Saturday, November 29, 2008

आकांत.

जीवास मूल्य नाही; नित्य झाले आघात,
राजा करी प्रजेचा.. घात;झाला प्रघात.

थडग्यात जीवंत झाली; अपत्ये अधर्मी,
कर्दमात लोटली जनता; डुकरे नीचकर्मी.

बडदास्त बड्यांची बडी; बोकडे कटली;
खासदारी आमजनांची; गा-हाणी थटली.

स्फ़ोटात फ़ुटली उरे; विदीर्ण शरीरे,
बोचती जखमांची शरे; तुटली शीरे.

पुरात बुडाले कुणी; कुणी कर्जात,
कत्तली दंगली नित्य; प्रदेश कधी जात.

फ़ोडल्या मशिदी मंदिरे; बांधल्या उंच भिंती,
चिणली माणुसकी त्यात; ठेचली धर्मनीती.

त्याग झाला निष्फ़ळ; भोगलिप्सेचे कल्लोळ,
नशा-निराशा-नाशाचे; तारुण्यावर लोळ.

उभा देश जळतो आहे; मानवता भ्रांत,
घणाघाती आघात; अगडोंब आकांत....अगडोंब आकांत.
===================================
सारंग भणगे. (28 नोव्हेंबर 2008).

Tuesday, November 25, 2008

रेडा ज्ञानियाचा.

असे भाग्य लाभो,
आज व्हावे रेडा,
मुखी गावे वेद,
ज्ञानियाचा वेडा.

अशी व्हावे भिंत,
ज्यावरती आरूढ,
चतुर्वेद साक्षात,
हृदयस्थ व्हावे रूढ.

अशी व्हावे झोपडी,
जीची बंद ताटी,
मुक्ताई ठोठवे जीस,
ज्ञानियासाठी.

अशी व्हावे शिळा,
काय भाग्य वर्णू,
आजन्म पहावी,
संजीवन ज्ञानधेनू.
=======================
सारंग भणगे. (25 नोव्हेंबर 2008)

Sunday, November 23, 2008

काजव्यांची वस्ती.

कित्येक गेल्या सकाळी
उजाडलेच नाही तीथे,
कित्येक अंधाररात्री
सरल्याच नाही तीथे.

फ़ुललेली फ़ुले तीथे
फ़ुलताच मलिन झाली,
रोज रात्री पुनःपुन्हा
ती कांता कुलीन झाली.

पोटात पेलताती
वासनांचे विसर्ग,
नरकात उभारले
भोगालयाचे स्वर्ग.

भले कुणी म्हणावे
हे करणे पाप आहे,
मी का न म्हणावे
हे जगणे शाप आहे?
======================
सारंग भणगे. (10 नोव्हेंबर 2008)

कविता

ज्यास आदि त्यास अंत
यमनियम हा सिद्ध आहे
चिरंतन व्हावी चिरंजीव कविता
उन्मुक्त ती अबद्ध आहे.

==========================================
सारंग भणगे. (नोव्हेंबर 2008)

टक्कल

डोक्यावरच्या केसांनी केला, ताळेबंद हरताळ,
मोठे झाले तेव्हापासून, आमचे उजाड कपाळ.

डोकावतो पुंजक्यातून काळ्याभुरट्या केसांच्या,
आशाळभूत पहात असतो, तेलांकडे वासांच्या.

हसतात त्याला सारेच सदा, बसते तरी शांत,
काय करावे त्याने तरी त्याला केसांची भ्रांत.

डोक्यावरती उन्हामध्ये चमकू लागले छान,
उघड्या बोडक्या डोक्यावर डबडबून आला घाम.

तुम्ही म्हणता घर्मबिंदु, आम्ही दंवबिंदु,
तुम्ही म्हणता टक्कल त्याला, आम्ही अर्धेन्दु.

आयुष्यात सा-यांनाच मिळतात अर्धचंद्र,
त्यालाच तेवढे पाहून मात्र हसतात ही बंदरं.

अर्धचंद्र असूनही माथी शंकराला मिळते पार्वती,
डोक्यावर अक्षतांसाठी शोधतोय, मि-या वाटणारी कार्टी.
================================================
सारंग भणगे. (21 नोव्हेंबर 2008)

Saturday, November 22, 2008

वेळ

जानकी....
ती 'वेळ'च तशी होती,
रावण जिंकणा-या रामाला,
धोब्यानं बोलण्याची..

अहिल्येला मुक्त करणा-या राघवाला,
सीते, तुझी सुवर्णमुर्ती
अश्वमेध यज्ञाला बसवण्याची...

ती वेळच तशी होती, पृथे....
तुझ्या प्राक्तनाचा समागम
हिरण्यगर्भाशी होण्याची,
आशिर्वचनच शाप होऊन
तुझ्या गर्भात दुःखाचं मूल कि मूळ
जन्म घेण्याची.....

अहिल्येSSS, ती वेळच तशी होती...
तपस्वी गौतमानंही,
संयमाचं दावं तोडून
तुझ्या भाग्याला ढुशी देण्याची,
कुणाच्या लालसेनं
कुणी लाथाडावं
कुणाच्या लाथेतून
मुक्त होण्यासाठी.....

ती वेळच खरेच तशीच होती, रेणूके.....
दुष्टांचं निर्दालन करुन,
उदधिला मागं सारणा-या
चिरंजीव भार्गवानं,
पित्याच्या आज्ञेसाठी
जगन्मातेला परशुचे कंठस्नान घालण्याची..........

कसली ही अभद्र वेळ..........
======================================================
सारंग भणगे. (22 नोव्हेंबर 2008)

अंधार

तिमीराच्या कक्षेमध्ये
शिरला एक किरण
अंधाराला चिरत त्याने
धरले धरतीचे चरण

अंधार झाला अस्वस्थ
अचळ तो ही चाळवला
एकाच छोट्याशा किरणात
तिमीरही मावळला


सावल्या चपापल्या
भिंतीला चिपकल्या
पालींच्या पिलावळी
प्रकाशाने झपकल्या.

सहसा अंधाराला
नको प्रकाशाची सोबत
पहुडल्या अरण्याला
नको जागेची नौबत.
===============================
सारंग भणगे. (22 नोव्हेंबर 2008)

Tuesday, November 18, 2008

बाजीप्रभुंचे विजयोद्गार


लढेन मी लढेन मी,
मृत्युकडा हा चढेन मी.

धडधडेल ना हे ह्रुदय जरी,
फ़डफ़डतील हे बाहु परी,

शत्रुवरती खड्गविशाखा
अस्मानातून पडेन मी.

शत्रुसेना मृत्युसेना
उडेल दोघांचीही दैना
पराक्रम हा पराकोटीचा
कोटीकोटी मुंड खुडेन मी (1)

धीर नको रुधिर हवे
यमयज्ञाला शीर हवे
तोषवीन मी काळभैरवा
तदनंतरच पडेन मी. (2)

भुजा नव्हे या तरवारी
कंठ नव्हे महातुतारी
ऊर नव्हे ढाल अभेद्य
मृत्युमुशीतून घडेन मी. (3)

आवेश हा वेष नव्हे
त्वेष हा द्वेष नव्हे
रक्त पिऊनी खड्गाने
ऊर फ़ाडूनी रडेन मी. (4)


नरमुंड्या धारूनी रणचंडी
कृतांतकटकाची दिंडी
वाजत गाजत वायुवरती
मृत्युसुगंधित उडेन मी. (5)

दरी नव्हे ही यमोदर
मृत्यु भासे सहोदर
अकाल काळा तोषविण्या
खिंडीमध्ये जडेन मी. (6)

शत्रु भले असो दिलेरीचा
छावा लढतो शीवकेसरीचा
अखेर 'बाजी' जिंकण्यासाठी
खिंडीमध्ये भिडेन मी. (7)

विझण्याचे केवळ एकच कारण
प्राण ठेवले त्यास्तव तारण
फ़ैरी झाडता तोफ़ बुलंदी
मृत्युकड्यावरून पडेन मी. (8)

==========================================
सारंग भणगे. (नोव्हेंबर 2008)

Sunday, November 16, 2008

चैतन्य

जीथे सोडला हात त्याने; तिथेच तोड़ बंध त्याचे,
जीवन 'बघ' पुढेच आहे; 'स्वप्न' कशाला 'अंध' त्याचे.

शेष इथे ना काही रहाणे; जीवन म्हणजे फ़क्त वहाणे,
अवशेषही अखेर नश्वर जगी; शोक म्हणजे फ़क्त बहाणे.

जो तुटला तो तुटला; तारेही अवचित तुटताती,
पाणी भासे अखंड तरी; तुषार त्यातूनी फुटताती.

आणा भाका शपथ प्रतिज्ञा; सारेच खेळ अहंकारी,
ठेउनी मागे पिलांस घरटी; पक्षीही जाती दिगंतरी.

पार्थिव अवघे ठेउनी मागे; सारावे जीवन दैन्य,
चिरंतन असे काहीच नाही; केवळ चिद्घन चैतन्य.
===========================
सारंग भणगे. (१६ नोव्हेंबर २००८)

Sunday, November 9, 2008

मृत्युभेटी जाताना.....

हा क्षण धन्यतेचा!
हा क्षण पूर्ततेचा!
राजा तव हुजुरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

मनि न उरले कसले किल्मिष
काय पुरावे आता आमिष!
झालो अधीर पुरता अनिमिष
स्वराज्यवेदीवरी; कराया मृत्योत्सव साजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

प्रगाढ मिठी ही अंधाराची
बारीक चाहूल जनावरांची
जटिल जाळी धीवरांची
हूल देऊनि, हळूच निसटा; या यवन अजगरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

जाता तुमची दूर पालखी
आयुष्याची लिप्सा हलकी
जीजीविषा ही होय शेलकी
सफ़ल होता हेतू तर मग; मृत्युही दिसे गोजीरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

जीवंतपणी ना जरी वाजले
शरीर अलगुज आता सजले
बलिदानाचे सूर पाजले
मृत्युओठी अखेर वाजवा; कि मुरडा या गाजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

प्रसंग बाका दिलेरीचा
वेढ्यात राजा शिवनेरीचा
नजराणा या शरीराचा
पेश करता होईल कठोर मृत्युही लाजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

फ़ितवेन अवघे शत्रुशिबिर
लावेन ललाटी त्यांच्या अबीर
भेद खुलता अतीव खंबीर
अभेद्य राहतील राज ऊरी; जरी फ़ुटला शरीर पिंजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

शत्रुहाती मी मृत झालो
इतिहासातून विस्मृत झालो
तरी म्हणेन कृतकृत झालो
स्वातंत्राच्या सूर्यासाठी; अर्पण शिवबांचा हा हुजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...

===================================
सारंग भणगे. (ऑक्टोबर 2008)

मृत्युसोहळा

इस्पितळाच्या उद्घाटनाचा तो सोहळा होता,
शय्येवरती तळमळणारा जीव कोवळा होता.

वैद्यराज ते अगत्याने स्वागता उत्सुक,
यमराज ते आगंतुक प्राणहरणा उत्सुक.

दिमाख पोषाखांचे त्यांच्या अत्तरांचे सुगंध,
प्राण असती त्या रूग्णाचे श्वासयंत्रात बंद.

उत्तमोत्तम पदार्थांची श्रीमंत अशी मेजवानी,
नसात सुया खोवून वाहते सलाईनचे पाणी.

अभिनंदनाच्या फ़ैरी आणी भेटींचा वर्षाव,
आगाऊ रक्कम चुकता आहे जगण्याला अटकाव.

ग्राहक तो रूग्ण त्यासी पाहती सारे दुरून,
यातनांच्या शय्येवरती दुःखाचे पांघरूण.

भिंतीवरती लिंबूमिरच्या काळ्याबाहुल्या खोचलेल्या,
डोळ्यांभोती झटपटलेल्या काळबाहुल्या नाचल्या.

थाटात बुडाले सन्मान्यजन, परदुःखाचे सोहळे,
कर्जात बुडाले सामान्यजन, रूग्णास मृत्युचे डोहाळे.
===================================
सारंग भणगे. (नोव्हेंबर 2008)

येशीलच तू कधीतरी

अनंत मरणे भोगीत जगे
थोपवून मृत्यु शरपंजरी,
एकच आशा भीष्म निश्चित
येशीलच तू कधीतरी.

शापित संचित घेऊन भाळी
कवच देऊनि कर्ण भिकारी,
रुतता चक्र रथाचे निश्चित
येशीलच तू कधीतरी.

शतशत वधून असुर दानव
श्रांत तरी ना श्याम मुरारी,
अटळ यादवी अनंतास अंती
येणारच तू कधीतरी.

कडाडली ती वीज नभी
उपसून हाती तलवारी,
झाशीवीण जीणे व्यर्थ असता
येशीलच तसाही तू कधीतरी.

घावावरती घाव पडती,
छिन्नविछिन्न छातीवरी,
जीवंत 'बाजी' मरण्यासाठी
येशीलच तू कधीतरी.

मी फ़क्त म्हणालो "प्रेम करा",
अन् तुम्ही चढविले मज सूळावरी,
येशीलच तू कधीतरी पण,
पुन्हा यायचे तुज कधीतरी.

नवदिशांचे आव्हान पेलण्या
भिस्त अमुची शिडावरी
भूतळी वा सागरतळी
येशीलच तू कधीतरी.

आज अखेर युगान्त झाला,
देह अवघा चंदन झाला,
अस्तंगत भास्कर उदधि-उरी,
येशीलच तू कधीतरी.

==========================================
सारंग भणगे. (नोव्हेंबर 2008)

Saturday, November 8, 2008

मुक्त मन

एकच दिवस असा यावा, वा-यालाही सुगंध यावा,
प्राणवायु नसेल तरी; श्वास स्वच्छ धुंद यावा.

पिंज-यातले नुसते धावणे; जन्माला या पुजलेले,
क्षण काही तरी मिळावे; थकले डोळे निजलेले.

रहाट आहे चालु सदैव; जगणे कसले सडलेले,
फ़ेकून द्यावे एकदा तरी; खोटे कायदे किडलेले.

नाती ना ती कळलेली; नुसती नियती जुळलेली,
व्हावी निदान एकदातरी; ओली फ़ांदी वाळलेली.

दंग कोकिळा गाण्यामध्ये; पिलास भरविते काऊ,
स्तनामधल्या पाझराने; बाळा घालावे न्हाऊ.

उर्मी सर्वदा उंच उडावे; उगा अन् मग पंख थकावे,
सवंगड्यासह शीतल पाणी; अंगावर कधी शिंपावे.

मुक्त मनाने कधी वाटते; अंबरात मुग्ध विहरावे,
आकाशाच्या भारानेही; क्षितीजावरती पसरावे.
===============================================
सारंग भणगे. (08-11-2008)

Tuesday, November 4, 2008

मृत्युकविता - 2

निधड्या छातीवरती घेतो; झेलून गोळी शत्रुची,
काय तमा मग निर्भीड आम्हा; येणा-या त्या मृत्युची.

भाऊ पाठचा म्हणेन तुजला; पाठ राखतो सदैव अमुची,
पाठशिवणी खेळत खेळत; चुकवितो छाया मरणाची.

हाती हात सतत त्याचा; सहोदर आहे जन्माचा,
सोबत संगत कुणी नसता; सहवास असतो मृत्युचा.

शत्रुहाती पडण्याआधी; गळाभेट हो मृत्युची,
अनंत मरणे जगण्याहुनी; कुशी बरी ती अटळाची.
==============================================
सारंग भणगे. (03 नोव्हेंबर 2008)

Sunday, November 2, 2008

येशीलच कधीतरी तू

पुन्हा जन्म घाली मला फ़क्त मृत्यु
निश्चित संभवतो, मृत्युचाही मृत्यु

येशीलच तू कधीतरी; वादळाची लाट घेऊनी,
तुझ्या वादळाला असेलच की रे मृत्यु.

इतिहास साक्ष आहे; रुतल्या पाठीत खंजिरी,
कधी घात केला नाहीस तू रे मृत्यु.

कुणा मारूनी तू कधी मुक्त केले,
म्हणू का न तुजला दयाळु रे मृत्यु.

तुला कोसताती किती जीवात्मे अनंत,
कसा निर्वीकार राहतोस तू रे मृत्यु.

कधी प्राण घेई कुणा अर्भकाचे,
कठोरा तुला काय नसते काळिज मृत्यु?

तुला प्राण घेणे नसे नवखे प्ररंतु,
कधी प्राण घेता ओशाळलास का रे मृत्यु?

अनिवार्य म्हणती तुला कोण वेडे,
अश्वत्थाम्यापुढे रे तू लाचार मृत्यु.

येशीलच कधीतरी तू, तुला का भिवावे,
दिवसास रजनीचे भय नसते रे मृत्यु.

येशीलच कधीतरी तू, भले येशीलच की रे,
संजीवन ज्ञानदेव झाला तू हरलास मृत्यु.
==============================================
सारंग भणगे. (02 नोव्हेंबर 2008)

Saturday, November 1, 2008

"वनमृगजल"

गर्द रानी गहिरी वाट
विशाल वृक्षे वन घनदाट
उदंड वनिता हिरवी लाट
तलम धुक्याचा आंतरपाट

हस्तसरींच्या विराट धारा
पिसाट सुटला वादळवारा
उत्फ़ुल्ल् फ़ुलला हरित पिसारा
मेघ गर्जती तारस्वरा

काय म्हणावे सृष्टीमैथुन
वसुंधरेसह व्योमी मंथन

उचंबळले गगनाचे स्तन
मेघनभांचे धरालिंगन

अजस्त्र उठली ढगात लाट
जळात बुडली प्रांजळ वाट
सरीता वाहे जणू विराट
ताम्रसुरेचा गढुळ पाट

वनचर सारे थरारले
वनवैभवही शहारले
धुरकट अंतर काहुरले
मृग भयकंपित बावरले

वनात उधाण भयाण वारा
वरुन वाहती विराट धारा
मृगास वाटे वाट सहारा
भ्याले पाहून प्रवाह पहारा

वनसृष्टीचा हरित रंग
मृदायुक्त ताम्र जलतरंग
सुवर्ण कांतीचे मृगसारंग
किशोर चित्रीत अद्भूत रंग

================================
सारंग भणगे. (01 नोव्हेंबर 2008)

"मुक्त"

जातेस? निःसंकोच मनानं जा!
जाताना....... घराचं दार घट्ट लाऊन जा,
तुझ्या स्मृतींचा वारा...
दाराच्या फ़टीतून झिरपणार ही नाही..
इतकं घट्ट.
गेल्यानंतर परतायचे सारे मार्ग,
तुझ्या पावलांचे सारे माग...
पुसत जा.
फ़क्त तुझ्या भाबड्या अश्रूंचे...
चारच थेंब त्या पेल्यात सोडून जा,
माझ्यासाठी.
जाताना सगळी भांडी स्वच्छ धुवून..
निथळायला ठेव;
आता ती पुन्हा उष्टावणारच नाहियेत.
त्यावरच आसक्तीचं सगळं पाणी निथळू देत.
सगळं घर स्वच्छ झाडून घे;
सगळी जळमट काढून टाक;
आणी घरभर पसरलेली..
आपल्या सहवासाची क्षणमौक्तीक
वेचून...
एका पॉलिथिन मध्ये गुंडाळून घेऊन जा;
अन् जाताना ती एखाद्या..
कुमारी आगीत टाकून दे.
एकदा सगळ्या खोल्यातून डोकावून जा..
कुठे माझ्या ह्रुदयातील..
तुझी हळवी स्पंदनं दिसतील,
त्यांना तसेच राहू देत,
मला एकांतात साथ द्यायला.
सगळ्या खिडक्या बंद करुन घे,
धुळींची कुठलीच वादळं..
पचवायची ताकद माझ्यात आता नाही.
खिडक्यांचे पडदेही सारखे कर,
अतिथि म्हणूनही प्रकाशाचे किरण मला नको आहेत.
आता या..
अंधारल्या विश्वाचा निकोप निरोप घे,
निरोपाचा हातही न उंचावता.
जाताना एक्दाच मला तुला..
डोळे भरुन पाहू देत,
या अंधारविश्वात..
तुझं वास्तव्य हरपण्यापूर्वी,
तुझं अस्तित्व मला काळजाच्या मखरात...
साठवून घेऊ देत,
जर अश्रूंच्या पडद्यातून..
ते धुसरपणे दिसलं तर.
आता,
अखेरचा निःश्वास घेण्यास,
मी "मुक्त" आहे.
========================================
सारंग भणगे. (Oct. 2008)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...