Sunday, May 6, 2018

शहर

लांब हात करून
Pout काढून
चेहऱ्यावरचे स्माईल ताणून
जेव्हा त्या शहराने एक सेल्फी काढला
तेव्हा ते गाव त्याच्यावर लट्टू झालं!
कसलं cute दिसत होतं ते शहर

त्या उंच इमारती
ते चकचकीत माॅल्स
देवळांची झगमगीत रोषणाई
कॅफेज-रेस्टो-बारस् मधली चहल-पहल
काळे निगरगट्ट रस्ते
रस्त्यावर तशीच माणसे; माणसेच माणसे...
धूर ओकणाऱ्या मोटरगाड्या
हाॅर्नचा गोंगाट
सिगारेटची थोटक
पानाच्या लालभडक पिंका
दारूच्या फुटलेल्या बाटल्या
आणि दारूड्यांची फुटलेली नशीबं
उंची पोशाख; त्यातली पोकळ शरीरं
शरीरांचे बाजार; बाजाराच शरीर
नोटांची बंडलं; चिमुरड्यांचे भुकेले हात
ओला कचरा, सुका कचरा
कचराच कचरा; नुस्ता कचरा....

आणि सर्वात शेवटी दिसला
तट्ट पोट फुगलेला, फॅब इंडियाचा कुर्ता घालून
एका कलादालनाच्या मंचावर
एक मनस्वी कवी
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कविता ऐकवत होता
टाळ्या, वाहवा, मुकर्रर once more घेत
तेव्हा...

तेव्हा त्या गावाला शिसारी येऊन
ओकारी झाली,
आणि त्याच्या त्या ओकारीतून निर्माण झालं


एक नवीन सुबक शहर!!!
  • सारंग भणगे (५ मे २०१८)

Monday, March 19, 2018

करम जागृती प्रस्तुत 'बाल शोषण' ह्या विषयावरील कवी संमेलन

(हा वृत्तांत नाही, उत्स्फूर्त मनोगत आहे. पूर्ण वाचावे अशी कळकळीची विनंती)


गेल्या वर्षभरात निर्माण केलेली अत्यंत वेगळी परंपरा पुढे चालू ठेवत करम अर्थात कविता रसिक मंडळाने रविवारी 'बाल शोषण' ह्या विषयावर कविसंमेलन आयोजित केले होते. ह्यापूर्वी अगदी 'लग्न केले नसते तर' पासून 'वीरांगना' ते 'वारांगना' अशा विविध सामाजिक विषयांवर संमेलने घडवून आणल्यानंतर आता ह्या वर्षात 'जागृती' ह्या सदराखाली सुरु केलेल्या संमेलनात 'बाल शोषण' सारखा अत्यंत संवेदनशील विषय हाताळण्याची हिंमत करमने दाखवली. 

जर कवी म्हणजे संवेदनशील मन असे असेल तर समाजात घडत असलेल्या दाहक वास्तवापासून कवी आणि त्याच ते so-called संवेदनशील मन दूर राहू शकत नाही ह्या, तसेच कवितेच्या माध्यमातून ह्या ज्वलंत प्रश्नांना पुन्हा एकदा हवा देणे अशा स्वच्छ भूमिकेतून स्वखर्चाने आणि स्वकष्टाने हि संमेलने आयोजित केली जात आहेत. एरव्ही बहुतेक प्रत्येक आठवड्यालाच कुठे ना कुठे तरी कलासक्त मंडळींची काव्यसंमेलने होत आहेतच, परंतु एवढे समाजाभिमुख राहून केवळ 'आमचे कवितेवर प्रेम आहे', असा डंका न पिटता, कवितेतून समाजातील प्रश्नांचे वास्तव समाजापुढे मांडू, स्वत:च्या आतील कवितेच्या विस्तूला, केवळ काव्यात्मक नव्हे तर वास्तववादी व्यथा - वेदनांची ठिणगी पडून चेतवू, असा पवित्रा घेणारे आणि तो यशस्वी करण्यासाठी आटापिटा करणारे काव्यगट माझ्यातरी पाहण्यात नाहीत.

करमच्या कुठल्याही कार्यक्रमाचे स्वरूप हे केवळ कवितावाचन नसून, किंवा केवळ विषयाच्या अनुषंगाने कुणा पर्यंकपंडितांना पाचारण करून केवळ पुस्तकी चर्चा घडवून आणणे असेही नसून, त्या त्या प्रश्नाने पोळलेल्या; त्या चटका लावणाऱ्या विषयाच्या मातीत; नव्हे नव्हे चिखलात लोळलेल्या आणि त्या त्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम केल्याने अस्सल जिवंत अनुभव असलेल्या अ-साहित्यिक मंडळींना बोलावून त्या प्रश्नाविषयी / विषयाविषयीचे अनुभव, चिंतन, चर्चा हे आधी घडवून मग कवींना कवितेतून त्या प्रश्नाच्या अनेक नकसकंगोऱ्यांवर आपल्या शब्दांचे लेणे चढवण्याची संधी दिली जाते. म्हणजे आवर्जून नमूद करायची गोष्ट अशी कि इथे केवळ कविसंमेलन आणि केवळ साहित्यिक चर्चा नाही घडत, तर घडतो माणुसकीचा सजीव सोहळा! अगदी सामाजिक कार्यकर्त्यांपासून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांना करमच्या साहित्यिक मंचावर स्थान दिले गेले आहे, प्रसंगी प्रचंड टीका सहन करून! लिहावे तेवढे त्याचे महत्व कमी होते, आणि लेखकाचे वाढते, म्हणून आवरते घेणेच योग्य!

'बाल शोषण' ह्या सारखा अत्यंत गंभीर विषय, ज्यावर नुसत्या गप्पांमध्ये देखील बोलणे; ऐकणे हे हेलावून टाकणारे असते; 'देवाघरची फुले' म्हणून धरतीवर आलेल्या निष्पाप जीवांवर; त्यांच्या अबल असण्याचा गैरफायदा घेत किती अनंत प्रकारे त्यांचे शोषण चालते, हे किती विदारक आहे; हादरवून टाकणारे आहे ह्याचा अनुभव संमेलनात आला. सामान्य कवी आणि श्रोत्यांबरोबर करमचा सहगट 'सुवानिती' हा ज्या विविध गरजू शाळा - आश्रमांबरोबर काम करतो तेथील ८-१५ वयोगटातील मुले मुली देखील ह्या संमेलनात सामील झाली होती. अर्थातच, ह्या विषयातील मानसोपचार तज्ञ आणि कवयित्री नूतन शेटे, तसेच पोद्दार शाळेच्या प्राचार्या अनघा घोलपजी ह्या सहभागी होत्या.

नूतनजींनी चटका लावणारे बाल शोषणाचे काही प्रसंग श्रोत्यांना सांगितलेच, परंतु तिथे उपस्थित असलेल्या मुलांना आणि पालकांनाही असा स्पष्ट संदेश ठासून दिला कि 'आपले शरीर हि केवळ आणि केवळ आपली मालकी आहे', 'त्याच्या रक्षणासाठी जर कुणी अतिप्रसंग करत असेल तर जीवाच्या आकांताने ओरडले पाहिजे; प्रतिकार केला पाहिजे', 'गप्प बसता कामा नये; प्रतिकार हा आपला अधिकार आणि जबाबदारी देखील आहे' ई., तर अनघाजींनी शाळांमध्ये मुलांना कशा प्रकारे सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी तंत्रज्ञानापासून ते प्रशिक्षणापर्यंत सर्व मार्ग कसे वापरले जातात, ज्या शाळांकडे आर्थिक पाठबळ मुबलक नाही त्या शाळादेखील कशाप्रकारे मुलांच्या सुरक्षेसाठी दक्ष राहू शकतात ई. पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर प्राध्यापक सोनाग्रासरांनी थोडक्यात जे त्यांचे विचार मांडले त्यात 'अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्याची वेळ ज्या समाजात येते त्या समाजाकडून कुठलीही आशा ठेवता येणार नाही' असा चाबूक ओढला तेव्हा अक्षरश: अंगावर काटा आला.

ह्या सन्माननीय व्यक्तींबरोबर आश्रमशाळेतून आलेली एक मुलगी, तिनेही आपले मनोगत व्यक्त केले. पुढे जाऊन अशाच प्रश्नांसाठी जीवन वेचायचे आहे असा वेडा ध्यास व्यक्त करणारी ती मुलगी कदाचित सर्व कवींच्या गालावर एक चपराक ओढून गेली असावी.

ह्या विचार मंथनात मनात काय काय विचार वाहत गेले, एका विषयाला किती बाजू आहेत, किती पैलू आहेत, कंगोरे आहेत, ह्याचे जे दर्शन झाले ते गोंधळात टाकणारे होतेच, परंतु विचार करायला लावणारे होते. कवींमध्ये 'जागृती' आणतानाच समाजाला सजग करणारे होते. घरातील सर्व प्रकारच्या नातेवाईकांकडून होणारे छोट्या छोट्या मुलांचे लैंगिक शोषण हादरवणारे आहेच, परंतु खरोखर कुठलेच नाते विश्वासार्ह राहिले नाही हि दारूण खंत मनात दाटवणारे होते. हे मुळांना सांगून आपण त्यांना जागरूक आणि सावध करतो आहोत कि त्यांच्यात एक कायमस्वरूपी भयगंड निर्माण करतो आहोत अशी दुविधा मनात निर्माण करणारे होते. मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेत जागोजागी CCTV Surveillance आणि पहारा देणारे शिक्षक हवेत कि विश्वास निर्माण करणारे; प्रेमादर निर्माण करणारे शिक्षक आणि वातावरण हवे..........असे कितीतरी प्रश्न उभे राहिले, ज्यावर विचार करत राहिला पाहिजे! आणि तो ही एक उद्देश ह्या कार्यक्रमातून आहेच अर्थात.

हे लिहून मी कार्यक्रमाचा वृत्तांत लिहिण्याचा किंवा आढावा घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर ह्या संमेलनातून नक्की काय घडत ह्याची झलकमात्र दाखवण्याचा यथाशक्ती प्रयत्न तेवढा करतो आहे.

त्यानंतर कवी संमेलन तर झालेच आणि त्यात एकाहून एक कविता सादर झाल्याच, पण त्या कविता अगदी लहान मुलांना ऐकायला भाग पाडून त्यांचे तिथेच काव्य-शोषण केले गेले नाही (:) ) तर त्या मुलांना नूतनजी आणि आरती देवगावकर ह्यांनी एका वेगळ्या खोलीत छान गप्पा=गोष्टीमार्फत अधिक उपयुक्त अशी माहिती दिली, संवाद साधला; त्यांना बोलते केले! मुलांचे ते चिमुकले विश्व उलगडताना धन्यता वाटली, परंतु अशाच कुणा निष्पाप मुलांचे जेव्हा शोषण होत असेल तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल ह्या विचाराने मनात अपार खिन्नाताही दाटली!

कवितांविषयी अधिक लिहित नाही, तो माझ्या ह्या उत्स्फूर्त लेखनाचा विषयही नाही. पण त्या कविता देखील खूप काही बोलून गेल्या हे सांगणे न लगे!

ह्या अशा कार्यक्रमांना उचलून धरणे, ह्या एका किमान जबाबदारीची जाणीव माझ्या ह्या तोडक्या-मोडक्या शब्दातून काही जणांना तरी होईल एवढी अशा; इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून थांबतो!

कुणाचेही वैयक्तिक आभार मी इथे व्यक्त करत नाही, परंतु ह्या कार्यक्रमांना यश यावे; त्यांचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे ह्यासाठी त्यांच्या हातांना बळ द्या असे आवाहन जरूर व्यक्त करेन!

--
सारंग भणगे (१९ मार्च २०१८)

Monday, March 12, 2018

एकाकी पिंपळावरचे



एकाकी पिंपळावरचे
आयुष्य जाहले मुंजा
आनंद फुलोरा झडला
मागे दु:खाच्या गुंजा

निर्वृक्ष अरण्यामध्ये
आकांत मुक्या जखमांचा
निर्हेतुक पण चुरगळला
पाचोळा आनंदाचा

निष्पर्ण मनाने जेव्हा
स्वप्नात पाहिले पाणी
आनंदघनाला फुटली
दु:खाची केविलवाणी

सोशिक मुळांना वाटे
आता न जरा थांबावे
मातीत स्मृतींच्या आता
हळुवारपणे पांगावे
==============
सारंग (८ मार्च २०१८)

Wednesday, February 28, 2018

मकस अजिंक्यतारा मेळावा


२००९ सालापासून मकसचे झालेले पुष्कळ मेळावे म्हणजे आम्हा संचालकांसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो, आणि म्हणूनच मेळाव्याची तारीख जवळ येत जाते तशी उत्सुकता वाढत जाते, तसाच उत्साहही! दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी किमान २-३ मेळावे तर सहजच होऊन जात असत. परंतु, ह्यावेळी जवळपास दोन-अडीच वर्षांच्या खंडानंतर मेळावा आयोजित होत होता.

२५ फेब्रुवारी २०१८, रविवारचा दिवस; ठिकाण कास पठार, सातारा! प्रथमच एवढ्या खंडानंतर होणारा मेळावा; तो ही साताऱ्यासारख्या शहरात जिथे अजून मकसचा एकही कार्यक्रम झालेला नाही, आणि त्याहून म्हणजे तो प्रत्यक्ष शहरात नाही तर कुठे तरी डोंगर-झाडांनी वेढलेल्या परिसरात, आणि आयोजन पाहणारा संचालक देखील नवीन, अननुभवी. सगळंच नवीन आणि वेगळ. अर्थातच मनात एक धागधुग होती कि मेळाव्याला किती कवी हजार राहतील, कार्यक्रम कसा होईल, काही अडचणी येतील का ई. ई.

पण २५ फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येलाच सुमारे २० लोकांनी मेळाव्याच्या ठिकाणी हजेरी लावली, आणि ह्या सर्व शंका दूर झाल्या. तरीही मेळाव्याच्या मुख्य दिवशी फारतर ५-७ मंडळी अजून येतील अशी अपेक्षा असताना, जेव्हा एकूण संख्या ३७ एवढी उत्साहवर्धक झाली तेव्हा झालेला मनस्वी आनंद एक आयोजकच समजू शकेल. विषयाच्या अनुषंगाने म्हणून इथेच नमूद करू इच्छितो कि जरी आयोजकांनी कितीही सद्भावनेने आणि प्रेमाने एखादा कार्यक्रम आयोजित केला असला तरीही कवींचा सहभाग हा तो कार्यक्रम यशस्वी होण्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो, हे मान्य केलेच पाहिजे. त्या अर्थाने मकस संचालक मंडळ सहभागी कवींचे खरोखर आभारी आहे!

२४ फेब्रुवारीची पूर्वसंध्या अत्यंत रम्य गेली हे सांगणेच नको! पुष्कळ कालावधीनंतर झालेली परिचित-अपरीचीतांची सहृदय भेट; गप्पांना आलेला उत; अपरिचित देखील काही क्षणातच आपलेसे वाटू लागण्याचा आलेला आनंददायी अनुभव; निवासाचे अत्यंत रम्य असे ठिकाण; जिभेवर कायम चव रेंगाळत रहावी असे चविष्ट जेवण; आनंदने (पेंढारकर) इतक्या लांबून आणलेल्या म्युझिक सिस्टमने वर गायलेल्या सुरेल गीतांनी सुरू झालेली रात्र मैफल; रात्रीबरोबरच चढत गेलेली कवितांची धुंदी; साडेतीन वाजता झोपूनही पहाटे ७ ला उठताना जाणवलेला आल्हाद; सकाळच्या गप्पा, फोटो सेशन आणि मग आवरत आवरत मेळाव्याच्या स्थानाकडे केलेले कूच हे सगळे लिहिण्यासाठी एक स्वतंत्र वृत्तांत लिहिला पाहिजे, पण मुख्य वृत्तांत मेळाव्याचा, म्हणून हा खूप काळ स्मरणात राहील अशा रात्रीचा संक्षिप्त आढावा!

साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर डॉ. संदीप श्रोत्री ह्यांचे फार्म हाउस आपल्या मेळाव्याचे सुनिश्चित केलेले ठिकाण होते. कास पठार ही आता World Natural Heritage site असल्याने खूपच नावाजली आहे. जरी आत्ता कारवीच्या फुलांचा मौसम नसला तरीही एकूणच संपूर्ण कास पठार परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. एका छोट्या दरीच्या काठी बांधलेली नीटस अशी ती बंगली हे एखाद्या कवी संमेलनासाठी सुयोग्य असेच ठिकाण आहे. आजूबाजूला झाडे-झुडपे; जवळच दरी; चहुबाजूला डोंगर-टेकड्यांनी वेढलेले, असे कुठल्याही कलावंताच्या कलेला स्फूर्ती किंवा चालना देणारे असे सुरेख चित्रमय वातावरण, आणि त्यामध्ये उभी असलेली ती प्रसन्न वास्तु. अंगण ओलांडून गेले कि असलेल्या पोर्चमध्ये बसायची व्यवस्था, समोर २-३ पायऱ्या चढून गेले कि जुन्या पद्धतीचा दरवाजा, त्यातून आत गेल्यावर एक गोलाकार दिवाणखाना; त्याचे उंच सिलिंग आणि सिलिंगच्या मधोमध प्रकाश येण्यासाठी ठेवलेला मोठ्ठा गोल झरोका; दिवाणखाण्याच्या दरीकडील बाजूला दोन पायऱ्या खाली उतरून बसायची अर्धवर्तुळाकार जागा आणि तिथे असलेल्या ३ मोठाल्या खिडक्या, असा एकूण दिमाखदार डामडौल, आणि अशा त्या दिवाणखान्यात भरणारा आपला मेळावा!

नावनोंदणी बरोबर चहा-नाश्ता ह्यांचा आस्वाद घेतल्यानंतर बरोब्बर १०.३० वाजता मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. विनायकने माईकचा ताबा घेऊन सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि गणेशपूजन समूहातील ज्येष्ठांच्या हस्ते झाले. त्यानंतर विनायकने मेळाव्याची रूपरेषा थोडक्यात सांगून पुढील सूत्रे राजेशकडे सुपूर्त केली.

पहिला कार्यक्रम हा मंचीय काव्यसदरीकरणाचा होता. राजेशने सूत्रसंचालन केलेल्या ह्या बहारदार कार्यक्रमात सहभागी झालेले कवी होते – तुषार जोशी, पूजा भडांगे, मिता लोणकर; मिनिष उमराणी; आणि प्रीतम गाडगीळ. प्रत्येकी दोन कविता एकापाठोपाठ सर्व सहभागी कवींनी सादर केल्या. तुषार संचालक असूनही इतके वर्षात प्रथमच मेळाव्यातील मंचीय कार्यक्रमात दिसला, तर प्रीतम; मिता ह्या प्रथमच कुठल्याही काव्यमंचावरून कविता सादर करत होत्या. सकाळच्या उत्साही वातावरणात कवितांचे तुषार अंगावर पडू लागले ते तुषारच्याच ‘ओठांवर तीळ कसला’ ह्या तरल प्रेमाकाव्यातून, कि जे त्याने त्याच्या खास तुष्की शैलीत गाऊन सादर केले. श्रोत्यांची मने त्यावर डोलू लागली, कि पाठोपाठ ‘काळोखाचे अस्तर लावून रात्र विणूया आपण’ किंवा ‘शिकून घेऊ सूर्यफुलांची अल्लड भाषा’ अशा प्रासादिक काव्यमय निसर्गवर्णनाने भरलेल्या पूजाच्या कवितेने सभागृह भारावून गेले. तिच्या जवळपास प्रत्येक ओळीला वाह मिळत गेली. त्यानंतर मिताच्या ‘सावळ्या मेघातळी मी पेरलेले बीज आहे’ किंवा ‘कोरड्या रेतीत अश्रू गाळणे हे ठीक नाही’ अशा ओळी रसिकांची दाद घेतानाच त्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेल्या. ‘सहजच फांदीवर बसले काही तसे शब्द सुचले’ किंवा ‘वाट हरवले कुणी तान्हुले, तसे शब्द कवितेस बिलगले’ अशा हळव्या ओळीतील ओल मनामनांना स्पर्शून गेल्या, तर प्रितमच्या ‘इरकली कंचुकी बघ दंडात रुतते बघ तुझ्याचसाठी’ सारख्या ओळी रसिकांना रिझवून गेल्या.

ह्याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागातही ‘तुझ्या स्मृतींचा सुगंध उत्कट प्रजाक्ताहून दाट (तुषार); ‘बाभळीचा जन्म तुझी बोचरी कहाणी, तरी कशी गाते बाई आनंदाची गाणी’ (पूजा); ‘ही मिठी कशी अलवार अंगात वीज झंकारते’ (मिता); ‘देहभर फुललेले वारूळ मन सैरभैर’ (मिनिष); प्रितमची ‘विद्रोह’ कविता, अशा सुगंधी, उत्कट, घनदाट, तरल, हळव्या, रोमांचक, शृंगारिक, गहिऱ्या कविता आणि काव्यपंक्तींनी रसिक न्हाऊन निघाले.

ह्या सर्व कवी मंडळींच्या कविता जितक्या बहारदार होत्या तितकेच उत्कृष्ट सहज आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालन राजेशने केले. दोन कवितातील दुवा जोडत, त्या कवितातील रस हलकेच वेचत, कुठे हसवत; कुठे मनाला स्पर्श करत संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र त्याने सक्षमपणे सांभाळली.

मेळाव्यातील एवढा एकच मंचीय कार्यक्रम सुफळ संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवर कवींनी आपापली एक काव्यरचना पुढे येऊन सादर करण्याचा मेळाव्याचा मुख्य भाग सुरू झाला. ह्या कार्यक्रमात सादर झालेली प्रत्येक कविता म्हणजे वेगवेगळ्या रंगांचा गडद असा पोत घेऊन आलेली होती, आणि प्रत्येक कवी एखाद्या ब्रशसारखा रसिकांच्या मनाच्या कॅनव्हासवर त्या त्या रंगाचा स्ट्रोक काढत गेला आणि शेवटी जे चित्र निर्माण झाले त्यात सर्व रंग; सर्व आकार उमटले होते. ‘अजून थोडे चालीन म्हणतो, आभाळाला गाठीन म्हणतो’ (मनोहर जाधव), ‘आकाशातील ताऱ्यालाही माझ्यासाठी निखळ म्हणालो’ (हेमंत राजाराम), ‘झालेत सरळ रस्ते माणूस नागमोडी’ (जयंत कुलकर्णी), ‘मजबूत हातांनी आणि छत्रीने बाबा आभाळ तोलून धरायचे....घरचे आणि बाहेरचेही’ (विलास अधिकारी), ‘अजूनही त्या फुलांना बरी किंमत येते’ (डी एस कुलकर्णी), ‘हसतानाही जगण्यावर मी जरा रडलो होतो’ (विशाल कुलकर्णी), ‘एक गोळी झाडावी जुन्या साऱ्या आपल्या कवितांवर’ (विनायक उजळंबे), ‘दु:ख हलके होत असते बोलण्याने’ (शिवाजी सावंत), ‘मनाला निळे पंख लावून गेले’ (रश्मी मार्डी)....अशा कितीतरी ओळींच्या लाटा मनाच्या किनाऱ्याला धडका देत ओलावत राहिल्या. ‘जगा’ (देवकुळे सर), ‘प्रेमाचा वर्षाव कधीच नव्हता’ (जान्हवी शिराळकर), ‘कवितेविरुद्ध फिर्याद’ (शैलजा किंकर), ‘खळी विरुद्ध पाकळी’ (उमेश वैद्य), ‘रुपगर्विता’ (आकाश बिरारी), मेघना राजे ह्यांची कविता, ‘मंथन केले आयुष्याचे’ (जयप्रकाश खळदकर), ‘संध्येच्या पारावरती’ (कामिनी केंभावी), ‘बेण हरवलं आहे’ (मयूर ढोबळे), ‘मेघ सरले’ (स्वप्ना अमृतकर), आनंद पेंढारकरांची हिंदी-मराठी मिश्र गझल, ‘मी राधा आहे’ (संतोष वाटपाडे), ‘राधेस लागली आज’ (विभावरी बिडवे), ‘मनाचे घनदाट जंगल’ (दीपा वाकडे), ‘सोनपरी’ (मानसी चिटणीस), ‘आली कशी कळेना गोत्यात जिंदगी’ (वसंत शिंदे), ‘लग्न झालेले बॅचलर’ (विनायक अनिखिंडी), ‘मन कावरे बावरे’ (अमर शिंदे), ‘आकाश निळे’ (राजेश गुरव), ‘कवी व्हावं वाटलंय का’ (सारंग भणगे) अशा कवितांच्या गलबतांनी मनाच्या बंदरात लंगर कधी टाकले ते कळलेच नाही. प्रत्येक कवितेत पुष्कळ काही सांगण्यासारखे होते कि जसे खाली वि पाकळीची अभिनव कल्पकता, रुपगर्विताची पार्श्वभूमी, संध्येच्या पारावरतीची गहनता, बेण हरवलं आहे मधील सोप्या भाषेतून आजच्या मुलांविषयी व्यक्त झालेली तळमळ, आनंद आणि अमरच्या गायलेल्या कवितांवर धरलेला ताल, वसंत शिंदेंचे जोरकस सादरीकरण, लग्न झालेले बॅचलर मधला नर्मविनोद ई.

पोटभर कविता ऐकून, पोटभर दाद देऊन मग पोट भरायची वेळ झाली आहे ह्याचे भान पोटातल्या कावळ्यांनी साद घातल्यावर सर्वांना झाले. जवळपास दोन वाजत आले होते आणि बाहेर जेवणाची तयारी झालेली होती. बगिच्यामध्ये एका उंचवट्यावर टेबल मांडून त्यावर सुग्रास जेवण सर्वांची वाट पहात होते. सातारी पाहुणचारात चमचमीत रस्सा आणि म्हाद्या हे दोन चविष्ट पदार्थ जेवणाच्या पंगतीची रंगत वाढवून गेले.

जेवणानंतर पुन्हा आपल्या सभागृहात घेऊन जाण्यासाठी संचालकांची जरा घाईच चाललेली. कारण त्यांच्यासाठी पुढच्या सत्रातला पहिला कार्यक्रम हा विशेष महत्वाचा होता. क्षुधाशांती झालेली मंडळी शांतपणे स्थानापन्न झाल्यावर विनायकने माईक सारंगच्या हातात सुपूर्त केला. पुढचा कार्यक्रम आधी जाहीर केलेल्या रुपरेषेप्रमाणे सन्मानसोहळ्याचा होता, पण कसला सन्मान; कुणाचा सन्मान; कशाबद्दल ई. माहिती अर्थातच गुलदस्त्यात होती.

सारंगने सर्वप्रथम मकस ही जरी इतर अनेक काव्यमंडळांप्रमाणे कार्यरत असली तरीही मकसचे काही वेगळेपण मांडले. मकस हा कवींमधील सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध असलेला समूह आहे, आणि पारंपारिक संमेलने, सत्कार, पारितोषिक ह्यांना छेद देत आजवर काम करत आलेला समूह आहे, असे सांगितले. त्यानंतर आज मकसच्या त्या परंपरेच्या विरुद्ध मकस एक आत्मियता किंवा कृतज्ञता भेट एका व्यक्तीला देणार आहे असे नमूद करून श्रेष्ठ कवी आणि गझलकार श्री. जयंत कुलकर्णी (अर्थात जयंतकाका) ह्यांचे नाव जाहीर करताच इतर श्रोत्यांबरोबरच त्यांच्या स्वत:च्या चेहऱ्यावर एक हर्षमिश्रित आश्चर्य उमटले.

त्यापाठोपाठ जयंतकाकांना मंचावर बोलावून सारंगने मकस आणि जयंतकाका ह्यांच्यातील ऋणानुबंध विशद केला आणि ह्या आत्मियता भेटीची भूमिका देखील स्पष्ट केली. त्यानंतर विभावरीच्या हस्ते जयंतकाकांना पुष्पगुच्छ, शिवाजींच्या हस्ते स्मृतीचिन्ह (ज्यावर जयंतकाका ह्यांची आवडती गझल आणि त्यांचं प्रसन्न चेहरा छापलेला आहे), राजेशच्या हस्ते पुणेरी पगडी आणि तुषारच्या हस्ते शाल प्रदान करून यथाचित सन्मान केला. तसेच जयंतकाकांविषयी काही आठवणी आनंद आणि हेमंतजी ह्यांनी सांगितल्या, आणि जयंतकाकांनी भारावल्या शब्दात त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्व प्रेक्षक देखील ह्या हृद्य सोहळ्याने भारावले असावेत निश्चित, हे त्यांनी केलेल्या टाळ्या आणि कौतुकोद्गारातून स्पष्ट जाणवले. पगडी घातलेली, शाल पांघरलेली, हातात स्मृतीचिन्ह धरलेली जयंतकाकांची (आनंदच्या शब्दात) ‘जिंदादिल’ मूर्ती कृतार्थ वाटत होती. ती मूर्ती खरोखर मनात ठसली आणि मनातून अनेकांच्या camera मध्येही जाऊन बसली!

जयंतकाकांप्रमाणेच श्रीधरकाकांचाही असाच आत्मियता भेट देण्याचा निर्णय सारंगने संचालक मंडळातर्फे जाहीर केला.

त्यानंतरचा कार्यक्रम पुन्हा एकदा काव्यमैफलीचा होता. पहिल्या सत्राप्रमाणेच सर्व कवींनी (संचालक सोडून) एकामागून एक कविता सादर केल्या. पुन्हा एकदा कवितांच्या फैरी झडल्या आणि त्यांचं आनंद सर्वांनी खूप मनापासून लुटला.

प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. कवितांची अशी मेजवानी झोडल्यानंतर पोट जरी भरले नसले तरीही काळाचा वेग आपल्या हाती नसतो. घड्याळाचे काटे फिरत राहिले आणि मैफल शेवटास आली. आभार प्रदर्शनाचा औपचारिक भाग अनौपचारिक रित्या संपवून मेळावा संपुष्टात आला. निरोपाच्या गाठी भेटीत मंडळी गुंतली. निरोप घेतले ते पुन्हा भेटण्याच्या वायद्यानेच!

मकस अजिंक्यतारा मेळावा संपन्न झाला तो सर्वांच्या सहभागाने. राजेशचे उत्कृष्ट नियोजन आणि त्याला मिनिषने दिलेली साथ, आनंदने आणलेले म्युझिक सिस्टम, संतोष वाटपाडेसारखा गाजत असलेल्या कवीचा सहभाग, पूजा आणि रश्मी ह्या नव्या पिढीतील दमदार कवयित्रींच्या प्रगल्भ कविता, विशाल, मनोहर, देवकुळे सर, हेमंतजी, कामिनीजी ई. सर्वांचा उत्साही सहभाग, वसंतजी, मयूर, स्वप्ना  ह्यांच्या दमदार कविता, मिता, प्रितम, दीपा, अमर ह्यांची पदार्पणातीलच उत्तम काव्यपेशकश, विशालजी, जान्हवीजी ह्यांच्या मनस्वी कविता, विनायक अनिखिंडी, मानसीजी, शैलजाजी ह्यांच्या वेगळ्या शैलीच्या कविता ह्या साऱ्या गोष्टींचा उल्लेख पुन्हा एकदा करणे क्रमप्राप्त आहे.

इथे भेटलात..........पुन्हा पुन्हा भेटत रहा, असे म्हणून थांबतो!

ता.क. कुणाचे नाव चुकीचे लिहिले गेले असेल, कविता किंवा कवितेच्या ओळी चुकीच्या लिहिल्या गेल्या असतील, कुणाचा उल्लेख राहिला असेल तर ह्या अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल माफ करा

आपला,
सारंग भणगे

मकस संचालक

Thursday, January 18, 2018

"वसुधैव कुटुंबकम"

हमादच्या सीरियान वाळवंटातली वाळू
आता भिजू लागली आहे,
लाल भडक रंगाचे पाणी पुरवल जातंय
रियाधहून; तेहरानहून; दोहाहून; 
अंकारा; बगदाद; काबुल आणि अगदी वाॅशिन्गटनहून सुद्धा

आणि ह्या तांबड्या सिंचनातून
तिथे उगवली आहेत 
आलेप्पोच्या संस्कृतीला हडप करणारी
लसलसत्या जिव्हांची वारेमाप रोप

अदेनच्या आखातात धुमसत आहेत
रक्त-मांस गिळंकृत करायला अधीर असलेले कैक भस्मासुर
पेटलेले बगदाद, मोसूल; श्रीनगर आणि राखाईन 
राख राख होण्यासाठीच जणू आ वासून बसलेले;

आणि सोमालिया आणि वेनेझुएलाचे भूकबळी 
मृत्युच्या जातक भुकेचे बळी होण्यासाठी आसुसलेले....

गोलन टेकड्यांवर विखुरले आहे 
आभाळाने दिलेला हिरवा रंग पुसून
मानवाने दिलेल्या अमानवी लाल भडक रंगाचे कुरण

सोल आणि टोक्यो धरून बसलेत जीव मुठीत
प्योंगयांगने त्यांच्यावर नेम धरून
धनुष्यावर चढवलेला आण्विक तीर 
कधी सुटेल ह्याचा नेम नाही, ह्या भीतीने

चंगेझ; तैमुर; तुघलक; खिल्जी पासून 
हिटलर; स्टालिन; माओ; गद्दाफी; इदी अमीन 
ओसामा; बघदादी आणि अल असद पर्यंत
पृथ्वीच्या पाठीवर उमललेल्या संस्कृतींना
मृत्युच्या कराल दाढात ढकलणाऱ्या
विकृतींवर मात करत,

हिमाचलच्या उत्तुंग कड्यावर
एक निर्वस्त्र योगी ध्यानमग्न अवस्थेत
उच्चारण करत बसला आहे;
"वसुधैव कुटुंबकम"  
"वसुधैव कुटुंबकम"
=====================
सारंग भणगे (७ जानेवारी २०१८)

मन बैरागी

कुटुंब कबिला नको काफिला मस्त जगावे आनंदाने
गगनाखाली जगणाऱ्यांवर प्रेम करावे प्राणपणाने

मन बैरागी माझा कोणी ना नात्याचा ना गोत्याचा
मायबाप त्या फांद्या बुंधा जिथे झोपलो त्या झाडाचा

कुटुंब होऊन जाते माझे पळभर घेतो आश्रय ज्यांचा
मी तर आहे ह्या प्राण्यांचा त्या पक्ष्यांचा फुलाफळांचा तृणपात्यांचा

ओढा व्हावे आयुष्याने ओढ नसावी वहात रहावे
तुडुंब पाणी पितात त्यांचे नकळत आपण कुटुंब व्हावे

अंतर जरीही कितीही असले तरी नसावे मनात अंतर
दिगंतराचा होऊन जा तू ह्या विश्वावर माया अंथर
================================

सारंग भणगे (१८ जानेवारी २०१८)

Wednesday, January 3, 2018

सचिन - एक आठ'वण'

काही काही आठवणी असतात त्या वणासारख्या, जखमा भरून आल्या तरीही कायम मागे उरतात, कधीही न मिटण्यासाठी!

Star Trek ही TV Serial दूरदर्शन हे एकमेव TV Channel असण्याच्या जमान्यातले दिवस. Star Trek संपले कि मी, सचिन, राहुल आणि आशु Start Trek-Star Trek खेळायचो. कुणीतरी Captain, कुणीतरी Spoke कि कोण तो लांबकान्या असे एकेक character व्हायचो, आणि आमच्या लहानग्यांच्या मनातून काहीतरी stories निर्माण व्हायच्या, जो आमचा खेळ व्हायच्या.

खेळता खेळता खोट्या खोट्या बंदुकींनी मारामारीही व्हायची, मग त्यात कुणी मारायचं, कधी मी; कधी राहुल; कधी आशु आणि कधी सचिन. सगळे त्या खेळात मेल्यानंतर कुठेतरी जाऊन कोसळायचे, म्हणजे खरोखर मेल्यानंतर माणसाचे शरीर जसे कोसळते तसे. पण सचिन........तो उभ्या उभ्याच मारायचा, म्हणजे मेल्यानंतरही तो उभाच असायचा. आम्ही फार हसायचो त्याच्या ह्या मारण्यावर.

तेव्हा कल्पना नव्हती कि तो असाच एक दिवस उभ्याउभ्याच निघून जाणार आहे....फक्त त्यावेळी आम्ही हसत नाही तर ओक्साबोक्शी रडत असणार आहोत!

-------------------------------------------

सचिन लहानपणापासूनच तब्येतीने जाड असल्याने त्याला आम्ही अर्थात जाड्या म्हणायचो. त्याच्या चेहऱ्यावर ह्याचा कधी राग पाहिल्याच आता तरी आठवत नाही. जाडी लोक सहसा दिलखुलास हसतमुख असतात, असा माझातरी अनुभव होता. सच्या, निदान लहानपणी तरी, तसा हसतमुख नक्कीच होता. जितकं त्याच खेळातलं ते मरणं विचित्र, तितकंच त्याच हसणं सुद्धा. हसताना तो पायरी पायरी वर चढत गेल्यासारखा हसायचा. त्या हसण्याने सुद्धा आम्हाला हसू यायचे.

पण जसा जसा तो मोठा होत गेला, तसं त्याचं हसू विरत गेलं, विरळ होत गेलं. काय कारण होत? मला ते निश्चितच माहित होत, कळत होत, पण निरुपाय होतो सगळेच. परिस्थिती आणि वास्तव हे असे दोन अहि महि असतात कि त्यांवर मात करण हे भल्याभल्यांना शक्य होत नाही. घरातील आर्थिक परिस्थिती आणि त्यात राहुलचे बेलगाम वागणे, ह्यातून लहान असून सचिन राहुलपेक्षा अधिक समज असलेला झाला, कदाचित आता वाटते कि त्याच्या वयापेक्षा थोडा आधीच! 

त्याच्याभोवतीचा परिस्थितीचा काळोख जसजसा अधिक गडद होत होता, तसा सचिन मात्र अधिक उजळत होता. मला आठवतय कि लहानपणी त्याला कसलातरी मेंदूचा आजार झाला होता. त्यामुळे सुरुवातीला तो अभ्यासात जरा संथ होता. राहुल एकदम हुशार पहिल्यापासूनच. पण सचिननेही पुढे पुढे गती पकडली. त्याला असलेल्या परिस्थितीच्या जाणीवेमुळे त्याने निसर्गदत्त बुद्धिमत्तेला कष्टांची जोड दिली आणि सहजगत्या तो ICWA with rank झाला.

पाठोपाठ त्याने CA करायला घेतले, आणि आम्हाला सगळ्यांना खात्री होती कि सच्या सहजच CA होऊन जाईल. अपेक्षेप्रमाणे CA Inter सचिन अगदी हसत खेळत झाला. राहुल देखील तोपर्यंत CA Inter झालेला होता. दोघा भावांनी मिळून 'अथर्व कन्सल्टंट' अशी Accounting firm सुरू केली. सुगीचे दिवस जवळ आले होते!

--------------------------------------------

राहुल आणि सचिन दोघेही जसे बुद्धीने हुशार तसेच बोलायला कमाल. लोकांशी दोघेही इतके मिळून मिसळून वागत, आणि बोलता बोलता लोकांची खेचण्यात तर पटाईत. त्यामुळे दोघांचे प्रचंड मित्र; ओळखीचे आणि भरपूर नातेवाईकसुद्धा. त्यामुळे घरी आणि बाहेर दोघांबरोबर सतत राबता. बर मित्र परिवार म्हणजे असे नाही कि हा राहुलचा मित्र; तो सचिनचा मित्र. सगळे मित्र दोघांचेही तितकेच चांगले. सगळ्या मित्रांचे अगदी घरोब्याचे संबंध. हे सांगताना अजिबात अतिशयोक्तीने लिहित नाहीये!

खिशात तर पैसे नव्हते; पण तरीही ते घर घेणे महत्वाचे होते. अर्थात, पैसे नसताना घर विकत घेण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे गृहकर्ज. पण गृहकर्ज ही काय भानगड असते हे कुणाला माहित होते! असल्या कामात सच्या कामाला यायचा.

आधीच ठरल्याप्रमाणे दोन तीन बँकांना visit मारायचे ठरले होते. काय कागदपत्र लागतात, Bank Manager ला आमची कर्ज परत करायची credibility आहे हे कसे पटवायचे (सुदैवाने तेव्हा Manager ला पुष्कळशा discretionary powers असत), हे सगळे कुणाला माहित, तर सच्याला. मग आम्ही दोघे अक्खा दिवसभर इथून तिथे, तिथून इथे असे फिरलो गृहकर्जाचे काम करण्यासाठी. सच्याबरोबर अख्खा दिवस घालवला, गप्पा; गोष्टी; चहा आणि काम सगळंच!

सचिन माझे tax return चे देखील काम पाहायचा. २-३ वर्ष झाले माझे tax return तयार करून file करणे सचिनच करायचा. मैत्री इतकी जवळची होती, आणि माझ्याही खिशात इतके कमी पैसे असायचे कि सच्याला कधी त्याच्या कामाचे पैसे विचारले देखील नाहीत. पण मनात ठरवले होते कि पुढच्या tax return च्या वेळी सच्याला २ शर्ट घेऊन द्यायचे.

सच्याची CA Final ची परीक्षा १-२ दिवसापूर्वीच संपली होती. घरात अजून तशी पैशाची तंगी होतीच. अथर्व कन्सल्टंटचा जम अजून काही बसलेला नव्हता. त्यामुळे सच्याने CA चा निकल लागेपर्यंत कुठेतरी नोकरी करायचे ठरवले.

सच्या तसा खरेतर आशुचा; म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा जिगरी; आणि राहुल माझा जिगरी. पण सच्याबरोबर माझे पण मस्त जमायचे.

आशुदेखील त्याचदरम्यान नोकरी शोधू लागला होता. दोघांनी मिळून दोन दिवस पेपरमध्ये असल्या-नसल्या सगळ्या नोकऱ्यांच्या जाहिराती वाचून-वेचून त्या त्या ऑफिसेसला visit मारायचा plan बनवला होता. दोघे दोन दिवस नुसते फिरत होते. म्हणजे आदल्या दिवशी सच्या पूर्ण दिवस माझ्या बरोबर होता; आणि नंतरचे दोन दिवस आशुबरोबर भिरभिरत राहिला. 

तर असे दोन दिवस फिरल्यावर आशु आणि सचिन दौलत ढाब्याला जेवायला गेले होते. रविवार, २५ मे २००१ चा तो दिवस. त्या रात्री मी जवळपास १.३० वाजता घरी आलो. एका मित्राची engagement मोडली, त्यामुळे तो जाम frustrated होता. त्याच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत सातारा रोडवरील Lotus Court च्या पायऱ्यांवर त्याला समजावत, थोपटत, धीर देत बसलो होतो. आशु साधारण तेव्हाच जेऊन घरी आला होता.

रात्र खूप झाल्यामुळे आम्ही सारे अर्थातच झोपी गेलो. सव्वा दोनचा सुमार असेल, घरचा फोन खणखणला. कुणी घेतला आठवत नाही, पण फोन राहुलचा होता. सच्याच्या पोटात खूप दुखतंय म्हणून माझ्या मोठ्या भावाला फोन केलेला. तो डॉक्टर आहे. मोठा भाऊ (आनंद) सचिनशी फोनवर बोलला, सचिन फोनवर बोलत होता म्हणून त्याने काही औषधे राहुलला लगेच आणायला सांगितली. Indigestion किंवा तसेच काहीसे असावे असे त्याला वाटले कारण सचिन फोनवर बोलत होता.

आम्ही पुन्हा झोपलो. ३.३० च्या दरम्यान पुन्हा फोन खणखणला. राहुलने फोनवर सांगितले कि सचिनचे पोट फारच दुखत आहे आणि त्याला प्रचंड उलटी देखील झाली. तेव्हा त्याने त्यांचे family physician ह्यांच्या सल्ल्याने जोशी हॉस्पिटलला admit करायचा निर्णय घेतला होता. अर्थात आम्ही सगळे जागे झालो होतो. मी आशु आणि आनंदला म्हणालो कि तुम्ही दोघे जा, मी खूप उशिरा आल्याने दमलो आहे. मी सकाळी येतो हॉस्पिटलला. म्हणून आशु आणि आनंद तडक जोशी हॉस्पिटलला गेले........

पहाटे ५.१५ वाजता घरचा फोन खणखणला.......ह्यावेळी फोनवर आनंद होता. फोन उचलताच तो म्हणाला 'सचिन गेला........' कानावर विश्वास बसत नव्हता.......नक्की काय मनात येऊन गेले सांगता येणार नाही. आई शेजारीच उभी होती. मी तिला हे सांगताच ती इतक्या जोरात ओरडून रडायला लागली कि मी पार गोंधळून गेलो. तो आवाज ऐकून वहिनी बाहेर आली आणि तिने आईचा ताबा घेतला. त्यामुळे मला तातडीने तिथून निघता आले.

मी लगोलग स्कूटरवर टांग मारून बिबवेवाडीतून जोशी हॉस्पिटलकडे निघालो. वाटेत मित्रमंडळपाशी केऱ्या (आशु आणि सचिनचा मित्र) गाडीवर जाताना दिसला. त्याने मला पाहिले आणि गाडी तशीच टाकून 'सारंग.....' असे जोरात ओरडत माझ्या जवळ आला. मला स्कूटर सांभाळत त्याला सांभाळणे अतिशय जड गेले. कसे बसे त्याला सावरून, त्याची गाडी उचलून आम्ही जोशी हॉस्पिटलकडे निघालो.

जोशी हॉस्पिटलला पोचलो तोवर सचिनला घरी सुद्धा नेले होते. लगेच आम्ही घरी गेलो.

सचिनच्या घराच्या बिल्डींगखाली गर्दी जमली होती. सचिनचे मित्र; राहुलचे मित्र; बिल्डींग आणि परिसरातला मित्र परिवार; नातेवाईक असे सगळेच अगदीच थोड्या अवधीत जमले होते. मी घराशी त्यावेळी खूप जवळचा. मी थेट वर घरात गेलो. सचिनला जमिनीवर ठेवले होते. जो तो आक्रंदत होता. राहुल सचिनच्या शेजारी बसून त्याला गालावर मारत म्हणत होता 'ए उठ रे सच्या' उठ चल सगळे जमलेत.....'. काकूंची अवस्था बघवत नव्हती. मी थेट काकूंच्या जवळ जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आशुदेखील उभा होता आणि फारच खचलेला होता. त्याच्या मनावर स्वाभाविकच प्रचंड परिणाम झाला होता. एकूणच सगळे हवालदिल होते. 

का कुणास ठाऊक मला अजिबात रडू येत नव्हते. मी शक्य त्यांना धीर देत होतो.

काही वेळाने ambulance आली. सचिनला ambulance मध्ये ठेवले. आणखी कुणाबरोबर तरी मी ambulance मध्ये शिरलो. अजूनही मला रडू येत नव्हत! फक्त मी थोडा गलबलून म्हणालो कि ह्यावेळी शर्ट घेऊन देणार होतो. पण ............

वैकुंठात सचिनला पोहोचवले ते तो पुन्हा न परतण्यासाठी.....

------------------------------------------------------

आलेला माणूस जातोच कधी ना कधी, पण डाव रंगात आलेला असतानाच अर्ध्या ताटातून, कुणाच्या कल्पनेतील स्वप्नातसुद्धा असा विचार चुकूनही आलेला नसताना अचानक त्याला निर्दया काळाने कुणाच्या नकळत उचलून नेले. त्याच्या जाण्याच्या त्या आठवणींना आता ह्या शब्दांनी सजवून अप्रामाणिकपणा सुद्धा करावा वाटत नाही आता. पण देवसुद्धा अमानुष असतो ह्याचा प्रत्यय आला.

सारंग भणगे

गजबजलेल्या आठवणी - "२६ जुलै २००५"

"२६ जुलै २००५"
(Reposting)

२६ जुलै २००५ हा दिवस बहुतेक सर्वांना सहज आठवत असेल. होय तोच दिवस जेव्हा मुंबईला जलौघाने करकचून मिठी घातली.

कर्मधर्मसंयोगाने त्याच दिवशी माझे मुंबईमध्ये काही काम निघाले होते. पहाटेची Volvo घेऊन मी पुण्यावरून दादरला पोहोचलो, आणि तिथून taxi ने होर्निमन सर्कलला. सकाळी वातावरण ढगाळ होते, परंतु कुठे अतिवृष्टी वगैरे होईल असे वाटत नव्हते. तसेही मुंबईला पावसाळ्यात २-३ वेळा तरी झोडपले जातेच, त्यामुळे जोरदार पाऊस मुंबईत होणे हे पुणेकरांना सुद्धा नवीन नाही. आपल्या सक्षम वेधशाळेनेदेखील स्वत:च्या प्रतिष्ठेला जागत अतिवृष्टी किंवा ढगफुटी अशी कुठलीही भानगड मुंबईत होईल असे वर्तवले नव्हते.

सकाळपासून दुपारी सुमारे ३ पर्यंत मी एका Law Firm च्या Office मध्ये कामात व्यस्त होतो. बाहेर काय चालू आहे ह्याचा काहीच पत्ता नव्हता. त्यावेळी मोबाईलवर internet वगैरे काही नसल्यामुळे तशा काही बातम्याही मिळाल्या नाहीत.

काम संपवून जेव्हा खाली उतरलो तेव्हा पाऊस पडत होता, म्हणून बिल्डींगच्या दारातच पाऊस थांबण्याची वाट पहात उभा राहिलो. बरेच लोक तिथे उभे होते, त्यांच्यातील चर्चेवरून असे काहीसे कळले कि local train बंद पडल्या आहेत वगैरे. पण हे ही तसे फार नवीन नव्हते.

काही वेळात पाऊस थांबला तसा मी प्रथम सर्कलला उभ्या असलेल्या ट्राफिक पोलीसकडे चौकशी केली, तर तो म्हणाला कि एव्हाना local train सुरू झाल्या असतील. त्यावरून मला असे कळले कि परिस्थिती normal आहे. आमच्या कंपनीचे एक ऑफिस चर्चगेट स्टेशनजवळ असल्याने मी पहिल्यांदा तिथे जायचे ठरवले. जाताना फौंटन, चर्चगेट सगळीकडेच माणसे आणि वाहतुकीची प्रचंड गर्दी दिसली. ट्रेन सुरू नसल्याचेही कळले. ऑफिसवर गेल्यावर तिथल्या लोकांनी मला लगेच मुंबई सोडण्याचा सल्ला दिला, आणि ते सगळे देखील वेळेआधी ऑफिसमधून निघत आहेत असे सांगितले. त्यावरून परिस्थिती थोडी गंभीर आहे असे कळले.

मी परत चालत हाय कोर्ट बिल्डींगच्या मागच्या रस्त्यावर आलो. वाहतूक पूर्ण ठप्प झालेली होती. जवळपास ३०-४० मिनिटे वाट पाहिल्यानंतर अखेरीस एक taxi वाला मला दादरला घेऊन जायला तयार झाला. वाहतूक इतक्या धीम्या गतीने चालली होती कि फोर्ट पासून भायखलापर्यंत पोहोचायला आम्हाला जवळपास २ तास लागले. तिथे पोहोचेपर्यंत taxi मधला gas संपल्यामुळे taxi थांबवावी लागली. मी taxi वाल्याचे पैसे चुकते केले. समोरच एक Police Van उभी होती. मी त्यांच्याजवळ चौकशी केली कि मला पुण्याला जायचे आहे, तर काय करू. त्यांनी मला भायखळा स्टेशनवर ट्रेन चालू झाली का ते पाहावे असा सल्ला दिला. (पण पुण्याकडे जाणे शक्य नाही अशी कुठलीही सूचना दिली नाही.......का ते अजून कळत नाही).

रस्त्यावर घोटभर पाणी साचले होते. एव्हाना बहुदा ६ वाजले असावेत, पण प्रकाश होता. भायखळा स्टेशनजवळ रस्त्यावरील लोकांना ट्रेन विषयी विचारता ते हसलेच. ते म्हणाले ट्रेन काही उद्यापर्यंत सुरू होत नाही. मला परिस्थितीची थोडी थोडी कल्पना येऊ लागली होती. पण डोक्यात एकच विचार पक्का होता कि दादरला पोहोचायचे, पुण्याची Volvo पकडायची आणि ह्या रगाड्यातून सुटायचे. मी भायखळाकडून दादरकडे पायी चालायला सुरुवात केली.....

रस्ताभर किमान घोटाभर पाणी होतेच होते. कुठे कुठे ते वाढून गुढघाभर होते. मी तसाच चालत होतो. रस्ता काही पूर्ण माहित नव्हता, पण लोकांना विचारात पुढे मार्गक्रमण चालू होते. माझ्याबरोबरीने शेकडो-हजारो लोक चालत होतेच, त्यामुळे कुठेही panic झाल्यासारखे वाटले नाही. बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टीतील लोक रस्त्यावर येऊन कुठे खड्डे असतील तर चालणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करत होते, काही ठिकाणी पाण्याला वेग होता तिथे त्यांनी मानवी साखळी केली होती, काही ठिकाणी चालणाऱ्या लोकांना ते पाणी पुरवत होते, जमेल तशी मदत करत होते.....काय म्हणावे ह्याला....अजूनही आठवून कृतज्ञतेने डोळे ओलावतात. एक दृश्य विवक्षित आठवते. एका ठिकाणी एका म्हाताऱ्या जोडप्याची कार रस्त्याच्या मध्येच बंद पडली होती, आणि ते ती कार बाजूला घेण्यासाठी ढकलत होते. लगेच आसपासची पोरे-लोक त्यांच्या मदतीला धावली, आणि त्यांनी बहुदा ती कार एका बाजूला लावली असेल! चालणारे लोक अगदी व्हीटीपासून सुद्धा चालत होते, पण कुठेही थकवा किंवा तक्रार नव्हती. त्यामुळे मी देखील शांतपणे चालत होतो.

आधी घरी फोन झाला होता आणि मी त्यांना एवढेच सांगितले होते कि मी पुण्याला येईन, मी सुरक्षित आहे. लोअर परेलपाशी माझ्या वाहिनीचा फोन आला तिने तिच्या मुंबईतील नातेवाईकांचे पत्ते दिले. मोबाईलची battery मारायला टेकली होती म्हणून मी मोबाईल बंद केला.

flyovers पूर्ण गाड्यांनी भरलेले होते. लोअर परेलमध्ये पाणी वाढून गुढघाभर झाले होते. दादरच्या जवळ पोहोचलो तर लाईट गेलेले होते. कुठेतरी एक रस्ता मी चुकलो बहुदा आणि एका अगदी कमी गर्दी असलेल्या रस्त्याला लागलो. तिथे जवळपास कुणीच चालणारे दिसत नव्हते, आणि पाणी देखील कमरेपर्यंत झाले होते. मला पोहता येत नसल्याने, आणि एवढे जास्त पाणी, अंधार, निर्मनुष्य रस्ता ह्यामुळे तिथे जरासा मी धास्तावलो. पण चालत राहिलो.

शेवटी दादरच्या पुलाखाली पोहोचलो जिथून पुण्याच्या buses जातात, आणि तिथे पोहोचल्यावर पहिल्यांदाच मला असे समजले कि पुणे बिणे भूल जाओ! तिथे मला कळले कि मुंबई - पुणे रस्ताच पाणी भरल्याने बंद पडला आहे. आता काय करायचे! मी दादर स्टेशनच्या जवळपास कुठेतरी हॉटेल मध्ये राहावे असा भाबडा विचार केला, आणि पूनम पासून ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व हॉटेलकडे चौकशीसाठी जाऊ लागलो. तिथे पाणी खूप जास्त भरले होते. जवळपास छातीच्या पातळीपर्यंत पाण्यात मी चालत होतो. संपूर्ण अंधार होता. एक दोन हॉटेलच्या दारातूनच निराश परतल्यावर मला लक्षात आले कि कुठल्याही हॉटेल किंवा लॉजमध्ये जागा मिळणे शक्य नाही. मग काय करायचे!

तसाच छातीभर पाण्यातून चालत पुन्हा दादरच्या fly over कडे आलो. पोटात एव्हाना खड्डा पडला होता. नशिबाने थोडा शोध घेतल्यावर एका पंजाबी restaurant मध्ये जागा मिळाली. बूट, सॉक्स सगळे काढून, pant खालून fold करून चक्क मांडी घालून तिथे बसलो. नशिबाने काहीतरी खायला मिळाले. बराच वेळ तिथे असाच घालवला. तेव्हा असे ठरवले कि आजची रात्र दादरच्या पुलाखाली काढायची. तिथे भरपूर गर्दी होतीच.

जेवण करून खरोखर दादरच्या पुलाखाली आलो, इकडे तिकडे फिरत राहिलो. कुठे बसायला जागा मिळते का पहात होतो. वाहिनेने तिचे बाबाही मुंबईत अडकले आहेत आणि ते गिरगावात त्यांच्या भावाकडे राहिले आहेत असे कळवले होते. त्यांचा पत्ताही दिला होता. पण गिरगावला परत जायचे कसे हा प्रश्नच होता. असाच फिरत असता, अचानक एक taxi आली आणि त्यातून काही लोक उतरले. मी त्या taxi कडे धावलो आणि त्याला गिरगावला येणार का विचारले. तो थोडा विचार करून हो म्हणाला. चर्चगेटवरून येऊन पुन्हा आता गिरगावला जायचे ही एक थट्टाच होती. जर तिथल्या पोलिसांनी योग्य मार्गदर्शन केले असते तर कदाचित एवढा उपद्व्याप झालाच नसता.

मी taxi मध्ये शिरतोय एवढ्यात ४-५ एकदम झोपडपट्टी category ची दारू प्यायलेली मुले अचानक taxi मध्ये शिरली. त्यांची स्थिती पाहून त्यांना काही बोलणे म्हणजे भांडण ओढवणे होते. मी त्यांना सांगून पहिले कि मी ह्या taxi त बसतोय, तर ती म्हणाली तुम्हीही बसा आम्हीही बसतो. मी मान्य केले आणि निघालो, पण मनात धास्ती होती कि न जाणो वाटेत ही मुले काही दगाफटका करतील. पण झाले उलट, दारू प्यायलेली असली तरी त्या मुलांना कुठे पाणी साचले आहे, कुठे नाही ते माहित होते. त्यांनी taxi वाल्याला guide करत कमी पाण्याच्या रस्त्याने एका ठिकाणापर्यंत नेले आणि ती उतरली. पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता!

मग आमची स्वारी निघाली गिरगावकडे. taxi वालाही बरा होता, कुठेही तक्रार न करता, खूप वेळा रस्ता बदलत बदलत त्याने शिताफीने रात्री सुमारे १.३०-२ च्या सुमारास मला गिरगावात पोहोचवले....

त्या रात्री मी माझ्या भावाच्या चुलत सासऱ्यांच्या दोन खोल्यांच्या घरातल्या चाळीत राहिलो. त्यांचाच एक जुना लेंगा घातला. भावाचे सासरे तिथेच होते. चुलत सासरे अपंग, त्यांची एक Cancer असलेली बहिणही तिथेच होती. त्याचदिवशी तिची केमो झालेली, त्यामुळे त्यांनाही खूप त्रास होत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच्या दुकानातून कपडे खरेदी केले. एक दिवस आणखी त्याच चाळीत काढला. चाळीत बहुतेक घरात असेच 'बिन बुलाये मेहमान' होते. बऱ्याच घरातील कुणी ना कुणी घरी परतलेले नव्हते वगैरे बरेच काही!

माणसांचे, माणुसकीचे पुष्कळ रंग त्या दिवशी पहिले. मुंबईला त्या दिवशी पावसाने जरी धुवून काढले तरीही माझ्या मनातील तो दिवस कुठल्याही पाण्याने धुवून टाकता येणार नाही!

सारंग भणगे
Related Posts Plugin for WordPress, Blogger...