Sunday, September 15, 2019

राष्ट्रभाषा

प्रस्ताव :

हिंदी ही केंद्र सरकारच्या कारभाराची भाषा व्हावी, राज्यांच्या कामकाजाची भाषा ही त्या राज्याची प्रमुख भाषा असावी.

शिक्षणात प्रथम भाषा हिंदी, दुसरी मातृभाषा आणि तिसरी कुठलीही परकीय भाषा असावी.

खाजगी क्षेत्रात हिंदी भाषा वापरणाऱ्या कंपन्यांना विशेष फायदे द्यावेत!

ह्या भाषा रचनेवर कुणाला आपत्ती असण्याचे कारण वाटत नाही!
-----------------------------------------------------------------------

सर्वात पहिल्यांदा, मी हा विचार राष्ट्र ह्या दृष्टीकोनातून करतो आहे, राज्य किंवा व्यक्ती ह्या नाही. ते का, हे पुढे सविस्तर लिहायचा प्रयत्न करतो.

मातृभाषा / राज्यभाषा :

पण तत्पूर्वी एक स्पष्ट असलेल्या गोष्टीचे स्पष्टीकरण कि माझ्या विचारामध्ये (किंवा प्रस्तावामध्ये) शैक्षणिक तसेच व्यावहारिक पातळीवर मातृभाषेला तेवढेच महत्व दिलेले आहे जेवढे हिंदी ह्या राष्ट्रभाषेला. म्हणजे मातृभाषा हि शिकणार आहोतच, तसेच राज्य सरकारच्या व्यवहारात त्या राज्याची भाषा हि देखील प्रमुख भाषा असेल, किंबहुना तिथे हिंदी (एक राष्ट्रभाषा म्हणून) दुय्यम स्थानी असेल.

अर्थात मातृभाषा आणि राज्यभाषा ह्यांना राष्ट्रभाषेइतकाच सामान दर्जा शैक्षणिक आणि व्यावहारिक पातळीवर असेल.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रभाषा :

माझा एक मुद्दा असा आहे कि ह्या देशाची अशी एक भाषा असावी जी प्रत्येकाला यायलाच हवी. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी आणि गुजराथ पासून नागालँड पर्यंत प्रत्येक भारतीयाला एक अशी भाषा हवी जी बोलता, लिहिता, वाचता यायलाच हवी. एक भाषा एक देश!

तो भाषा कुठलीही असू दे. उद्या सर्व भारतीयांनीं मिळून ठरवले कि ती भाषा नागा असावी तरी मला ते तत्वाश: मान्य आहे. परंतु सर्व भारतीयांची अशी एक भाषा हवीच हवी. (पुन्हा एकदा स्पष्टीकरण कि त्या राष्ट्रभाषेबरोबर मातृभाषा / राज्यभाषा हि देखील अवगत असेलच)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिंदी हि राष्ट्रभाषा :

हिंदी हि मातृभाषा असलेली लोकसंख्या ४३.% आहे. त्याच्याखालोखाल बंगाली भाषिक येतात, जी संख्या एकूण लोकसंख्येच्या ८% आहे. ४३.६ आणि ८ ह्यामधली तफावत एवढी प्रचंड आहे कि जर आपल्याला राष्ट्रभाषा हवी असेल तर हिंदी शिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही.

शिवाय हिंदी व्यतिरिक्त इतर भाषिक फार मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषा लिहू, वाचू, समजू शकतात. हि संख्या सहज ६०-७०% पर्यंत जाईल. म्हणजे एवढी विविधता असलेल्या देशात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या अशी आहे कि जे सहज हिंदी भाषा अवगत करू शकतील.

त्यामुळे हिंदी हीच केवळ राष्ट्रभाषा होऊ शकते. हिंदीचा आग्रह केवळ एवढ्याचसाठी.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रभाषा का? :

खरेतर ह्याचे उत्तर देण्याची आवश्यकता असू नये! पण असलीच तर विषय देखील खूप सखोल आणि विवादास्पद होऊ शकतो.

सुरुवातीला एवढेच सखेद नमूद करू इच्छितो कि ह्या देशात इंग्रजी भाषेविषयी आक्षेप घेतला जात नाही, परंतु हिंदी ह्या भारतीय भाषेचा विषय आला कि लोकांच्या अस्मिता जाग्या होतात. त्याची वेगवेगळी करणे आहेत, पण मुख्यतः इंग्रजी हि आपल्याला तारणारी भाषा आहे असा असलेला गोड गैरसमज. हा विषय जरी वेगळा असला तरीही एक निश्चित कि जे आजपर्यंत आपण केले ते आता बदलू शकतो, किंबहुना बदलायची वेळ येऊ घातली आहे. म्हणजेच आजवर आपण इंग्रजीचा राष्ट्रीय भाषेप्रमाणे उपयोग केला तो आता हळूहळू कमी करत, बंद करायची वेळ आली आहे.

इंग्रजी भाषा ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी ती तिसरी परकीय भाषा म्हणून जरूर शिकावी, पण ती बंधनकारक असू नये. कुणाला जर्मन किंवा मँडरिन किंवा फ्रेंच शिकायची असेल तर ती शिकायची इंग्रजी शिकण्याइतकीच व्यवस्था असावी. तीन भाषा आजही आपण शिकत आहोत, त्यामुळे ते फक्त काही बदल करून राबवावे!

भाषा हे फक्त संवादाचे साधन नाही तर संस्कृतीचे मूळ आहे. सुमारे १९९९-२००० साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून इंग्रजी भाषा आवश्यक करण्यात आली तेव्हा 'आपणच' नावाच्या एका शिक्षकांच्या संस्थेमध्ये मी विचार मांडले होते. तेव्हा मी हेच म्हणालो होतो कि भाषा तिच्याबरोबर संस्कृतीची अदृश्य पिलावळ घेऊन येते. संस्कृती वर जेव्हा आक्रमण होते तेव्हा माणसाच्या अस्मिता देखील बदलतात, अर्थात स्व-ओळख बदलते.

जर एखाद्या परदेशी माणसाने प्रश्न विचारला कि भारताची भाषा कुठली, तर ह्यावर आपल्याकडे उत्तर नाही. जे उत्तर आहे ते फार क्लिष्ट आहे. त्यामुळे भारताची अशी एक राष्ट्रभाषा असणे गरजेचं आहे. ती भारताची ओळख असते, ओळख सांगते!

भारताची अशी एक भाषा असेल तर ती भारताची संस्कृती, अस्मिता आणि अर्थात स्व-परिचय विश्वभर निर्माण करू शकते. जागतिक प्रभाव हा केवळ आर्थिक किंवा सामरिक शक्तीने निर्माण करता येत नाही. किंबहुना आर्थिक किंवा सामरिक सामर्थ्याने फार थोड्या देशांवर फार थोडा काळ प्रभाव निर्माण करता येतो. परंतु जर सांस्कृतिक सामर्थ्याने इतर देशांवर, जगावर प्रभाव निर्माण करता आला तर तो फार लांब काळ अबाधित राहतो, अगदी हजारो वर्षे देखील राहतो. सांस्कृतिक प्रभावाने जे साधता येते ते आर्थिक किंवा सामरिक सामर्थ्याने साधता येत नाही.

चीनने हे ओळखले असावे. चीन debt trap, military expansion and dominance ह्यानंतर आता सांस्कृतिक प्रभावावर काम करते आहे. भाषेचे महत्व ते ओळखत आहेत. नेपाळ ह्या भारताच्या पूर्वापार मित्र असलेल्या राष्ट्रांमधील शाळांमधून आता मँडरिन (म्हणजे चीनमधील प्रमुख भाषा) आवश्यक भाषा म्हणून शिकवले जाणार आहे. हि फार काळजीची बाब आहे.

"विविधतेमध्ये एकता" हे तत्व फार चांगले आणि आदर्श आहे. पण व्यवहाराच्या पातळीवर ते पूर्णतः यशस्वी ठरतेच असे नाही. भाषा आणि धर्म ह्या माणसातील कलहाचे सर्वात मोठे कारण असते. दोन्ही गोष्टी अस्मितेच्या निदर्शक असतात. एकवेळ धर्माच्या पगाड्यातून माणसाची मुक्तता माणूस करून घेऊ शकतो, परंतु भाषेच्या पगाड्यातून माणूस कधीही सुटू शकत नाही. १४० कोटींच्या देशात एक भाषा नसल्यामुळे एकसूत्रता नसणे स्वाभाविक आहे. दोन वेगवेगळे भाषिक हे त्यामुळे संवाद साधू शकत नाहीत, दुसऱ्या राज्यात जाऊन व्यवहार करू शकत नाहीत, शिकू शकत नाहीत आणि प्रामुख्याने भावनिक दृष्ट्या विभक्तच राहतात. हेच जर संपूर्ण भारतातील प्रत्येक भारतीयाला एक भाषा तरी अशी असेल कि जी बोलता, लिहिता, वाचता येत असेल तर व्यावहारिक; तसेच भावनिक पातळीवर सर्व भारतीय एकत्र होऊ शकतात.

माझ्या मते जितके काश्मीर भारताचा भाग झाल्यानंतर भारत एक झाल्याची भावना संपूर्ण भारतभर व्यक्त केली, तीच भावना एक भाषा असेल तर निर्माण होईल.

के. सिवन ह्यांना चांद्रयानच्या संदर्भात प्रश्न विचारताना तुम्ही तमीळ असल्याने तुम्हाला अभिमान वाटतो का असे विचारले तेव्हा त्यांनी मी भारतीय असल्याने मला अभिमान वाटतो असे उत्तर दिले. ह्या उत्तरातील भावनेला 'एक देश; एक भाषा' असेल तर अधिक बळ मिळेल अशी माझी प्रामाणिक समजूत आणि भावना आहे.

मराठी भाषेवरचे प्रेमापोटी मी मराठी भाषा शिकणार आहे, ती राज्यपातळीवरील व्यवहारात वापरणार आहे. इंग्रजी किंवा इतर परकीय भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला प्रतिनिधित्व करण्यासाठी शिकणार आहे, वापरणार आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर व्यवहार करण्यासाठी, एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी हिंदी भाषा (किंवा इतर कुठलीही एक भारतीय भाषा) राष्ट्रभाषा म्हणून शिकणार आहे, वापरणार आहे!

हे माझ्या डोळ्यासमोरील चित्र आहे!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी हिंदी हि उर्दू प्रधान हवी कि आणखी काही हा मुद्दा वेगळा आहे. मराठी हि पुण्याची कि वऱ्हाडी कि कोकणी कि आणखी कुठली हा जसा प्रश्न येत नाही, तसाच तोही येणार नाही. हे सर्वच भाषांबाबत आहे. त्यामुळे असले किरकोळ मुद्दे आणूच नयेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

फायदा-तोटा हा मुद्दा जेव्हा कायदा केला जातो तेव्हा उरतच नाही. तरीही इंग्रजी जरूर निवडावी जर ती फायद्याची वाटत असेल तर. माझ्या प्रस्तावात / विचारात त्याला पूर्णपणे स्थान आहे. तसेही तीन भाषा शिकल्या जात आहेतच, त्यात सुसूत्रीकरण आणावे आणि भारताची अशी भाषा निर्माण व्हावी एवढी साधी हि गोष्ट आहे.

- सारंग भणगे

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...