिदार,
प्रीतीच्या गुन्ह्याचा एकटा साक्षिदार.
================
सारंग भणगे. (२००९)

Friday, March 26, 2010

सात बाळे

आकाशाच्या पटांगणी आली सात बाळे,
कुणी तांबडे कुणी जांभळे कुणी निळे नि पिवळे.

सवंगडी खेळायाला ढग पांढरे आले,
भांडण तंटा करून सारे झाले काळे काळे.

रंग पाहुनी येती पक्षी आकाशात उडती,
रंगीत सुंदर पक्षांवरती रंगीत रंगीत जाळे.

खेळ खेळुनी दमून गेली परतुन घरात आली,
घेऊन दुलई अंधाराची मिटुन घेती डोळे.
===================
सारंग भणगे. (२५ मार्च २०१०)

Tuesday, March 23, 2010

जगावं???

रोज जुनीच पावडर लाऊन
नव्या गि-हाईकाच्या लचक्यांना
मूक साथ देत...
जगावं???

शरीराचं लक्तर घेऊन
झडलेल्या हाता-पायांनी
भिकेचे डोहाळे घेऊन...
जगावं???

हळदीचा रंग उतरायच्या आधिच
कुंकवाच्या धन्याचे
पाठ कुंकवासारखि लाल करणारे
रट्टे खात जनावरासारखं...
जगावं???

वासनेचा जहरी साप
कोवळ्या देहकळीला लुचुन
लुटलेल्या कौमार्याचा शाप वागवीत...
जगावं???

वर्षा-दोनवर्षाचं गुंजभर मांस
निरागसता लाचारीची दास
खुलण्याआधीच खुडण्यासाठी...
जगावं???

आश्रिताची आगतिकता
याचकत्वाची वंचना
लोंबणारी वृद्ध कातडी मिरवत
मृत्युचे उंबरठे झिजवत...
जगावं???
===============
सारंग भणगे. (२३ मार्च २०१०)

Friday, March 19, 2010

मधुचंद्र

अधरांस मिटुनी अधिर धरती,
आकाश उभे ते क्षितीजावरती,
आलिंगनाच्या उत्सवात येते,
चंद्रास पाहुनी सागरात भरती.

भुले पंकजाला तो भुंगा विरागी,
विलास चाले फुलाच्या परागी,
मधु पावसाने तो चिंब होई,
पतंगास आनंद जळता चरागी.

कुठे केशराचा मृद्गंध सुटावा,
कुठे अत्तराचा चिद्गंध उठावा,
कुठे अमृताच्या गंगेत न्हावे,
कुठे कस्तुरीचा सद्गंध फुटावा.

प्रणयात बुडोनी बेधुंद व्हावे,
श्रृंगार लाटात आकंठ न्हावे,
गात्रात पेटुन भरावे निखारे,
मधुचंद्ररात्री आनंद भावे.
============
सारंग भणगे. (१९ मार्च २०१०)

Thursday, March 4, 2010

तडफड

आसवांत चिंब चिंब
काळजाचे तुकडे तुकडे.
भावनांच्या चिंधड्या
पसरल्या जिकडे तिकडे.

किती साहु? कसे साहु?
आग आग होत आहे.
कुणा सांगु? काय सांगु?
राग राग होत आहे.

सैरभैर वारा वाही
मनात येते काही बाही
भयशंकेची पाल चुकचुके
अंगाची हो लाही लाही.

अंतर्बाह्य होई जळजळ
कसे पचवु हलाहल हे
ह्रदयरक्त वाहे भळभळ
आता पुरे हालहाल हे.
===========
सारंग भणगे. (४ मार्च २०१०)

Monday, March 1, 2010

का हसावा चंद्र गगनी

पौर्णिमेचा चंद्र जणु कि चंद्रकोरही माझी सजणी |
मुखकमलाला पाहुन पडते निळे चांदणे माझ्या नयनी ||
जरी भासते उदास कष्टी दु:खमग्न ती काळी रजनी |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...

सोज्वळतेचे नाव ती दुसरे, प्राजक्ताचे फुल ते हसरे,
तीला पाहता माझ्या मनिचे, भगवंताचे रूपही विसरे.
वीणा घेऊन स्वर्गस्वरांची जणु शारदा गाते गाणी |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...

ओठ मिटुनी स्मित करते, खिन्न रात्रीचे सावट सरते,
नेत्रचाप ते बाण सोडती, ओष्ठद्वयातुन अमृत झरते.
कळीसारिखे मधुर लाघव गोडगुलाबी कपोल दोन्ही |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...

इंद्रसभेच्या पटलावरती, जशी मेनका अवतरली ती,
सुरईमधुनि देवसुरेच्या, विशुद्ध गंगा झरझरली ती.
देव दानव यक्ष किन्नर, स्तुती गायिली गंधर्वांनी |
अता समजले मला स्पष्टसे, का हसावा चंद्र गगनी ||
का हसावा चंद्र गगनी...
=========================
सारंग भणगे. (१ मार्च २०१०)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...